आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधाच्या लालसेने माश्यांवर घाला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बेफिकिरी आणि उद्दामपणा हा जणू आपला समाजविशेष होत चाललाय. ही बेफिकिरी जशी पर्यावरण रक्षणाबाबतची आहे, तशीच ती मध देणाऱ्या मधमाश्यांचा अधिवास नष्ट करण्याबाबतचीही आहे...

देशात वाघ संकटात आला, त्याच्यासाठी ‘प्रोजेक्ट टायगर’ प्रकल्प सुरू करण्यात आला. माळढोक पक्षी संकटात आहे, त्यासाठी ‘प्रोजेक्ट बस्टर्ड’ सुरू होत आहे. नामशेष झालेल्या चित्त्याला पुन:स्थापित करण्याची योजना आकारात येत आहे. सिंहांसाठी देशात दुसरे स्थान शोधले जात आहे. मात्र, नजरेला सुखावणारी फुलपाखरे आणि जैवसाखळीत महत्त्वाचे स्थान असलेल्या कीटकांच्या बाबतीत स्थिती अतिशय भयावह आहे.

जन्मजात बाळाला आईच्या दुधाबरोबर मध चाटवण्याचा सल्ला दिला जातो. कारण मध पौष्टिक व बालकाला सहज पचणारा असतो. इतका मधुर व पौष्टिक पदार्थ देणाऱ्या मधमाश्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. मध काढण्याच्या शास्त्रशुद्ध पद्धतींचा वापर होत नाही, हे त्याचे मोठे कारणच आहे. त्याचबरोबर मधमाश्यांचा अधिवास असलेली मोठी झाडेही वेगाने नष्ट होत आहेत. बदललेली पीकपद्धती, रासायनिक कीटकनाशकांचा बेबंद वापर, पाणीसाठ्यांची कमतरता ही कारणेही मधमाश्यांच्या विनाशाला हातभार लावत आहेत.
आपल्या देशात मधमाश्यांच्या एपिस डॉरसेटा (आग्या), एपिस सेराना (सातेरी), एपिस फ्लोरिआ (छोटे मोहोळ), एपिस ट्रायगोना (मोहोरी) व एपिस मेलिफेरा या जातींच्या मधमाश्या आहेत. त्यापैकी एपिस मेलिफेरा या एपिस सेराना व एपिस मेलिफेरा या जातीच्या माश्या पाळल्या जातात. एपिस फ्लोरिआ व एपिस ट्रायगोना या माश्या पाळल्या जात नाहीत. त्यांचे मोहोळ अतिशय छोटे असते. त्यातून मिळणारे मधही खूप कमी प्रमाणात असते. पाळण्यात येणाऱ्या माश्यांत प्रामुख्याने मेलिफेराचाच समावेश असतो. त्यांच्या पेट्या आंध्रप्रदेशातील राजमुंद्री येथे मिळत असल्याची माहिती डॉ. शिखिन कोल्हे देतात.

दर वर्षी दहा लाख वसाहती नष्ट
देशातील मधाचे ७५ टक्के उत्पादन प्रामुख्याने आग्या मोहोळापासून होते. आग्या मोहोळाच्या माश्यांना ‘रॉक बी’ असेही नाव आहे. आपल्या देशाला आग्या मोहळापासून दरवर्षी २२ हजार टन मध मिळतो. हा मध चुकीच्या पद्धतीने गोळा करताना दर वर्षी दहा लाख वसाहती (कॉलनी) नष्ट होतात. एका वसाहतीत सुमारे ५० हजार माशा असतात. यावरून होणारे नुकसान लक्षात येईल. फक्त माश्याच नष्ट होत नाहीत, तर त्यांची अंडी व अळ्याही नष्ट होतात. एक कॉलनी नष्ट होणे म्हणजे, तेथे पुन्हा मध निर्मिती न होण्यासारखे असते. (संदर्भ- ए. सोमण, टी. एस. मोजेस, के. डी. कांबळे) त्यामुळे जेथे अनेक प्रचंड आकाराची आग्या मोहोळाची पोळी दिसायची, तेथे आता अभावाने एखादे दिसते. अकोले तालुक्यात सह्याद्रीच्या कातळांवर अगदी तीन-चार वर्षांपूर्वी अशी प्रचंड आकाराची असंख्य पोळी दिसायची. आता त्यांची संख्या कमी झाली आहे. या पोळ्यांतील मध काढण्याची पद्धत म्हणजे, ‘सुसाईड मिशन’ मानण्याइतके धोकादायक होते. त्यासाठी रानवेलींचे मोठे दोर करून त्याला लांबवर झोका घेत पोळ्यापर्यंत पोहोचून कोयत्याने पोळे कापले जायचे. ते पोळ्याचे तुकडे खाली असलेली तरुणांची तुकडी मोठ्या टोपल्यांत झेलायची. आता तर ही मध काढण्याची मोहीम बंद पडली आहे. कारण पोळ्यांची संख्याच प्रचंड घटली आहे. थोड्या मधासाठी कोण जीव धोक्यात घालणार, हाही प्रश्नच आहे. पोळ्यांची संख्या घटल्याचा परिणाम म्हणजे, अलीकडील काळात रान आंबा, जांभूळ, हिरडा यांच्या उत्पादनात घट झाल्याचे त्या परिसरातील आदिवासी शेतकरी सांगतात.

नगरच्या अहमदनगर महाविद्यालयातील प्राध्यापक शिखिन कोल्हे पाच वर्षांपासून मधमाश्यांवर संशोधन करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, आपण योग्य पद्धतीने मध गोळा केला नाही तर आपल्या देशातून मधमाश्या पूर्णपणे नामशेष होण्याची भीती आहे. वास्तविक पाहता मध पोळ्याच्या वरच्या बाजूला असताे. खालच्या बाजूला परागकण, राणी माशीची अंडी व अळ्या (लारव्हा) असतात. मध गोळा करताना खालच्या बाजूस आग लावली जाते. आगीच्या उष्णतेने सर्व अंडी व अळ्या नष्ट होतात. हे नुकसान खूप मोठे असते. आदिवासी किंवा मध गोळा करणाऱ्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने मध गोळा करण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज असल्याचे आग्रही मतही ते नोंदवतात.

मध गोळा करण्याची अहिंसक पद्धत
पोळ्याच्या वरच्या बाजूला फुगीर भागात फक्त मध असतो. त्यामुळे मध गोळा करताना त्यातील फक्त ७० टक्के भाग कापला, तर पोळे तसेच राहते. माश्याही पोळे सोडून जात नाहीत. पोळ्याचेही नुकसान होत नाही. अंडी व अळ्या सुरक्षित राहतात. कापलेल्या जागेवर मधमाश्या पुन्हा पोळे बांधून टाकतात, असे प्रा. कोल्हे म्हणतात. अशा अहिंसक पद्धतीने मध गोळा करण्याची गरज आहे, नाही तर मधमाश्या पूर्ण नष्ट झाल्यावर आपल्याला नैसर्गिक पद्धतीचा मध मिळणे अवघड होणार आहे, कारण आग्या माश्यांच्या मोहोळातील मध औषधीही असतो.

मधमाश्यांची उपयुक्तता
मधमाशी नैसर्गिकरीत्या परागीभवनाचे कार्य करत असते. मधमाशीने परागीभवन केलेल्या फळबागेतील फळाचा आकार व वजन २५ टक्के अधिक असते. त्यामुळे माणसाने मधमाश्यांकडे फक्त मधासाठी पाहू नये. आपल्या देशातील वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरजही सतत वाढते आहे. ही अन्नधान्ये व फळांची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी मधमाश्या आपल्याला नैसर्गिकरीत्या उपयुक्त ठरू शकतात. आता अनेक शेतकरी आपल्या शेतात पिकांच्या हंगामाच्या वेळी मधमाश्यांच्या पेट्या ठेवत आहेत. अकोले तालुक्यातील अंबड येथील राजू कानवडे यांनी पुण्याच्या केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्थेत (सीबीआरटीआय) प्रशिक्षण घेऊन आंध्रप्रदेशातून मधमाश्यांच्या पेट्या आणल्या. ते आपल्या पेट्या थेट बिहारपर्यंत पाठवतात. मधमाश्यांच्या पेट्या लावण्याचे त्यांना पैसे मिळतातच, पण गोळा केलेल्या मधातूनही त्यांना चांगली कमाई होत आहे. मोहरीच्या शेतात लावण्यासाठी मधमाश्यांच्या पेट्यांची मोठी मागणी असते. पेट्या लावल्यावर उत्पन्नात किमान २५ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेतीसाठी मधमाश्या अतिशय उपयुक्त आहेत. कानवडे यांच्याकडे आता मधमाश्यांच्या २०० पेट्या आहेत.

याशिवाय मधमाश्या चावून घेण्याची उपचार पद्धतीही आता लोकप्रिय होत आहे. याला ‘एपिथेरपी’ असे नाव आहे. रक्ताभिसरण सुरळीत होण्यासाठी रक्तदाब नियंत्रणासाठी तिचा मोठा उपयोग होत असल्याचे संशोधनात सिद्ध झाले आहे. पोषक अन्न म्हणून तर मधाचा उपयोग अतिशय प्राचीन काळापासून मानवाला माहीत आहे. मध पोळी किंवा मध दुधाबरोबर घेतले तर वजन वाढते. कोमट पाण्याबरोबर घेतले तर वजन कमी होते. त्यामुळे त्याला असलेली मागणीही मोठी आहे.

मधमाश्यांच्या अस्तित्वापुढील आव्हाने
प्रा. शिखिन कोल्हे मधातील परागकणांचा अभ्यास करत आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, ज्या मधात पिकाचे ४५ टक्क्यांहून अधिक परागगण आढळतात, त्या मधाला ‘युनिफ्लोरल’ असे म्हणतात. मधाच्या पृथक्करण करण्याच्या पद्धतीला ‘मेलिटोपॅलिनोलॉजी’ असे लांबलचक नाव आहे. या अभ्यासातून कोणत्या भागात कोणती झाडे मधमाश्यांना उपयुक्त ठरू शकतात, हे स्पष्ट होते. सध्या आपल्या देशातील अंदाधुंद वृक्षतोड मधमाश्यांच्या अस्तित्वाच्या मुळावर आली आहे. झाडे तुटली तरी मधमाश्या इमारतींवर पोळी बांधू शकतात. त्या तशा परिस्थितीशी जुळवून घेतात. पण कीटकनाशकांचा अतिरेकी वापर आणि पाणी साठ्यांची कमतरता यांमुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यात अानुवंशिकदृष्ट्या सुधारित (जेनेटिकली मॉडिफाइड) पिकांमुळेही मधमाश्यांना अस्तित्व टिकवणे अवघड झाले आहे.

मधमाश्यांकडे फक्त मधासाठी पाहू नका
मधमाश्यांची उपयुक्तता पाहून नुकताच ‘जागतिक मधमाश्या दिन’ साजरा करण्यात आला. मधमाश्यांकडे फक्त मधासाठी पाहू नका, असे जगभरातील शास्त्रज्ञ म्हणतात. कारण ती जीवसाखळीतही महत्त्वाची भूमिका बजावते. शेतीतील तिची उपयुक्तता तर वादातीत आहे. त्यामुळे अमेरिकेचे मावळते अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल यांनीही मधमाश्या पालन सुरू केले आहे. मधमाश्यांविषयी अमेरिका व युरोपमध्ये मोठी जागृती झाली आहे. आपल्या देशात ती लवकर होण्याची गरज आहे. ती तशी न झाल्यास मधमाश्यांवरील संकट अधिक गहिरे होण्याची साधार भीती आहे.

मिलिंद बेंडाळे
wildmilind@gmail.com
बातम्या आणखी आहेत...