आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वैश्विक शांतीची पॅलेस्टिनी हाक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1976 मध्ये इस्त्रायल सरकारने तेथील अरब-पॅलेस्तिनी जनांच्या हजारो ‘ड्युनम’ जमिनी ‘सुरक्षा व वसाहत-स्थापने’च्या कारणास्तव ताब्यात घेण्याची घोषणा केली. त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी नागरिकांनी 30 मार्च 1976 रोजी ‘सार्वत्रिक संप’ करण्याचे ठरवले. 1948मध्ये इस्त्रायलची स्थापना झाल्यापासून प्रथमच तेथील नागरिकांनी असे राष्ट्रीय स्तरावर संघटित विरोध करू पहात होते. हरताळाच्या दिवशी इस्त्रायल शासनाने सैनिकी व पोलिसी बळाचा वापर करून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यात 6 जणांचा मृत्यू झाला, शेकडो जखमी झाले; हजारोंची धरपकड झाली - या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर तेव्हापासून 30 मार्च हा दिवस दरवर्षी ‘पॅलेस्टाइन लँड डे’ म्हणून सर्वत्र पाळला जाऊ लागला. जगभरातील पॅलेस्टाइन-समर्थकांनी सुमारे चार दशलक्ष पॅलेस्तिनी विस्थापितांना पाठिंबा म्हणून या दिवसाचे औचित्य साधून गेल्या काही वर्षात अनेक उपक्रम केले. मात्र इतक्या वर्षांनंतर आशियाई जनांच्या पुढाकाराने प्रथमच ‘ग्लोबल पीस मार्च’च्या उपक्रमाद्वारे एका नव्या चळवळीची मुहूर्तमेढ केली गेली. त्यात भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण, ताजिकीस्तान, अझरबैजान, तुर्कस्तान, मलेशिया, बहरीन, फिलिपाइन्स, इंडोनेशिया, इराक व लेबनॉन येथील कार्यकर्ते सहभागी झाले. या यात्रेत मी एक मुक्त-पत्रकार, लघुपटकार आणि ‘नॅशनल अलायन्स फॉर पीपल्स मुव्हमेंट’(एनएपीएम) या संघटनेचा सदस्य म्हणून सहभागी झालो होतो. 9 मार्चला दिल्लीहून निघालेल्या भारतीय चमूला फिलिपाइन्स, इंडोनेशिया, मलेशिया व पाकिस्तान येथील कार्यकर्ते वाघा सीमेवर येऊन मिळाले. नंतर लाहोर, मुलतान, कराची (पाकिस्तान), कोम, तेहरान, झानझन, तबरीझ (इराण), इदगीर, अंकारा, इस्तंबुल, कोन्या(तुर्कस्तान) अशी मजल-दरमजल करीत कारवाँ पुढे जात राहिला. अखेरीस सुमारे 130 जणांची ही शांतीयात्रा जहाजमार्गाने लेबनॉनची राजधानी बैसत इथे पोहोचली. 30 मार्च, 2012 रोजी हा कारवाँ अनेक अडचणींचा सामना करीत लेबनॉन-इस्त्रायल सीमारेषेवरील ‘अल शकीफ कॅसल’ या ठिकाणी पोहोचण्यात यशस्वी झाला. आशियाप्रमाणेच इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जॉर्डन, सिरिया आदी ठिकाणचे प्रतिनिधी आणि अर्थातच विविध देशात विखुरलेले पॅलेस्तिनी निराश्रित हजारोंच्या संख्येने तिथे पोहोचले. तिथे झालेल्या मेळाव्यात पॅलेस्टाइन-इस्त्रायल संघर्षावर शांतीपूर्ण मार्गाने तोडगा काढण्याचे आवाहन करण्यात आले आणि इस्त्रायलच्या हिंसाचारी मार्गांचा जोरकसपणे धिक्कारही करण्यात आला. लहानशा टेकडीवर आयोजित कार्यक्रमात झालेली भाषणे, विविध कार्यक्रम, मुक्तीगीते आणि घोषणा यांनी अवघा आसमंत दुमदुमून गेला. या यात्रेत पॅलेस्तिनी, अरब, मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू, हिंदू व निधर्मी अशा मिळून 9 स्त्रियांचा समावेश होता. इस्त्रायल-पॅलेस्टाइन संघर्षाची शांतीपूर्ण मार्गाने तड लावावी व नव्या निधर्मी पॅलेस्तिनी राष्ट्राची (ज्यू, ख्रिश्चनांसह) स्थापना केली जावी; जेरुसलेममधील सर्वच धर्मियांच्या आपापल्या पवित्र स्थळावरील हक्क अबाधित रहावा, अशी यात्रेची भूमिका होती. एक-दीड वर्षांपूर्वी पॅलेस्तिनी लेखक डॉ. रिभी हलाउम, भारतातील सामाजिक कार्यकर्ते फिरोझ मिठिबोरवाला, डॉ. पॉल लारुदी (अमेरिका), सार कालबोर्न, सारा मारूसेक (इंग्लंडमधील विदुषी), सौर अबु महाफौज (जॉर्डन), लेबनॉनचे विचारवंत-लेखक रामी झुरैक आदींचा समावेश असलेल्या ‘ग्लोबल मार्च’च्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी समितीद्वारे प्रस्तुत आशियाई शांती यात्रेची योजना आखली गेली. गेली सहा दशके चिघळत गेलेल्या पॅलेस्तिनी जनतेसाठी आता इतक्या वर्षांनी आशियाई जनांनी असा उपक्रम हाती घ्यावा, अशी योजना पुढे का आली? याचे कारण विचारता फिरोझ मिठिबोरवाला म्हणतात, ‘अरब स्प्रिंग’ मुळे अरब राष्ट्रांमध्ये नवी जागृती होत असल्याचे दिसून येत होते. तेथील लोक नव्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहू लागल्याचे जाणवत होते. झायोनिस्टांबाबत व अमेरिकी साम्राज्यवादाविरोधात आशियाई देशात नव्याने विचार मांडले जात होते. अशा बदलांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकन साम्राज्यवादी व झायोनिस्टांविरोधात आशियाई जनता एकत्रित होण्याची प्रक्रिया या मुद्यावर सुरू होऊ शकते, असा विश्वास वाटला आणि ‘ग्लोबल मार्च’ यशस्वी ठरल्याने हा विश्वास सार्थही ठरला.’’ इतके खरे की, या उपक्रमादरम्यान भारतातील महाराष्ट्र, केरळ, प. बंगाल, हैद्राबाद, दिल्ली व काश्मीर येथील सदस्यांचे व त्याचप्रमाणे इराण, तुर्कस्तान, लेबनॉन येथील विविध कार्यकर्त्यांचे राजकीय दृष्टिकोन भिन्न असूनही त्यांच्यात पॅलेस्टाइन व्यतिरिक्त इतरही राजकीय समस्यांवर सतत व उत्स्फूर्त असे वैचारिक आदान-प्रदान सुरू राहिले. भारत ते तुर्कस्तानपर्यंतच्या आशियाई व मध्यपूर्वेतील जनांना जोडणारे परस्परांमध्ये काही विशिष्ट असे सामाईक सांस्कृतिक धागेदोरे आहेत; त्यातून नकळत एक विलक्षण आत्मीयतेचा ओघ वाहत आहे, हे जाणवून मनस्वी आनंद होत असल्याचे जाणवत होते. या पार्श्वभूमीवर, शिया-सुन्नी, हिंदू-मुस्लिम, धार्मिक-निधर्मी हे आपापसातील मतभिन्नता, भाषा-संस्कृती भिन्नता व दृष्टिकोन भिन्नता याचे अडसर दूर करून पॅलेस्टाइनच्या मुद्यावर एकत्रित येऊ शकतात, असा सर्वांनाच विश्वास वाटल्याचे जाणवले. इतकेच नाही तर ‘साम्राज्यवाद, नववसाहतवाद विरोधात लढण्यासाठी ‘वन आशिया, युनायटेड आशिया’ या घोषणेला मोठा प्रतिसाद लाभून त्यातून नव्या शक्यता व नवी राजकीय समीकरणे संभवू शकतात,’ अशी धारणाही दिसून आली. (पूर्वार्ध)