आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Milind Dhumal Article About Dr Babasaheb Ambedkar 125th Birth Anniversary

परिवर्तनाचे आंबेडकरी पर्व: माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिपब्लिकन पक्षात दररोज एका नव्या पक्षाची भर पडते आहे. त्यास पक्ष म्हणण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे गटबाजीचे हे राजकारण आज लाजिरवाणे झाले आहे. रिपब्लिकन पक्ष आकडेवारी पाहिली, तर आजमितीस ती ४० च्या वर आहे. हे बेसुमार राजकीय गट राजकारणातही सुमार कामगिरी करतात. किंबहुना, अशी दयनीय राजकीय अवस्था असताना आंबेडकरी जनता मात्र आपला नेता बाबासाहेबांनाच मानत आली आहे. त्यांची निस्सीम निष्ठा व बांधिलकी बाबासाहेबांच्या वैचारिक चळवळीशी आहे...

“सोनियाची उगवली सकाळ... जन्मास आले भीम बाळ...” जयंतीची चाहुल लागली की हे गाणं कानावर ऐकू येतं. जयंतीदिनी आंबेडकरी वाड्यावस्त्यांवर हमखास ऐकू येणारं हे गीत, शहरी मेट्रोसिटी निमशहरी अन् ग्रामीण भागातही तेवढेच आत्मीयतेने ऐकलं जातं. ग्रामीण भागात जसे जातनिहाय वेगळे वाडे आहेत, तसे शहरातही घेट्टोवस्त्या आहेत.
हा आपला पुढारलेल्या शहरी लोकांचा क्युटनेस. सुदैवाने तो ग्लोबलायझेशनच्या रेट्यात एसआरएच्या साथीने काहीसा विरघळत चालला आहे.

१४ एप्रिल १८९१ हा दिवस आंबेडकरी किंबहुना समस्त भारतीय समाजासाठी सोन्याचा दिवस घेऊन आला, जात-धर्माच्या विषमतेत बरबटलेल्या अमानवीय जोखडात अडकलेल्या भारताला आधुनिकता उदारमतवादी धर्मनिरपेक्ष अशा लोकशाहीचं सुंदर स्वप्न पडलं. त्या स्वप्नाला बाबासाहेबांच्या रूपाने मूर्त स्वरूप मिळालं. एक युगांतर घडलं, हजारो वर्षाचा इतिहास बदलला. जगाच्या इतिहासात दास्य परंपरेला मूठमाती देत मानवमुक्तीचा हा लढा रक्ताचा एक थेंबही न सांडता यशस्वी झाला.

“उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे... झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे...”
कवी-गीतकार वामनदादा कर्डक यांनी या क्रांतिपर्वाचे यथार्थ वर्णन शब्दातीत केलं. पूर्वी ग्रामीण भागात एक म्हण होती. ‘बामना घरी लिवणं, कुणब्या घरी दाणं, महारा घरी गाणं, अन कोल्हाट्या घरी नाचणं” बाबासाहेबांना मानवमुक्तीच्या या लढ्यात समर्थपणे प्रामुख्याने साथ दिली ती, यातील महार समाजाने...

या समाजाने लोककलेच्या माध्यामातून अनेक शाहीर महाराष्ट्राला दिले आहेत. ज्यांनी इथल्या माणसांवर, माणसांच्या दु:खावर रचना केल्या. बाबासाहेबांनी आरंभलेल्या चळवळीत त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. बाबासाहेबांना या शाहिरांचा उचित आदर होता. ते एके ठिकाणी आपल्या भाषणांत म्हणतात, “माझी दहा भाषणे आणि शाहिरांचे एक गाणे “यावरून बाबासाहेबांचे शाहिरांबद्दलचे प्रेम आणि आदर आपण समजू शकतो. काही अंशी आंबेडकरी चळवळ वाढविण्याचे अन जनमानसांत रुजविण्याचे व ती जगविण्याचे काम या शाहीर जलसाकारांनी केले आहे.

आंबेडकरी अनुयायांना आंबेडकरोत्तर सामाजिक आणि धार्मिक अनुषंगाने चळवळीच्या माध्यमातून समाधानकारक कामगिरी करता आली. काही अंशी स्वप्रगती साधता आली.
परंतु, दुर्दैवाने राजकीय चळवळ मात्र यशस्वीपणे राबविता आलेली नाही. राजकीय अपयश हे जुने दुखणे आहे. एकेकाळचा भक्कम विरोधी पक्ष म्हणून ज्याचे संसदेत संख्याबळ हे काँग्रेसच्या खालोखाल होते, तो आंबेडकरी चळवळीचा “शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन” हा पक्ष होता. हे वाचले तरी आज विश्वास बसणार नाही. अशी आजची परिस्थिती आहे. सोशल इंजिनिअरिंगचा हा प्रयोग बाबासाहेबांनी तेव्हाच केला होता. प्रस्थापितांच्या राजकारणाला शह देणारा मानवी उत्कर्षाचा समग्र राजकीय विचार हा केवळ आंबेडकरी चळवळीत आहे. हे माहीत असल्यामुळे प्रस्थापितांनी ही राजकीय चळवळ फोडण्याचा अन् खिळखिळी करण्याचा अतोनात प्रयत्न केला. नेत्यांना विविध आमिषे दाखवून आपल्या वळचणीला जोहार म्हणत उभे राहण्यास भाग पाडले. नेतेही कलंदर. अमुकतमूक मंत्रीपद द्या तरच युती करतो, असे बेधडक मागणी करणारे.
जनतेचे प्रश्न सोडवा. शिक्षित पदवीधर तरुणांना नोकऱ्या लावा. बॅकलॉग भरा. नवीन प्रभावी योजना राबवा एकूण काय, तर ‘गरीब वंचित जनतेचे मुलभूत प्रश्न सोडवा, तरच युती करतो’ अशी मागणी करणारा नेता अजून जन्माला यायचा आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांबाबत आंबेडकरी जनतेत उदासिनता आहे. ती नेत्यांच्या अशा बेगडी कचखाऊ धोरणांमुळे. त्यातल्या त्यात समाधानकारक नेतृत्व आणि वाटचाल एकमेव भारिप पक्ष आणि त्याचे अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांचे. परंतु ते व्यापक प्रमाणावर स्वीकारले जात नाही. यामागेही रिपब्लिकन राजकारण आहे.जसे प्रस्थापित राजकारण करतात, तसे अंतर्गत विस्थापित राजकारण करतात. या सर्वांना कंटाळलेल्या जनतेने अनेकदा ऐक्य घडवून आणण्याचा प्रयत्न केला. बुद्ध-बाबासाहेबांच्या शपथा दिल्या. आत्मदहनाचे प्रयत्नदेखील झाले.
१९९०, १९९४, १९९८, २०११ या चार वेळी ऐक्य प्रत्यक्षात घडून आलं. पैकी १९९८ मध्ये लोकसभा निवडणुकीत अॅड.प्रकाश आंबेडकर, प्रा.जोगेंद्र कवाडे, रा.सु.गवई विदर्भातून आणि रामदास आठवले मुंबईतून निवडून आले. निवडून आल्यानंतर ऐक्याचे कवित्व संपलं, प्रत्येक नेता आपआपले शक्ती प्रदर्शन करू लागला. बेबनाव झाला आणि पुन्हा नेते वेगळे झाले. ऐक्य फार काळ मानवले नाही. जनतेने ऐक्याचा नाद सोडला. नेत्यांचे हे वैशिष्ट्यगुण असताना रिपब्लिकन पक्षात दररोज एका नव्या पक्षाची भर पडते आहे. त्यास पक्ष म्हणण्यासारखी परिस्थिती नाही. त्यामुळे गटबाजीचे हे राजकारण आज लाजिरवाणे झाले आहे. रिपब्लिकन पक्ष आकडेवारी पाहिली, तर आजमितीस ती ४० च्या वर आहे.

हे बेसुमार राजकीय गट राजकारणातही सुमार कामगिरी करतात. किंबहुना, ते नेमकं काय राजकारण करतात, हा मुलभूत प्रश्न आहे. अशी दयनीय राजकीय अवस्था असताना आंबेडकरी जनता मात्र आपला नेता बाबासाहेबांनाच मानत आली आहे. त्यांची निस्सीम निष्ठा व बांधिलकी बाबासाहेबांच्या वैचारिक चळवळीशी आहे. ती नुसतीच अंधभक्ती अन्् भाबडी नसून डोळस आहे. कोणतीही चळवळ उभी राहण्यासाठी तिला ठोस भूमिका आणि वैचारिक बैठक असावी लागते. चळवळ एकाकी उभी राहात नाही, ती कुणाच्या तरी खांद्यावर उभी असते. खांदे बळकट असतील, तरच चळवळ तगते, फुलते त्यावर उभे राहूनच भविष्याची वाटचाल होते. खांदे पोकळ, लेचेपेचे अन्् कच खाणारे असतील, तर त्यावर उभी राहणारी चळवळसुद्धा डळमळते, कोसळते, बाबासाहेब हे तथागत भगवान बुद्ध आणि क्रांतिबा जोतीराव फुले यांच्या मजबूत वैचारिक खांद्यावर उभे होते. या दोघांच्या भक्कम खांद्यांवर उभ्या केलेल्या चळवळीने नवा इतिहास लिहिला. त्या इतिहासाचे नायक अन् म्हणून युगपुरुष ठरले, ते अर्थात डॉक्टर बाबासाहेब तथा भीमराव आंबेडकर!

आंबेडकरोत्तर चळवळ ही बाबासाहेबांच्या पोलादी खांद्यावर आजही न डगमगता उभी आहे. मानवमुक्तीची ही चळवळ आंबेडकरी विचार वारसा जोपासत तो समाजात रुजवते आहे. सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात ती आग्रही आणि अग्रभागी आहे. आंबेडकरवाद हा समता स्वातंत्र्य- बंधूता- न्याय ही वैश्विक मूल्ये जपणारा आणि विवेकवादी वैशिष्ट्य असणारा वाद आहे, सामाजिक राजकीय आणि धार्मिक तिन्ही क्षेत्रात डॉक्टर बाबासाहेबांनी भरीव योगदान देवून समाजाला एक भक्कम इन्स्टिट्यूट पर्याय म्हणून दिले आहे. त्या अर्थाने,आंबेडकर हे एक परिपूर्ण स्कूल आहे.या वैचारिक स्कूलमध्ये शिकणारी व्यक्ती ही आयुष्यभर वरील वैश्विक मूल्ये जपत विवेकवाद जोपासते. गेली साठ वर्षे नियमित चैत्यभूमीला लाखो अनुयायी कोणतेही गालबोट लागू न देता अतिशय शिस्तबद्धरीतीने अभिवादन करत असतात, जगाच्या पाठीवर घडणारी ही दुर्मिळ घटना आहे.
तो काही चमत्कार नाही. हा संयम अन शिस्त येते आंबेडकरी विचारातून.
आंबेडकरी समाज अन्याय अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी तेवढाच संवेदनशील असलेला दिसतो. दुर्दैवाने, इतर दलित समाजाला असे अन्याय अत्याचाराविरुद्ध बंड करण्याचे भान अजूनही आलेलं नाही,असं म्हणावं लागेल. आंबेडकरीबौद्ध सोडले, तर आजही अशावेळी यल्गार पुकारणारे तुलनेत फार कमी आहेत.
आज कोणत्याही आंदोलनासाठी आंबेडकरी जनता राजकीय नेत्यांची वाट पहात नाही.
आंबेडकरी समाज गटात गटात विभागलेला असला, तरी अशावेळी मात्र सर्व विसरून तो एक होतो.
“डेड आंबेडकर इज मोर डेंजरस दॅन अलाइव्ह” याची प्रचिती अनेकदा देशाने घेतली आहे.

११ जुलै १९९७ रोजी घडलेलं घाटकोपर पूर्व येथील रमाबाई आंबेडकरनगर हत्याकांड,त्यात बळी गेलेल्या दहा निष्पाप नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आंबेडकरी समाजाने महाराष्ट्रात ठिकठिकाणी उग्र निदर्शने करत दहा वर्षे झुंज देत, अनुक्रमे सत्तेवर असणाऱ्या शिवसेना-भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस यांना गोळीबाराचे आदेश देणाऱ्या जातीयवादी मनोहर कदमवर गुन्हा नोंदविण्यास अखेर भाग पाडले. गुंडेवार आयोगाने मनोहर कदमला दोषी ठरवले, त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.
शिवसेनेने मनोहर कदमला स्वखर्चाने वकील दिला.पुढे सर्वोच्च न्यायालयाने त्यास जामीन दिला. शेवटी न्याय झालाच नाही. आंबेडकरी चळवळ आणि समाजाला या प्रस्थापित पक्षांनी आणि व्यवस्था चालविणारांनी नेहमीच अन्यायी अन्् अपमानकारक वागणूक दिली. आंबेडकरी समाज हे ओरखडे काळजावर झेलत संघर्ष करतो आहे. अन्याय अत्याचाराविरोधात त्याला मनस्वी चीड आहे. अन्याय मग तो समाजातील कोणत्याही घटकांवर झालेला असो, त्यासाठी प्रथम रस्त्यावर उतरतो, तो आंबडेकरी समाज.
२९ सप्टेंबर २००६ रोजी भंडारा जिल्ह्यातील खैरलांजीत घडलेलं हत्याकांड हे पुरोगामी अन् संतांची परंपरा सांगणाऱ्या महाराष्ट्रावर कधीही न पुसला जाणारा एक ठाशीव काळा डाग आहे. जनतेने कोणत्याही नेतृत्वाविना महाराष्ट्रासह देशभरात उस्फूर्त आंदोलने केली. आक्रमक आंदोनामुळे तत्कालिन सरकारला यात लक्ष घालावे लागले. सदर खटल्यात आंबेडकरी कार्यकर्त्यांनी अॅड.वाहावणे यांची नियुक्ती करावी, अशी मागणी केली होती. तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी ती मान्य करून नियुक्तीचे पत्रही दिले, परंतु ऐनवेळी सरकारी वकील अॅड.उज्वल निकम यांची नियुक्ती केली गेली. सदर खटल्यात अॅड.उज्वल निकम यांनी सामुहिक बलात्कारासाठी असणारे ३७६- ई हे कलम न लावता, साधे विनयभंगाचे कलम लावले. त्यामुळे खटला कमकुवत झाला. मुंबईतील शक्ती मिल बलात्कार प्रकरणी त्या तीन आरोपींना मात्र हे कलम लावण्याची मागणी अॅड. निकम यांनी केली आणि त्यानुसार त्यांना फाशीची शिक्षा देखील झाली आहे. त्यामुळे अनेक पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो आहे.
१ जानेवारी २०१३ रोजी आंतरजातीय प्रेमप्रकरणातून सोनई हत्याकांड घडले. तथाकथित उच्च (मराठा) आणि कनिष्ठ जात हा अडसर ठरला, त्यातून एकाच घरातील तीन तरुणांच्या देहांचे अक्षरशः तुकडे केले गेले. दुर्दैवी तरुण होते हिंदू-मेहतर (वाल्मिकी), हिंदू धर्मव्यवस्थेच्या जात उतरंडीत पूर्वास्पृश्य अन् आता लौकिक अर्थाने “दलित”.जातीयवादाचे बळी ठरलेल्या या तीन तरुणांचा एक भाऊ पंकज धनवार हा भारतीय सैन्यात सीमेवर कर्त्यव्य बजावतो आहे.आपल्याकडे सैन्यातील जवानांचा उपयोग अलीकडे भावनिक राजकारणासाठी केला जातो, म्हणून ही जास्तीची माहिती.
२८ एप्रिल २०१४ रोजी नितीन आगे प्रकरण घडले. त्यापाठोपाठ २४ ऑक्टोबर २०१४ रोजी जवखेडा घडले .या दोन्ही घटनांमुळे महाराष्ट्र हादरला सोशल मीडियामध्ये तीव्र पडसाद उमटले. यात नितीन आगे हा हिंदू-मातंग. हिंदू एकता, समरसता अशा गप्पा मारणारे, मुस्लिम समाजाची भीती दाखवत सर्व हिंदुना त्याविरुद्ध उभे राहण्यासाठी भडकवणारे तथाकथित हिंदू उच्चजातीय आपल्याच हिंदू दलित बांधवांच्या देहाचे सुपारी कातरावी, तसे तुकडे करून फेकून देतात, अशावेळी कुणी हे थांबवा म्हणून चिंतन मनन प्रबोधनात्मक शिबीर घेताना दिसत नाही. काळीज हलते ते फक्त आंबेडकरी समाजाचे, अस्वस्थ होतो, तो फक्त आंबेडकरी तरूण. यातून आपल्याकडे एक विचित्र समज निर्माण झाला. “दलित” म्हणले की डोळ्यासमोर येतो तो आंबेडकरीबौद्ध समाज. प्रसारमाध्यमांनाही “दलित”शब्द कोण प्रिय. बातमीचे वृत्तांकन करताना दलित शब्द वापरला की काम झाले. त्यामुळे इतर तथाकथित उच्चजातींना तसा समज आहेच, परंतु वंचित मागास जातींचाही असाच गैरसमज आहे. दलित हत्याकांड झाले तरी बौद्धेतर जाती त्याविरुद्ध उतरताना दिसत नाहीत.भले ती घटना आपल्याच जात बांधवासोबत घडलेली का असेना.

नितीन आगे प्रकरणात मातंग समाजातील एकही संघटना न्यायासाठी रस्त्यावर उतरलेली नव्हती. अलीकडे काही मातंग संघटना ‘पिवळा सलाम’ म्हणतात. पिवळा झेंडा घेऊन एससी प्रवर्गातून वेगळे आरक्षण हवेय, अशी मागणी करतात.स्वभान आलं पण कसं? जातीय अस्मिता किती टोकदार झालीय, याचे हे उदाहरण. कोणत्याही अशात दलित हत्याकांडाच्या वेळी पोलिसांची भूमिका ही नेहमीच संशयास्पद राहिली आहे. पोलीस प्राथमिक रिपोर्टच असा बनवतात, कि केसच उभी राहणे मुश्किल होते. याचा अनेकदा प्रत्यय आला आहे. सोनईच्या घटनेत सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्याचा प्रताप केला. त्यांनतर व्ही. ए. दौलताबादकर यांच्या न्यायालयात खटल्याच्या सुनावणी दरम्यान सकाळी ११ ची वेळ असताना आरोपींना चक्क दुपारी तीन वाजता हजर करण्यात आले. अर्थात सुनावणी होऊ शकली नाही. न्यायालयाने पोलिसांची कानउघाडणी केली. पोलिसांना ना न्यायालयाची भीड ना कसली तमा.
अशा धर्तीवर अॅट्रॉसिटी अॅक्टचा गैरवापर होतो, अशी नेहमी खोडसाळपणे आवई उठवून तो रद्द करा,अशी मागणी केली जाते. खैरलांजीसारख्या प्रकरणात अॅट्रॉसिटी लावला जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हे कार्यतत्पर पोलीस खोट्या अॅट्रॉसिटीजच्या केस कशा काय दाखल करून घेत असतील, हे फारच रोचक वाटते. मुळात जातदांडगे -धनदांडगे लोक या कायद्याला घाबरून आहेत. आणि त्यांच्या सरंजामीवृत्तीवर या कायद्यामुळे बऱ्यापैकी अंकुश बसला , हे वास्तव आहे. म्हणून त्याचा वेळोवेळी विरोध केला जातो. अशा वेळी एक दबाव गट हवा. खंबीर नेतृत्व हवं, तो दबाव गट सोशल मीडियाच्या माध्यमातून आंबेडकरी तरुणांनी बऱ्यापैकी परिणामकारक असा बनवला आहे. केवळ सोशल मीडियात न राहता तो ग्रासरूट लेव्हलवर काम करतो आहे.समाज सध्या नेतृत्वहिन असला, तरी आंबेडकरी चळवळ आज परिणामकारकरित्या आपली भूमिका निभावते आहे.
सोशल मीडिया प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियातही ही परिणामकारकता आता दिसून येते आहे.
सोशल मीडिया नव्हता, तेव्हा दलित अत्याचाराच्या बातम्या या फार उशिराने वर्तमानपत्रातून समजत होत्या.अलीकडे सोशल मीडियामुळे बातम्या ताबडतोब जनमानसात पोहोचतात. सदर घटनांवर सामान्यांना प्रतिक्रिया व्यक्त करायला पूर्वी माध्यमही नव्हतं,ती कमतरता सोशल मीडियाने भरून काढली. अशा बातम्या आल्या की आंबेडकरी तरुण अस्वस्थ होतो. पूर्वी शिक्षण ,नोकरी यात वेळात वेळ काढून स्थानिक पातळीवरील विभागीय कार्यक्रम आणि अवांतर वाचन होत असे. यातही एखादा उत्साही असेल तरच तो भाग घेई. वैयक्तिक पातळीवर होणाऱ्या चर्चाही सीमितच, त्यामुळे प्रत्यक्ष चळवळीत काम करणाऱ्या सुशिक्षित तरुणांची संख्या रोडावली होती. हे चित्र सोशल मीडियाने बदललं.नोकरी शिक्षणात व्यस्त असलेला सुशिक्षित आंबेडकरी तरुण पुन्हा चळवळीकडे ओढला गेला. किंबहुना, आता त्याला एक व्यापक आणि परिणामकारक स्वरूप आलं आहे.
आपल्या जबाबदारीचे भान आलं आहे.
कोणत्याही दलित मागास वंचित घटकावर झालेला अन्याय अत्याचार, हा आंबेडकरी समाजाला आपल्यावरील अन्याय वाटतो. कारण सारा मागास शोषित वंचित समूह हा एकच आहे, हा आंबेडकरी चळवळीची मूळ वैचारिक सिद्धांत राहिला आहे. उत्तर प्रदेश दादरीमध्ये गोमांसची अफवा उठवून खून करण्यात आलेलं अखलक प्रकरण असो मद्रास आयआयटी आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल असो कि दिल्ली जेएनयु कन्हैया कुमार या सर्वांसाठी आंबेडकरी चळवळ खंबीरपणे उभी राहिली. हैद्राबाद रोहित वेमुला आत्महत्या प्रकरणात आंबेडकरी विद्यार्थ्यी संघटना आणि डाव्या संघटना यांनी देशात अक्षरशः रान उठवले. त्याचा परिणाम एवढा तीव्र होता कि आरएसएसने त्यामुळे बिथरून काही मोर्चांवर थेट हल्ले केले. विद्यार्थ्यी विंग एबीव्हीपीने हल्ले केले. मीडियाला हाताशी धरून देशद्रोहाच्या कहाण्या रचण्यात आल्या. शिवाय पोलिसी बळाचा वापर करून आंदोलने चिरडण्याचा प्रयत्नही झाला. तरीही आंबेडकरी तरुणांनी देशभरात ठिकठिकाणी निदर्शने केली. निषेध केले. सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया सगळीकडे आपली परखड भूमिका मांडत अन्यायाविरुद्ध बंड करून प्रत्यक्ष रस्त्यावर उतरली, आंबेडकरी चळवळ. सरकारला याची दखल घ्यावी लागली, केंद्रीय मंत्र्यांना संसदेत जबाब द्यावा लागला.रोहितला अजून न्याय मिळालेला नाही, त्यासाठी अजूनही संघर्ष चालूच आहे. सध्या आंबेडकरी चळवळीला कोणतेही ठोस नेतृत्व नसताना विवेकावादाची कास धरत अन्यायाविरुद्ध संवैधानिक मार्गाने दाद मागत संघर्ष करण्याचे बळ आणि भान आलेय, ते केवळ आंबेडकर नावाच्या धगधगत्या ज्वालामुखीमुळे.
आता इथून पुढील संघर्ष हा शिक्षण आरक्षण आणि संविधान यांच्यासाठी करावा लागणार आहे. देशात आजही कुठे न कुठे बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना होते, सोशल मीडियात अपमानजनक मजकूर येतो. अनेक लोक त्यांच्या जातीवरून आपली संस्कृती दाखवून देतात. यावर एक सांगावेसे वाटतं. युरोप खंडात हंगेरी नावाचे एक राष्ट्र आहे. तिथे रोमा नावाची एक भटकी जमात आहे, ज्यांना ‘जिप्सी’ म्हणूनही ओळखले जाते. तिथे ते नागरी हक्कांपासून वंचित होते. त्यांच्या डेर्डेक तिबोर या नेत्याला इंटरनेटद्वारे बाबासाहेब त्यांचे कार्य कर्तृत्व अन्् विचार समजले. डॉ. आंबेडकरांना प्रेरणास्थान मानून त्यांनी ‘जयभीम नेटवर्क’उभारलंं. सरकारशी झगडून आपले हक्क मिळवले. मुला-मुलींसाठी ‘डॉक्टर आंबेडकर स्कूल’ याच नावाने सॅजेकझा, ओझ आणि हेगिमेग या गावांमध्ये शाळा क
ाढल्या. डेर्डेक तिबोर इतक्यावर थांबले नाहीत, त्यांनी स्वत: बुद्धिस्ट धम्म स्वीकारला. समुदायालाही त्याची दीक्षा दिली. जगात जिथे कुठे वंचित अन्यायग्रस्त नाडलेला समाज असेल, त्यांना बाबासाहेब त्यांचे विचार हे कायम प्रेरणादायी ठरणार आहेत. त्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने विश्वरत्न विश्ववंदनीय ठरतात हे खरे, परंतु,शेवटी जाताजाता वर्तमानातला राजकीय नेतृत्वाचा प्रश्न अधोरेखित करणाऱ्या या ओळी उधृत केल्याशिवाय रहावत नाही.
सुज्ञानाचा निर्मळ झरा, भीमासारखा माणूस खरा जन्मा येईल का....?
माझ्या भीमरायावानी सांगा पुढारी होईल का...?

milindgalaxy80@gmail.com