आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिकीकरणाच्या भोवऱ्यात लोककलांची भिरभिर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विसाव्या शतकातील प्रसिद्ध विचारवंत एरिक फ्रॉर्म यांनी ‘दि सेन सोसायटी’ या ग्रंथात लोककलांना ‘कलेक्टिव आर्ट’ म्हटले आहे. माणसाच्या नैसर्गिक जगण्यातून सामुदायिक कलांची निर्मिती कशी होते, याविषयी मूलभूत मांडणी फ्रॉर्म यांनी केली आहे. कोणत्याही लोकसमूहाचा लोकाविष्कार हा त्या लोकसमूहाच्या प्रागतिक इतिहासाला दृष्टी देणारा असतो. लोककलांना या अर्थाने समजून घेतले पाहिजे. खरे तर लोककला म्हणजे मानवी समूहाने स्वतःशी आणि इतरांशी साधलेला लोकसंवादच असतो. मनातल्या आणि बाहेरच्या जगाला इंद्रियांद्वारे अर्थपूर्ण, निपुण, सर्जनशील, क्रियाशील आणि भागीदारीसह प्रतिसाद देण्याला लोककलेत फार महत्त्व आहे. भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांतल्या लोककला पाहिल्या की, या लोककलावंतांनी ही सांस्कृतिक वैविध्यता किती समर्थपणे जपली आहे, हे लक्षात येते. ग्रामीण, अशिक्षित माणसाच्या भावविश्वाशी जोडून त्याला चिंताग्रस्ततेपासून दूर नेण्याचे काम लोककलांनी केलेच; परंतु त्यांच्या मनातील शृंगार भावनेचा निचरा करून समाजाचे सामाजिक आरोग्य सांभाळण्याचे कामही लोककलांनी केले, हेही नाकारता येत नाही. म्हणूनच लोककला ग्राम्य आणि अश्लील असतात, असा शिक्का मारून पांढरपेशी समाज लोककलांना जी नाके मुरडतो, तेही कला म्हणून लोककलांवर अन्याय करणारे ठरते.

महाराष्ट्रात ‘तमाशा’, ‘जागरण-गोंधळ’, ‘दशावतार’, ‘लळित’, ‘भारूड’, ‘दंडार’ इ. लोककलांची मोठी समृद्ध परंपरा दिसते. उत्तरेकडे ‘रामलीला’, ‘रासलीला’, आंध्रप्रदेशात ‘करकट्टम’, ‘कुचिपुडी’, केरळमध्ये ‘कथकली’, राजस्थानच्या ‘कठपुतली’, ‘घुमर’, पंजाबचा ‘भांगडा’, आसाममधील ‘िपहू’  या काही प्रमुख लोककला आपल्याला दिसतात. पण भारतात कुठेही गेलो, तरी लोककला आणि लोककलावंतांची स्थिती चांगली दिसत नाही. एकीकडे चित्रपट, नाटक आणि टीव्ही मालिकांची आर्थिक उलाढाल आणि ग्लॅमर, तर दुसरीकडे लोककलावंत मात्र भिकेला लागले आहेत, असे विरोधाभासी चित्र आपल्याला का दिसते?लोककलांकडे शासन, माध्यमे, अभ्यासक्रम, रसिक आणि कलावंत या सगळयांनीच आपापल्या मतलबापुरते पाहिल्यामुळे लोककलांचा कला म्हणून प्रवास खुंटित झाला, असे म्हणायला बराच वाव आहे. व्यवसाय आणि कला अशा दोन स्तरांवर लोककलांचा विचार केला, तर वाढत्या बाजारूपणामुळे लोककला कला म्हणून किती उरल्या, आणि व्यवसाय म्हणून कुठे निघाल्या आहेत? असा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.

भारतात कुठेही गेलो तरी, लोककलावंतांची अवस्था दयनीय झाल्याचे दिसते. लोककलावंतांच्या माथी हे भिकारीपण कुणी लादले? लोककला आणि लोककलावंतांची प्रतिष्ठा कुणी नाकारली? त्यांचे सामाजिक न्यायाचे प्रश्न अधिकाधिक उसवत का गेले? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम अभ्यासकांनी करायला हवे होते. पण तसे झाले नाही. महाविद्यालये आणि विद्यापीठांच्या पातळ्यांवर लोककलांचा जो अभ्यास व्हायला हवा होता, तसा तो झाला नाही आणि आजही होत नाही. केवळ भाषिक अभ्यास आणि उत्सवप्रिय उदात्तीकरणाच्या नादात लोककलांवरील संशोधनातले समाजभान डिलिट होत गेले आहे. लोककलांवरील संशोधन समाजशास्त्रीय दृष्टीने झाले नाही, तर त्यातील दमनाच्या, शोषणाच्या आणि जातवर्चस्वाच्या कहाण्या कळणार नाहीत.

लोककलांच्या अधोगतीला केवळ एका घटकाला जबाबदार धरून चालणार नाही. कलावंत, प्रेक्षक, मालक, अभ्यासक, माध्यमे आणि शासन हे सारे घटक थोडे-बहुत फरकाने लोककलांच्या दयनीय अवस्थेला जबाबदार आहेत. एक तर बहुतांशी लोककला विधीनाट्याला जोडल्यामुळे त्यातली कला लोप पावली. दुसरे म्हणजे, आधुनिक माध्यमांचा विस्तार आणि प्रेक्षकांची बदलती अभिरुची, या गोष्टींनी लोककलांना सतत अस्थिर ठेवले. गावगाडा व त्यातील ग्रामीण जनजीवनाच्या भावविश्वाशी लोककला समरस झालेल्या आहे. पण आधुनिकीकरणाच्या येण्याने लोककला आणि लोककलावंतांची जी सैरभैर अवस्था झाली, ती टोकदारपणे मांडण्याचे काम अभ्यासक-संशोधकांकडून झाले नाही. शासनानेही त्यांना भरीव आधार दिला नाही. सामाजिक प्रतिष्ठेचा अभाव, आर्थिक दारिद्र्य आणि मानसिक कुचंबणा अशा तिहेरी विळख्यात आज लोककलावंत अडकला आहे. त्यांच्या दर्दभऱ्या जगण्याला जसा जसा आधार मिळेल तशा त्यांच्या अभिव्यक्तीतून साकारलेल्या लोककला कला म्हणून सक्षम होत जाणार आहेत.

प्रसारमाध्यमांमध्ये लोककलांचे जे चित्र साकारले जाते, तेही फारसे वास्तव नाही. विशेषतः इलेक्ट्रॉनिक माध्यमांना लोककलेची ‘न्यूज व्हॅल्यू’ महत्त्वाची वाटते, तर प्रिंट मीडियाला लोककलांचा रंजक चेहरा हवा असतो. अशा वेळी लोककलेच्या कलाप्रसाराचा मूळ हेतू दूर राहतो, आणि शृंगारकहाण्या मोठ्या होतात.
 
जागतिकीकरणात लोककलांचे काय होईल? असा प्रश्न आहे. याचे साधे व सरळ उत्तर द्यायचे झाल्यास, जागतिकीकरणात लोककला आपला पारंपरिक चेहरा बदलून आधुनिक कलांचे अनुकरण करतील, हे उघड आहे. तमाशाचा ऑर्केस्ट्रा होण्यामागे आर्थिक बदल कारणीभूत आहे. आधुनिक वाद्ये, लाईट, संगीत, नृत्य या गोष्टींचा भपकेबाजपणा तमाशात आला, तो केवळ प्रेक्षकांची मागणी म्हणून आला, असे नाही तर ग्रामीण तरुणांची अभिरुची बदलणाऱ्या आर्थिक-औद्योगिक बदलाचेही ते कारण आहे. जागतिकीकरणाने जगभरातल्या साऱ्याच कलांचा चेहरा बदलला आहे. त्यामुळे जागतिकीकरणात ज्या लोककला उत्पन्नाला जोडलेल्या आहेत, त्या आपला चेहरा बदलून अधिक उत्पन्नाला जोडल्या जाण्याचा प्रयत्न करतील, आणि ज्या लोककला समाजातल्या रूढी-परंपरांना जोडलेल्या आहेत त्या नामशेष होण्याचा मार्गाला लागतील, असे वाटते. महाराष्ट्रातल्या पिंगळा, ‘लळित’, ‘भारूड’, ‘जागरण’ यांसारख्या कितीतरी लोककला आज नामशेष होताना दिसत आहेत. तर ‘तमाशा’, ‘लावणी शो’  यांसारख्या लोककलांनी मागणी तसा पुरवठा, या बाजाराच्या तत्त्वाप्रमाणे आपला पारंपरिक चेहरा बदलून गल्ला भरण्याचे नवे नवे मार्ग निवडले आहेत. त्यामुळे लोकतत्त्वाचा आधार असलेल्या लोकसमूहातून अाविष्कृत झालेल्या परंपरांचे वाहक असणाऱ्या लोककला जागतिकीकरणात पारंपरिक अर्थाने टिकणार नाहीत, हे उघड आहे. पण त्यांनी का टिकावे? असा प्रतिप्रश्न विचारला, तर याचे उत्तर सामाजिक दृष्टीने सकारात्मक देता येत नाही. 

लोककलांनी सतत आपल्या धर्मविधींना, रुढींना आणि कर्मकांडांना प्रमाण मानले. त्यामुळे धर्मनिरपेक्ष विज्ञानवादी प्रागतिक दृष्टीने लोककला टिकाव्यात, असे कुणाला वाटणार नाही. गावगाड्यात जातीव्यवस्था घट्ट करणाऱ्या सामंती देशीवादी जाणिवांना सांस्कृतिक अर्थाने खतपाणी घालण्याचे काम लोककला करतात, हे कसे नाकारता येईल? आपल्या गावात यात्रेला तमाशा आणून महार-मांग-कोल्हाट्याच्या बाया नाचवल्याची, जातवर्चस्वाची पाटीलकी गावातला मोहरक्या मिरवतोच ना? त्यामुळे आपल्या देशीवादी कलांची समाजशास्त्रीय चिकित्सा करून त्यांची प्रागतिक सांस्कृतिक मीमांसा करायला हवी. अन्यथा, लोककलांच्या उदात्तीकरणाच्या नादात कलावंतांच्या सावल्या छोट्या होतील, आणि धर्मांच्या सावल्या अधिक मोठ्या होत जातील. 
- डॉ. मिलिंद कसबे
संपर्क : ९७६६९८४७७०
 
 
बातम्या आणखी आहेत...