आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांचा, थारु म्हातारी आणि पिंग...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'शाब, अब हम आपको अलविदा करेंगा, नेपाळी तरीके शे’ असं म्हणून घरी आल्या पाहुण्याला निरोप देताना खास नेपाळी पद्धत म्हणून कांचानं एक हळदुल्या रंगाचे रेशमी कापड माझ्या गळ्यात अडकवले आणि मिठी मारली...

आता या घटनेला तशी सहा-सात वर्षे होऊन गेली. खरं तर त्यानंतरही एकदा मी सहकुटुंब नेपाळला जाऊन आलो, तेव्हा तिथं असतानाही मला या कांचाची आठवण नव्हती झाली, जेवढी ती या दोन दिवसांत प्रकर्षानं झाली. नेपाळमध्ये भूकंप झाला, ज्याचे धक्के आजही सातत्यानं जाणवताहेत. या नैसर्गिक आपत्तीचे परिणाम काय झाले, हे वृत्तपत्र, टीव्ही आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून जेव्हा समोर आले, तेव्हा निश्चितच माझ्या मनाने मला पहिली प्रतिक्रिया दिली ती अशी की, एक अतिशय जुनी, सुंदर आणि अतिथिशील संस्कृती नाश पावली की काय? माणूस इतिहासापासून फार मोलाचे धडे घेतो आणि आपले ऐहिक जीवन सुंदर व सुकर बनवत असतो. पण इतिहासापासून शिकण्यासाठी त्या-त्या संस्कृतीचे अवशेष अस्तित्वात राहणे फार महत्त्वाचे असते.
नेपाळची संस्कृती ितथल्या चिंचोळ्या गल्ल्यांमधून मी अनुभवली. सातत्याने थंड असणाऱ्या या प्रदेशातील विटांची घरं. त्या गल्ल्यांमधील विटांचे रस्ते. घर असो वा दुकान, ऑफिस असो वा शाळा, सर्वत्र दर्शनी बाजूवर लाकडी कोरीव काम लक्ष आकर्षून घेत होतं. प्रत्येक चौकात कोपऱ्यावर बस थांब्यासारखी एक रचना, जी गावातील वृद्धांना बसण्यासाठी केली होती. ती सांगत होती, आपल्या घरातील, गल्लीतील, गावातील वृद्धांची काळजी आपण साऱ्यांनीच घ्यायची आहे. आज ज्या काळात वृद्धाश्रमांची संख्या वाढती आहे, अशा काळात तर या इतिहासाच्या खुणांची गरज फारच होती. पण... सगळं संपलं, जमीनदोस्त झालं.
नेपाळच्या पहाडी प्रदेशात अतिशय काठिण्य पातळीवरील सरावातून बाहेर पडून भारताच्या गुरखा रेजिमेंटमध्ये बहादूरपणे लढणारे सैन्य पुढे आपण कसे पाहणार? उंच चार बांबूचे पिंग बांधून त्यावर उंच आकाशात झोका घेणारी नेपाळी मुलं. स्वप्नं होती त्यांची, उंचच उंच भरारी घेण्याची. ती चिल्लीपिल्ली आता मी पाहतोय रेस्क्यू कॅम्पमध्ये, अंगाभोवती जाड कापड लपेटून, हातात मिळालेलं अन्न वाटीतून खाताना. त्यांची स्वप्नं आणि तो पिंग इमारतींच्या ढिगाऱ्याखाली कायमचा पुरला जाऊ नये. पुन्हा पिंग उभे राहावेत, पुन्हा त्यांच्या झोक्याने उंच आकाशाला गवसणी घालावी.
"क्या हुआ? नहीं दिखा क्या गईडा(गेंडा)? चलो ठीक है। कल सवेरे फिर से जल्दी जाना, जरूर दिखाई देगा गईडा।’ चितवनमधील त्या रिसॉर्टच्या मॅनेजरचे आश्वासक शब्द अातासुद्धा माझ्या कुठून तरी कानावर आले. दुसऱ्या दिवशी परत आठवणीने आम्हाला हत्तीची सवारी दिली गेली. तासाभराच्या भ्रमंतीनंतर एका थोराड गेंड्यानं दर्शनही दिलं. ते जंगल, मॅनेजर आणि गेंडा; काय झालं असेल त्यांचं‌‌? सगळे सुरक्षित असावेत, एवढंच. नीटसं आठवत नाही, पण धूसर का होईना त्या थारू आदिवासीच्या घरातील लक्ष्मीचा चेहरा समोर येतोय. किती प्रेमानं आणि आदरानं खारवलेला मासा आणि तांदळापासून तिनं स्वत: तयार केलेली रॉक्सी आम्हा पाहुण्यांना दिली होती. त्या रॉक्सीची चव आता-आताशीही जिभेवर रेंगाळते आहे. त्या प्रेमाची, थारूंच्या विशिष्ट घरांची आणि जिला साधूचा दर्जा दिला गेला, पण अविवाहित राहून आजही वयाच्या ८६व्या वर्षी हातात खुरपं घेऊन शेतात काम करणारी ती थारू म्हातारी... हे सारे आजही तितक्याच कणखरपणे तिथे उभे असतील? त्यांनी तसं असावं.
ज्याच्या कुशीत रात्रीच्या वेळी प्रवेश केला होता आणि रस्त्याच्या दुतर्फा रंगीबेरंगी झगमगाटाने आमचं स्वागत केलं होतं, माझा शेजारी गोवा त्याची आठवण मला ज्या शहरानं करून दिली, त्या पोखरातील इमारती अशा वेगवेगळ्या कोनात पडलेल्या पाहून मी विचारशून्य झालोय. याच पोखऱ्याच्या शेजारील सारंगकोट डोंगराच्या माथ्यावरून हिमालयाचं दर्शन घेतल्यावर मी म्हटलं होतं, ‘निसर्ग सुंदर असतो, निसर्ग सुंदरच असतो.’
पण निसर्गाचं हेही रूप असतं, हे मान्य करायला मन अजून तयार नव्हतं.
सकाळीच एका वर्तमानपत्रात फोटो पाहिला आणि वाटलं, चुकलंच बुद्धाचं... स्वयंभूनाथाच्या समोरील एक इमारत जमीनदोस्त झालेली आणि त्या इमारतीच्या ढिगाऱ्यामागे सोनेरी रंगाची, शांत पद्मासनात बसलेली, अर्धोन्मिलीत डोळे असलेली बुद्धाची मूर्ती. आयुष्यभर सभोवतालच्या माणसांना अहिंसेची शिकवण देत आला; पण ते निसर्गाला सांगायला विसरला. चुकलंच बुद्धाचं.
नेपाळच्या अशा बहुविध रूपांची ओळख करून देत, हसतमुख चेहऱ्यानं शेवटच्या दिवशी विमानतळावर आम्हाला निरोप देताना बिलगलेला कांचा... त्याच्या आठवणीनं हवालदिल झालोय.
कुठे असेल तो? परत भेटेल? आणि आपल्या गाडीला जोरात ओव्हर टेक करून पुढं जाणाऱ्या गाड्या पाहून परत एकदा म्हणेल, ‘अरे, शाब जाना है। उसकू जल्दी जाना है। हमकू फोटूं खिंचते जाना है। वो पहले उपर जाईंगा। हम बादमा जाईंगा।’
परत जेव्हा योग येईल तेव्हा कांचाचा तोच हसरा चेहरा समोर यावा, एवढीच इच्छा.

milindyadav09@gmail.com
(लेखक कोल्हापूरच्या शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये कलाशिक्षक असून त्यांचे निर्मिती विचार मंचतर्फे ‘नेपाळ नावाचं गूढ’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.)