आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुढच्या आठवड्यात मी बाळंतपणाची रजा संपवून कामावर रुजू होतेय. आयटीतली नोकरी, त्यात ऑफिस घरापासून किमान सव्वा तासाच्या अंतरावर, त्यामुळे मुलगा किमान 12 तास दूर असणार हे नक्की. सासूबाई आमच्या लग्नापूर्वीच गेलेल्या त्यामुळे छोट्याला पाळणाघरात ठेवावं लागणार हे निश्चित होतं. मग महिनाभरापूर्वीच जवळच्या पाळणाघरांची शेजारच्या वहिनींकडे चौकशी केली. वहिनींच्या भावाची मुलगी पूर्वी तिथे होती काही वर्षं आणि छान आनंदात होती, असं कळल्यावर तिथे जाऊन आम्ही दोघं ते पाहून आलो. छान वाटलं वातावरण. आता त्याला चारपाच तास तिथे ठेवतेय रोज. मस्त मजेत असतो तिथे, बाकीची छोटी मुलं त्याला खेळवतात, गप्पा मारतात, कविता ऐकवतात, त्यामुळे मी ऑफिसला जाऊ लागल्यावर त्याचं टेन्शन वाटणार नाही.
मी सॉफ्टवेअर इंजिनिअर. ट्रेनर म्हणून नोकरी करतानाच मी पार्टटाइम मॅनेजमेंटचा कोर्स केला. संध्याकाळ सहापर्यंत माझं काम संपायचं ऑफिसमधलं, नंतरचे तीन तास घरात टाइमपास करण्यापेक्षा शिकलेलं बरं असा मी विचार केला. मी ज्या काकांकडे राहून शिकत होते, त्यांची मुलगी पण पार्टटाइम शिकतच होती.
त्यामुळे मला माहीत होतं, मलाही हे शक्य आहे. हा कोर्स करत असतानाच लग्न झालं. आधीच मी स्पष्ट सांगितलं होतं की, मला हे शिक्षण पूर्ण करायचंय. सकाळी आठला बाहेर पडेन, परत यायला रात्रीचे अकरासुद्धा वाजू शकतात; पण सासरच्या कोणी आक्षेप नाही घेतला. नव-याने पूर्ण पाठिंबा दिला, म्हणाला, तुला जे जमेल ते कर, नो प्रॉब्लेम. सासूबाई नोकरी करायच्या नाहीत, त्यामुळे या दोघांना घरात फार काही करायची सवय नव्हती. स्वयंपाकाला मावशी होत्या अनेक वर्षांपासून. त्या जे आणि जसं करत, हे दोघे ते तक्रार न करता खात. त्या अजून आहेत, त्यांचा खूप आधार आहे. या दोघांनाही आता मी दिवसभर नसते घरात, त्यामुळे छोटी छोटी कामं करायची सवय लागलीय.
मातृत्व नि मॅनेजमेंटची डिग्री एकदमच पदरात पडली. बाळंतपणाची तीन महिन्यांची रजा संपल्यावर लगेच ऑफिसला जाणं मला योग्य वाटलं नाही म्हणून रजा वाढवून मागितली. नसती वाढवून मिळाली तर नोकरी सोडायची तयारी ठेवली होती, कारण आयटीमध्ये बे्रक सहा महिन्यांचा की दोन वर्षांचा, त्याने फरक नाही पडत. पण रजा वाढवून मिळाली. आता जायला लागल्यावर पाहणार की प्रवास, ऑफिसमधलं काम, घरी आल्यावर छोटू, सगळं कसं जमतंय ते. नाही जमलं तर नोकरी सोडेन, पण घरात बसून नाही राहणार. एखादा फायनान्समधला कोर्स करायचा विचार आहे. किंवा एखाद्या कॉलेजात शिकवायला जाईन पार्टटाइम किंवा फ्रीलान्स काम करेन. जवळजवळ सहा महिने घरी असले तरी मी माझ्या फील्डशी संपर्क सोडलेला नाही, कायकाय चाललंय, ट्रेंड कसला आहे, मी काय करू शकेन यावर मी पूर्ण लक्ष ठेवून आहे. त्यामुळे पूर्णवेळ नोकरी मिळाली नाही करता आली सध्या तरी चालेल, पण मी काम करत राहणार. स्वावलंबी असणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.