आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिकित्सा : मन तळ्यात-मळ्यात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रडतानाही मन विचारच करत होतं. काल रात्री दादाने किती समजुतीने घेतलं. आणि आज?? एवढा विचित्र कसा वागू शकतो तो? कालच्या आणि आजच्या दादात किती फरक आहे! असं काय झालं असेल की दादा डायरेक्ट गृहीत धरून चालू लागला दॅट आय एम हॅविंग अ‍ॅन अफेअर विथ राकेश. आणि हाइट तर बघ शारदे, तुझ्याशी कसा खेकसून वागतो आणि राकेशशी! नंबर घेतला त्याचा. व्हॉलीबॉलला बोलावलं. एवढं गूळपीठ! बाय द वे, उद्याचं काय? उद्या परत राकेश येईलच बोलायला. काय सांगणारेस त्याला तू? उद्या कसा पळ काढणार? आजपण दादा भेटला नसेल नं त्याला!
ए तू झोप गं, मलापण झोपू दे. - मी
सकाळ झाली. माझी अर्धी रात्र रडण्यात आणि विचारात गेली होती. अजिबात उठवत नव्हतं.
शारदा, ऊठ चल. सात वाजले. किती लोळशील?
आई, पाच मिनिटं, बस.
ऊठ! बाबांना तयारी करायचीय तिकडे.
मी उठले. झोप खुपणारे डोळे मिचमिच करत चोळत मी घरभर फिरले. कुठे गेला? दादा कुठे गेला? आऽऽऽईऽऽऽ..दादा कुठेय?
अहो, आज सूर्य कुठून उगवलाय बघा जरा बाहेर. कोण कोणाला शोधतंय बघा.
आई गप ना. सांग पटकन कुठे गेलाय. आई, आई. पटकन.
अगं काय झालं एवढं. गाडी पुसतोय खाली.
जीव भांड्यात पडला. मला वाटलं, राकेशला भेटायला. छे एवढ्या सकाळी!
फोन. दादाचा फोन. त्याने नंबर घेतलाय राकेशचा. डिलीट करून टाकते. त्याला काय कळणारेय. कुठे ठेवला असेल याने फोन? सोबत नेला नसेल ना!
काय शोधतेस गधडे?
अं अं...
कार्टे, तोंड धू आधी. मग फोन शोध.
दादा आला. आता काही शक्य नाही.
मी फोन शोधत नाहीये. फिरतेय फक्त इकडे-तिकडे.
ओहोहोहोहो.. हं.. म्हणे फिरतेय.
तिरसट.
कुजकट
झाली सकाळ. झाला दिवस सुरू. काल झोप केव्हा लागली कळलं नाही. पण डोकं चढलं होतं. नाक जाम झालं होतं. डोळे सुजून बारीक, लालेलाल झाले होते.
किती वाजेपर्यंत रडलीस काल ठमे?
त्याच चिनी डोळ्यांनी मी माझी स्पेशल खुन्नस दादाला दिली.
हे बघ तुझ्यावर संशय नाही घेतला मी. फक्त मला कळू देत की कुठे चुकतय ते. तुझ्या मनात तसं काही नसेल मान्य आहे. पण त्याची बाजू तपासली पाहिजे ना! शेवटी ही इज अ बॉय. मी आधीच म्हटलं होतं.
तुला काहीही वाटो रे, पण म्हणून तू त्याच्यासाठी माझ्यावर डाउट घेणारेस?
तू नाही त्याच्याचसाठी भांडत माझ्याशी?
आमचे वेगवेगळे सूर ऐकून आई बाहेर आली.
काय चालूये तुम्हा दोघांचं? तीन दिवसांपासून जरा जास्तच गुलूगुलू चाल्लंय!
उड्या मारते ही नुसती. गीत मंच. पेटी, गॅदरिंग. अजिबात अभ्यास नाही करत. म्हणून रागवतोय तिला.
ओ! हो! तू जसा खूप अभ्यासू, वाया चाल्लायस लेका! या रविवारी हे आले की त्यांना सांगणारे तुझ्या उंडारक्यांबद्दल. आणि मग दादा आणि आईतच जुंपली.
मला दादाचं असं दुटप्पी वागणं कळत नव्हतं. मधूनच माझ्याशी भांडायचा माझ्यावर संशय घेऊन. आणि मध्येच मला समजवायचा! दादाच्या मनात नक्की काय चालूये ह्या विचारात माझा दुपारपर्यंतचा वेळ गेला. तयारी झाली. हुश्श. देवा, प्लीज तू सांभाळून घे रे आज. मी काय उत्तर देऊ राकेशला?
तुला खात्री आहे की तो बोलायला येणारंच? व्वा व्वा, काय बाँडिंग आहे! -मन
ए येडे! बाँडिंग वगैरे काही नाही, पण एक सेफ साइड म्हणून आपलं.
शाळेत गेल्यावर राकेश गेटपाशीच उभा होता. मी त्याला पाहिलं. त्याने मला पाहिलं. मी मान खाली घातली आणि सरसर चालू लागले. तिरक्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत राहिले. तो माझ्याकडे येतोय का हे पाहत राहिले. पण! तो आलाच नाही. का?
सगळेच विचित्र वागत होते. दादा. राकेश. मी वर्गात गेले. आज मन खूप अस्वस्थ होतं. कुठल्याच तासाला लक्ष नव्हतं. वेळ काढायचा म्हणून मी कुठे कर्कटकाने बेंच कोरले, कुठे वहीच्या मागच्या पानावर चिरखडत बसले, कुठे उगाचच गुलाबी वॉटरबॅगमधून पाणी पीत बसले.
आणि मधल्या सुटीपर्यंतचा वेळ कसातरी काढला. डबा खायलाही गेले नाही. मैत्रिणींनी खूप बोलावलं, पण मी एकटीच बसून राहिले. मग एक मोठ्ठा श्वास घेतला आणि डोकं बेंचवर टेकलं. तेवढ्यात प्राजक्ता आली. ए हीरॉइन, आज काय बारा वाजवलेत तोंडावर?
ए गप यार! माझा मूड नाहीये.
ओह, मी बनवते तूझा मूड. बनवू? हातातल्या जाईच्या कळीबरोबर खेळत खेळत प्राजक्ता बोलली.
तुझी बकवास मला अजिबात ऐकायची नाहीये.
बरं! राकेश आला होता माझ्याकडे.
राकेश! का?
नको आहे ना बकवास. जाऊ दे.
नाटकं करू नको प्राजू. काय बोलला तो?
काही नाही. काय झालंय गं तुमच्या दोघांमधे? तो मला विचारत होता की तू बोलत का नाहीये त्याच्याशी.
माझ्या मनात राकेशला बदडून काढावं असं वाटत होतं. मला विचारतो ते पुरं नाही का? हिच्याकडे का गेला? मी वैतागवाणा चेहरा परत खाली वळवला.
काय झालं. सांग ना शारू, तिचं कळीबरोबर खेळणं चालूच. आता फुंकर मारून ती कळी फुलवायचा वेडा प्रयत्न करत होती.
काही नाही गं. आमची मैत्री तुम्हाला पटत नाही म्हणून मी मैत्रीच तोडून टाकली.
अगं! हे काही कारण झालं? शाळेत हे सगळं होतंच असतं! तू पचवायला शिक ना.
अगं, पण दादाला वाटतं की...
सोडून दे. दादा लोकं छळायलाच टपले असतात.
तोच राकेश आला. प्राजूने हातातली जाईची कळी हळूच मुठीत गच्च पकडली आणि त्याच्याकडे वळली.
माझे कान आतुर झाले होते राकेशचा आवाज ऐकायला. पण तो आला, हलक्या आवाजात प्राजक्ताशी कुजबुजला आणि निघून गेला. माझ्याकडे पाह्यलंही नाही. माझा चेहरा अजूनच उतरला.
तो जाताच प्राजू परत माझ्याकडे वळली आणि हातातल्या कळीशी खेळत खेळत म्हणाली. पण शारू, तो का गं एवढा खोदून खोदून विचारतोय तुझ्याबद्दल? त्याच्या मनात...
ती बोलायचं थांबली. पण तिला काय म्हणायचंय ते तिचं म्हणून झालं होतं. उरलेलं बोलणं आमच्या डोळ्यांनी केलं. आणि आम्ही दोघी फक्त बघत राहिलो एकमेकींकडे.