आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘मनातील पारंब्यां’ना शब्दांचे सकस खाद्य पुरवणारे मंडळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळच्या दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाची स्थापना सन 1994 मध्ये झाली आहे. महाविद्यालयाने संस्थापक तथा माजी आमदार कै. देविदास नामदेव भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून शैक्षणिक क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. मराठी वाङ्मय मंडळ संस्थेच्या स्थापनेपासून कार्यरत आहे. गेल्या वर्षी प्रा. डॉ. भारती बेंडाळे या मंडळाच्या चेअरमन होत्या. यंदाच्या शैक्षणिक वर्षात या मंडळाची धुरा वाङ्मयाची अभिरुची निर्माण करण्याचा ध्यास घेतलेल्या प्रा. डॉ. कांता भाला यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
साहित्याच्या प्रांतात विद्यार्थी रमले पाहिजे म्हणून मंडळातर्फे दरवर्षी कविसंमेलन घेतले जाते. नामवंत साहित्यिक, लेखकांना व्याख्यानासाठी निमंत्रित करून त्यांच्याशी खुला संवाद साधला जातो. भुसावळ विभागाची ओळख ‘सांस्कृतिक पंढरी’ झाली पाहिजे म्हणून संस्थाध्यक्ष कै. देविदास भोळे यांनी आपल्या परिसरातील वक्त्यांची व्याख्याने आयोजित करण्यावर भर द्यावा, असा सल्ला या मंडळाला वेळोवेळी दिला आहे. त्याची सुरुवात म्हणून त्यांच्याच पुढाकाराने 2002 मध्ये ‘कोसला’ कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.


नेमाडे यांनी त्या वेळी ‘साहित्याचा वर्तमान प्रवास आणि विद्यार्थीदशेतील डोळस लिखाण’ अशा विषयावर चिकित्सकपणे मीमांसा केली होती. त्यांच्या भारदार मिशा आणि वक्तृत्व शैलीने विद्यार्थी अक्षरश: भारावून गेले होते, अशी आठवण प्राचार्य डॉ. आर. पी. फालक हे साहित्यिकांशी गप्पा मारताना आवर्जून सांगतात. नैसर्गिक आपत्ती, सातपुड्यातील कुपोषण, प्रदूषण अशा विविध विषयांवर पोस्टर्स प्रदर्शन स्पर्धाही घेतली आहे. यंदा निमंत्रितांचे कविसंमेलन, भाषिक कौशल्याचा विकास आणि शुद्धलेखन विषयावर कार्यशाळा, स्त्री भ्रूणहत्या रोखण्याचा संदेश देण्यासाठी चर्चासत्र घेण्याचा संकल्प मंडळाने केला.


विद्यार्थ्यांना लिहिते करण्यासाठी कार्यशाळा
कादंबरी, कविता, लेख लिखाणाची गोडी लागावी, यासाठी कार्यशाळा घेण्यात आली आहे. साहित्यिक तथा जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर, डॉ. मंगला वैष्णव (औरंगाबाद), डॉ. नरेंद्र मोहन (नवी दिल्ली), डॉ. एन. एन. लांडगे (खिरोदा), उत्तर महाराष्‍ट्र विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. रवींद्र चिंचोलकर, पुणे विद्यापीठातील प्रा. डॉ. मनोहर जाधव, विश्वास मेहेंदळे यांनी व्याख्यानातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. ‘अक्करमाशी’ कादंबरीचे लेखक डॉ. शरणकुमार लिंबाळे यांनी ‘कादंबरी लिखाणाची शैली अन् सामाजिक वास्तव’ या विषयावर, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील प्रा. डॉ. सुदाम जाधव यांनीही विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले आहे.


‘अमोल’ नियतकालिक उलगडते भावविश्व
महाविद्यालयातील युवक-युवतींच्या भावभावनांचे विश्व उलगडण्यासाठी गेल्या दीड दशकांपासून ‘अमोल’ हे नियतकालिक प्रकाशित केले जाते. त्यात मराठी वाङ्मय मंडळाचा सिंहाचा वाटा असतो. नियतकालिकाचे मुखपृष्ठ हे सामाजिक, शैक्षणिक आणि वैज्ञानिक घडामोडींचा अचूक वेध घेणारे असते. साहित्याचा व्यासंग अन् विद्यार्थ्यांशी मित्रत्वाचे नाते निर्माण करणारे प्राचार्य डॉ. आर. पी. फालक यांच्या सक्रिय सहभागातून हे नियतकालिक प्रकाशित केले जाते. सामाजिक चळवळीत अग्रेसर असलेले प्रा. डॉ. एस. व्ही. बाविस्कर हे संपादक म्हणून काम पाहतात. त्यांना प्रा. अंजली पाटील, क्रीडा संचालक एस. डी. चौधरी, प्रा. श्रेया चौधरी, प्रा. डॉ. कांता भाला, विद्यार्थी प्रतिनिधी जितेंद्र भोळे यांची खंबीर साथ मिळाली आहे.


वाचनसंस्कृतीला बळ देणारे उपक्रम
वादविवाद, वक्तृत्व, निबंध लेखन, पुस्तक परीक्षण, काव्यलेखन अशा स्पर्धा घेऊन या मंडळातर्फे वाचन संस्कृतीला बळ देण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या वैचारिक पातळीचा वेध घेण्यासाठी आणि त्यांच्या अंगी असलेल्या साहित्यगुणांना बहर यावा म्हणून ‘साहित्य सूचित’ व ‘मनातील पारंब्या’ ही दोन भित्तिपत्रके प्रकाशित केली जातात. मराठी भाषा दिनानिमित्त एकांकिका वाचन, कथा, कविता, आत्मचरित्र अभिवाचन, असे उपक्रम राबवले जातात. महाविद्यालयात अलीकडेच ‘आंबेडकरवादी साहित्याचे मूल्यमापन’ या विषयावर राष्‍ट्रीय चर्चासत्र घेण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या संशोधनवृत्तीला वाव मिळावा म्हणून त्यात मराठीच्या सहा विद्यार्थ्यांना सहभागी करून शोधनिबंध सादर करण्याची संधी देण्यात आली होती.