आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्फा मराठीचे दिवस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टीव्हीवरचे वृत्तनिवेदक कसे वाचत असतील हे कोडं अनेकांना पडतं. विशिष्ट वेळी व्हिज्युअल्स कशी दिसतात, त्याला अनुरूप निवेदन कसं काय साधलं जातं ते जाणून घेऊयात आजच्या अनुभवांच्या पोतडीत...

अल्फा मराठी ही झी नेटवर्कची प्रादेशिक वाहिनी. त्या वेळची पहिली उपग्रह वाहिनी जी infotainment म्हणजे माहिती व मनोरंजन या दोन्हींच्या गरजा पुरवणारी होती. ही वाहिनी १९९९मध्ये सुरू झाली आणि २००४मध्ये झी न्यूज लिमिटेड कंपनी झाली. त्यानंतर या वाहिनीचं नामकरण झी मराठी असं झालं.अल्फा मराठी असताना देवदास मटाले मराठी बातम्यांचे, तर जगदीश रत्नानी हिंदी विभागाचे म्हणजे झी न्यूजच्या मंुबई ब्युरोचे प्रमुख होते. इन मुंबईच्या तुलनेत ऑफिस तसं लहानच. मूळची गिरणगावातली न्यू प्रकाश सिनेमाची ती बिल्डिंग. हे सिनेमाचं थिएटर आहे याच्या खाणाखुणा या इमारतीत जागोजागी दिसायच्या. या थिएटरमध्येच थोडेफार बदल करून स्टुडिओ तयार करण्यात आला होता. पहिल्या मजल्यावर झी न्यूजच्या हिंदी ब्युरोचं, दुसऱ्या मजल्यावर पीसीआर, तर चौथ्या मजल्यावर झी मराठीची न्यूजरूम. संपादकीय विभागात तेव्हा माझ्यासह दीपाली दोंदे आणि स्वतः देवदास मटाले एवढीच माणसं. पुणे, नाशिक, नागपूर, रत्नागिरी,कोल्हापूर, अहमदनगर असा सहा जणांचा रिजनल ब्युरो, मुंबईत हिंदी-मराठी असं दोन्ही मिळून काम करणारे पाच रिपोर्टर, आणि तीन व्हिडिओ एडिटर एवढाच काय तो अल्फा मराठी बातम्यांचा संसार. त्या वेळी अल्फाचे अँकरही कॉँट्रॅक्टवर असायचे. पहिलीच प्रादेशिक वाहिनी असल्यानं अल्फा मराठीवर अनेक वेगवेगळ्या विषयांवरचे कार्यक्रम चालायचे. बातम्यांच्या वेळा ठरलेल्या. सकाळी सात, संध्याकाळी सात आणि रात्री नऊ. सगळ्या ब्युरोच्या टेप यायच्या कुरिअरने. म्हणजे आज संध्याकाळी नागपूरला एखादी घटना घडली तर ती बातमी दुसऱ्या दिवशी नऊच्या बातम्यांमध्ये दिसायची. त्यातल्या त्यात पुणे नाशिकमध्ये घडणाऱ्या घटनाच लवकर दिसायच्या कारण त्यांच्या टेप थेट टॅक्सी स्टँण्डवर यायच्या. या सगळ्या टेप त्या वेळी हाय बँडच्या किंवा बीटा म्हणजे वहीच्या आकाराच्या असत.
बातम्या जरी संध्याकाळच्या सातच्या असल्या तरी त्या अर्धा ते पाऊण तास आधी रेकॉर्ड व्हायच्या कारण बातम्यांची टेप त्या वेळी व्हीएसएनएलला (विदेश संचार निगम लिमिटेड, जे आता भारत संचार निगम, बीएसएनएल झालंय) जाऊन अपलिंक व्हायची म्हणजे दिल्लीला पाठवली जायची. एक रनर ही रेकाॅर्डेड टेप लोअर परेलमधल्या आमच्या आॅफिसातून चर्चगेटला व्हीएसएनलपर्यंत घेऊन जायचा.

इन मुंबईचा फोकस होता लोकल बातम्यांवर. त्या तुलनेत अल्फाचा आवाका खूप मोठा होता. राष्ट्रीय वाहिनी असल्यानं राष्ट्रीय घडामोडींनाही बातम्यांमध्ये तेवढंच स्थान होतं. मी संपादकीय विभागात असल्यामुळे मुख्य काम असायचं ते रिपोर्टरने आणलेल्या बातम्यांवर संस्कार करण्याचं. मग ते स्क्रिप्ट आणि व्हिज्युअल असं दोन्ही पातळ्यांवर व्हायचं. हे माध्यमच मुळी ऑडिओव्हिज्युअल - आवाज आणि दृश्यं दोन्हीची अनुभूती देणारं - असल्यानं प्रत्येक दृश्य निवडून बातमी व्हिडिओ एडिटरसोबत बसून एडिट केली जायची.

मुंबईचे रिपोर्टर स्वतःच्या बातमीला पीटूसी करायचे. पीटूसी म्हणजे piece to camera म्हणजे रिपोर्टरने स्वतः कॅमेऱ्यासमोर येऊन प्रेक्षकांशी साधलेला संवाद. याआधी भारतात काही ठरावीक पत्रकारांचे चेहरेच सर्वसामान्यांना ज्ञात होते, पण भारतात खासगी वाहिन्या आल्यानंतर ही परिस्थिती बदलली. रिपोर्टरही आपल्या बातमीनंतर स्वतः कॅमेऱ्यासमोर येऊन टिप्पणी करू लागला. अर्थात हे काही विशेष बातम्यांसाठीच केलं जायचं. (क्रमश:)
mitali.mathkar@gmail.com