आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MItali Mathkar Article About Changes In News Channels In India

आणि बातम्या \'लाइव्ह\' झाल्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आता एका विशिष्ट वर्षाविषयी बोलूया. हे वर्ष म्हणजे २००१. अनेक घटनांनी भरलेलं. या वर्षात घडलेल्या घटनांनी जसे जागतिक पातळीवर काही संदर्भ बदलले तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या परिभाषेतले देखील.

सवाई एकांकिका स्पर्धा बघून पहाटे घरी गेलो. सकाळी झेंडावंदनासाठी खाली उतरण्याची तयारी करत असतानाच पावणेनऊच्या सुमारास जोरदार झटका जाणवला. काही क्षण लागले अंदाज यायला आणि दुसऱ्याच क्षणी सगळे घरातून बाहेर पडून बिल्डिंगच्या आवारात आलो. २६ जानेवारी २००१. देशाचा ५२वा प्रजासत्ताक दिन. वेळ सकाळी ८ वाजून ४६ मिनिटं. गुजरातच्या भुजमध्ये ७.७ तीव्रतेचा भूकंप. हा हादरा दोन मिनिटं जाणवला. हळूहळू माहिती यायला लागली. अकराच्या नंतर या भूकंपाच्या परिणामांची तीव्रता जाणवायला लागली आणि प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाऐवजी गुजरातच्या ब्रेकिंग न्यूज झळकू लागल्या. संध्याकाळपर्यंत पडझडीचं एक भयावह चित्र समोर येऊ लागलं. मी आणि अमोल असे दोघंच नाइट शिफ्टला. रात्री याचं फुटेज गुजरातच्या ब्यूरोकडून यायला सुरुवात झाली आणि प्रत्येक शॉटगणिक मन सुन्न होऊ लागलं. स्क्रिप्ट तरी काय लिहायचं हे व्हिज्युअल्स बघून काही सुचत नव्हतं. हे अहमदाबाद परिसरातले शॉट्स होते. अर्थात सकाळचं अर्ध्या तासाचं बुलेटिन केवळ भूकंपावरचंच होतं. दिल्ली ब्यूरोचे आणि मुंबईतल्या अल्फा गुजरातीचे पत्रकार रिपोर्टिंगसाठी गेले होते. या सगळ्यांशी बोलणं व्हायचं ते रात्रीच. आणि त्यांचं दिवसभराचं फीड मिळायचं तेही रात्री. भुज-भचाऊपर्यंत पोचायला दोन दिवस गेले, कारण काही साधनचं नव्हती. तिथून आलेली माहिती – व्हिज्युअल्स तर हेलावून टाकणारी होती. आणि एडिट टेबलवर हे सगळं नीट बघावं लागायचं. कुठले शॉट्स दाखवायचे, कुठले नाही याचा निर्णय घेताना सगळं फीड नीट बघावं लागायचं आणि रात्रीच्या शांततेत त्याचा एक प्रचंड मानसिक शीण यायचा. अगदी घटनास्थळापासून दूर सुरक्षित ठिकाणी असूनही या घटनेनं मन व्यथित होत होतं तर त्याची झळ पोचलेल्यांची काय अवस्था असेल. जवळपास २० हजार लोकांचा बळी घेतलेला तो भूकंप. भुजचं अस्तित्व नाहीसं करून टाकणारा तो भूकंप. नंतर कितीतरी दिवस भूकंपाच्या आणि तेथील जनतेच्या पुनर्वसनाच्या बातम्या सुरू होत्या. आताही कुठलीही नैसर्गिक आपत्तीची मोठी घटना घडली की त्याच्या बातम्या करताना जानेवारी २००१च्या नाइट शिफ्टची हटकून आठवण येते.

नंतर काही महिन्यांतच नेपाळच्या राजघराण्यातलं हत्याकांड घडलं. मग याच वर्षाच्या शेवटच्या चार महिन्यात घडलेल्या घटनांनी देशाला आणि जगालाही फिदाईन हल्ला हा शब्द परिचयाचा झाला. आत्तापर्यंत केवळ ऐकून असलेल्या या शब्दामागे दडलेला भयंकर अर्थ त्यांनी प्रत्यक्षात पाहिला. काहींनी अनुभवलाही.

९ सप्टेंबर २०११. ऑफिसमध्ये वरिष्ठ पातळीवर काही बदल होत होते. नवीन संपादक रुजू होणार होते म्हणून नाइट शिफ्ट करून सगळेच थांबलेलो. दुपारी ओळख करून देण्याचा कार्यक्रम झाला. आता घरी जाऊन पुन्हा संध्याकाळी ऑफिसला यायचं होतं. त्याएेवजी मस्त भटकू आणि येऊ असा विचार करून मी, अमोल आणि राजीव तिघंजण बाहेर पडलो. टिवल्याबावल्या करूत सात वाजता ऑफिसला पोचलो. मोबाइल तेव्हा आम्हाला परवडेल असा नव्हता. ऑफिसमध्ये पाऊल टाकलं तर सगळेच टीव्हीकडे नजर लावून बसलेले. त्या वेळी न्यूज रूममध्ये दोनच टीव्ही लावलेले असायचे, एकावर झी न्यूज तर एकावर झी मराठी. सगळ्यांच्या नजरा झी न्यूजवर आणि चेहऱ्यावर वेगळेच भाव. पाहिलं तर अमेरिकेच्या ट्विन टॉवर्सना धडकणाऱ्या विमानांचं दृश्य. काहीतरी अनपेक्षित घडलं होतं.

वीस मिनिटांच्या अंतरानं न्यू्यॉर्कमधल्या ट्विन टॉवर्सवर धडकलेली दोन विमानं, काही मिनिटांनी पेंटागॉनवर धडकलेलं विमान. जगातल्या महासत्तेवरचा well planned and well coordinated असा हा हल्ला होता. हा केवळ दहशतवादी हल्ला नव्हता तर हा फिदाईन हल्ला होता. सगळेच भांबावलेले. रात्रीचं दहाचं बुलेटिन होतं तेही दहा मिनिटांचं. दहा मिनिटांच्या बातमीपत्रात दहा हेडलाइन्स देऊन आम्ही अमेरिकेच्या हल्ल्याचं पहिलं बातमीपत्र दिलं. मग रात्री सगळेच ऑफिसमध्ये थांबलेलो. सकाळच्या सातच्या बुलेटिनपर्यंत अल कायदा या दहशतवादी संघटनेचं नाव समोर आलं.

अमेरिकेवरील हल्ल्याच्या बातम्या, त्याची चर्चा सुरूच होती तर अवघ्या २१ दिवसांनी जम्मू-काश्मीरमध्ये अशाच फिदाईन हल्ल्याला सामोरं जावं लागलं. आणि मग १३ डिसेंबरचा तो दिवस. नेहमीप्रमाणे दिवसभराच्या बातम्यांचं प्लॅनिंग सुरू होतं. तेव्हा रिजनल चॅनलची बातमीपत्रं अवघी तीन होती. सकाळचे ११ म्हणजे न्यूज रूमचा दिवस नुकताच सुरू झाला होता. दिल्लीत संसदेचं अधिवेशन सुरू होतं. अन् दिल्ली ब्यूरोची बातमी आली.
(mitali.mathkar@gmail.com)

पुढील स्लाइडवर वाचा, संसद में आतंकवादी घुसे!