आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतःच शिकत गेलो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्याच वेळी झी सुरू झालं होतं. आणि मुंबईत काही केबल नेटवर्किंग कंपन्याही सुरू झाल्या होत्या. आत्तासारखं केबल नेटवर्कचं जाळं तेव्हा नव्हतं. यातली एक म्हणजे हिंदुजांचं इन मुंबई नेटवर्क. फायबर ऑप्टिक्सची सुरुवात करणारं हे पहिलं नेटवर्क. या नेटवर्कमध्ये हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमधून बातम्या दिल्या जायच्या रात्री नऊ वाजता. आणि ते बर्‍यापैकी लोकप्रिय होतं कारण मुंबईतल्या गल्लीबोळातल्या बातम्या इथे दिल्या जायच्या.

एक दिवस संध्याकाळी इन मुंबईत गेले. तिथे मराठी विभागाचे प्रमुख होते उमेश आठल्येकर. सीव्ही बघितला.
काहीही एक्सप्रेशन न देता त्यांनी विचारलं, ‘व्हीओ (व्हॉइस ओव्हर) येतो? ’
माझ्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह उमटलं.
त्यांनी विचारलं, ‘वाचता येतं नीट?’
मी मान हलवली.
ते म्हणाले, ‘जा, तिथे व्हीओ रूम आहे. ‘
प्रेमजी नावाचे एडिटर तिथे होते. त्यांना म्हटलं, ‘व्हीओ करायचाय.’ त्यांनी हातात माइक दिला आणि म्हणाले, ‘पढो.’ पहिला व्हीओ केला आणि तो ओकेही झाला. त्याच वेळी प्रेमजींनी माइक कसा धरायचा, कुठल्या शब्दांचा ब्लो येतो म्हणून त्याचे उच्चार कसे करायचे आणि बातमी स्टोरी टेलिंग फॉरमॅटमध्ये, गोष्ट सांगितल्यासारखी वाटली पाहिजे, याची शिकवण दिली.

इन मुंबईच्या मराठी विभागात काम करणारे आम्ही जेमतेम पाच जण. बाकी सगळे हिंदी भाषक. अख्खी मुंबई कव्हर करायची. त्यामुळे रिपोर्टरही दोन शिफ्टमध्ये येत. ऑफिस सीप्झ या लांबच्या परिसरात असल्यानं दादर या मध्यवर्ती भागात स्वामीनारायण मंदिराजवळ आमचं स्टँडिंग ऑफिस असायचं. म्हणजे आम्हीच आमच्या सोयीने सुरू केलेलं. कारण त्या वेळी ना आतासारखी ओबी व्हॅन होती ना बॅक पॅक ना डिजेरो ना लाइव्ह यू ना व्हॉट्सअ‍ॅप. कम्युनिकेशनसाठी डेस्कवर बसणार्‍या एकदोघांकडे पेजर होते, ज्यावर फक्त संदेश पाठवता यायचा. आणि बाकी सगळं कम्युनिकेशन व्हायचं ते एमटीएनएलच्या लँडलाइनवरून. आत्तासारखं लाइव्ह तर काहीच नव्हतं. सगळा भर असायचा तो रनर किंवा रायडर यांच्यावर. त्यामुळे या आमच्या स्टँडिंग ऑफिसमध्ये आम्ही रनरकडे किंवा ऑफिसला जाणार्‍या दुसर्‍या रिपोर्टरकडे टेप नि बातम्यांचं स्क्रिप्ट हँडओव्हर करायचो आणि पुढच्या बातमीच्या शूटिंगसाठी जायचो.

बातम्या जरी नऊ वाजताच्या असल्या तरी त्यांचं रेकॉर्डिंग व्हायचं संध्याकाळी साडेपाचला. सगळं व्हीएचएस टेपमध्ये (म्हणजे आपण घरी व्हीसीआरवर ज्या टेपवर सिनेमे पाहायचो तशीच व्हिडिओ कॅसेट) रेकॉर्ड व्हायचं, त्याच्या कॉपी निघायच्या. रनर मंडळी त्या त्या केबल सेंटरला ती टेप घेऊन जात. सगळ्याचीच डेडलाइन फिक्स. त्यामुळे आपली बातमी त्याच दिवशी जायला हवी असेल तर रिपोर्टरही जिवाचा आटापिटा करायचा आणि ते बातमी वेळेत देणं हे आपलं काम आहे म्हणून डेस्कवर बसलेला सबएडिटर आणि व्हिडिओ एडिटरही.

अवघ्या २४ मिनिटांत जास्तीत जास्त बातम्या कशा देता येतील यावर अधिक भर. मग त्यात क्राइमच्या बातम्याही हव्यात आणि बिझनेसच्याही. न्यूज अ‍ॅट ग्लान्स या सेंगमेंटखाली बिझनेसच्या बातम्या, छोट्याछोट्या बातम्या Glimpse या सेगमेंटखाली जायच्या. पण आपली रन ऑर्डर (कुठल्या बातमीनंतर कुठली बातमी जाईल याची क्रमवारी) भरगच्च असली पाहिजे याकडे मात्र प्रत्येकाचा कटाक्ष असायचा. कधी हॅपनिंग नसायचं. मग बातम्यांसाठी शोधमोहीम सुरू व्हायची. बातम्यांच्या टेपच्या कॉपी निघायच्या तेव्हा त्या वेळचे आमचे एडिटर रघुनंदन धर स्वतः हातात कागद-पेन घेऊन बसायचे. सगळ्या बातम्याचं पोस्टमाॅर्टेम करायचे. त्याचा रिपोर्ट दुसर्‍या दिवशी नोटीस बोर्डवर लावायचे. कुणी काय चांगलं केलं, कुणी कुठल्या स्टोरीची कशी माती केली, कुणाला बातमीच कशी कळली नाही, कुणाच्या स्क्रिप्टमध्ये काय चुकलं, बातमीचं व्हिज्युअल एडिटिंग कसं होतं, असं खरोखरच अख्ख्या बुलेटिनची प्रत्येकाच्या नावानिशी चिरफाड व्हायची. हा दर दिवशीच्या बातम्यांचा धर सरांचा रिपोर्ट म्हणजेच आमच्यासाठी आत्ताच्या काळातला इन हाउस जर्नलिझमचा कोर्सच होता. स्वतःहून स्वतः शिकण्याचा. उपलब्ध तंत्रज्ञानात वेगवेगळे प्रयोग करण्याचा.
पुढे झी नेटवर्कमध्ये काम करताना बेस हाच राहिला, पण त्याचा आवाका वाढला. त्याविषयी योग्य ठिकाणी बोलूच...(क्रमश:)

मिताली मठकर, मुंबई
mitali.mathkar@gmail.com
बातम्या आणखी आहेत...