आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mitali Mathkar Article About Electronic Media Working Experience

टीव्हीच्या चौकटी पलीकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई-पुणे-नगरहून काश्मीरच्या दौऱ्यावर आलेलो आम्ही काही पत्रकार. सगळेच प्रिंट मीडियातले, म्हणजे वृत्तपत्रातले. त्यांच्या बरोबर इलेक्ट्राॅनिक मीडियातले आम्ही फक्त दोघेच. मी आणि माझा कॅमेरामन कुंदन. काश्मीरमधील विधवा आणि त्यांच्या मुलांच्या समस्या जाणून घेणं, हा या दौऱ्यामागचा मुख्य उद्देश होता. ही गोष्ट आठ वर्षांपूर्वीची. बॉम्बस्फोट आणि दहशतवादी हल्ले ही त्या वेळी नित्याची बाब. आम्ही जायच्या आधी काही दिवस लाल चौकात मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. त्यामुळे रस्त्यारस्त्यावर सैनिकांचा जागता पहारा होता. सात दिवसांच्या या दौऱ्यात भेट द्यायची होती उरी या सीमेवरच्या शेवटच्या गावाला आणि तिथून पुढे अमन पुलाला. अमन पुलावर जाऊन तिथलं चित्रीकरण करण्यात निश्चितच थरार होता. पत्रकार म्हटल्यावर आणि सैनिकी परवानग्यांचे सगळे सोपस्कार पार पाडल्यानंतर आम्हाला परवानगी मिळाली खरी, पण माझ्या व्हिडिओ कॅमेऱ्याशिवाय. सुरक्षेचं कारण देत त्यांनी कॅमेरा न्यायला नकार देणं एकीकडे पटत असलं, तरी टीव्ही माध्यमात व्हिज्युअल्सशिवाय सारं काही सुनं सुनं. उरीच्या या बेसकॅम्पला मराठा इन्फंट्री होती. तिथल्या अधिकाऱ्याचं मन वळवून त्यांची परवानगी घेण्यात माझा एक तास गेला. तुमचं शूट आम्हाला दाखवावं लागेल, या अटीवर त्यांनी परवानगी दिली. अमन पुलावर पोहोचेपर्यंत संध्याकाळ झाली. पुलाच्या एका बाजूला आपण आणि दुसऱ्या बाजूला ते. सगळ्यांची ठाणी पुलाच्या दोन्ही बाजूला तर होतीच; पण डोंगरावरही काही छुपी ठाणी दिसत होती. मधल्या नदीच्या पात्रात नमाज पढणारा त्यांचा सैनिक आणि इथल्या बाजूला संध्याकाळ झाली म्हणून देवाच्या तसबिरीसमोर हात जोडणारा आपला सैनिक. परिसरात भरून राहिलेली नीरव शांतता. आमचं आपापसातलं हळू बोलणं या शांततेचा भंग करत होतं. नक्की काय वाटतं होतं ते सांगता येत नाही; पण देशाच्या सीमेवर आपण उभे आहोत या कल्पनेनेच भारावून टाकलं. हे भारावलेपण कायमचं स्मरणात राहणारं.
दुसऱ्या दिवशी सकाळी काही शूटिंग केलं आणि शालिमार बागेकडे निघालो. बागेच्या वाटेवर असतानाच सेक्रेटरिएट परिसरात बॉम्बस्फोट झाल्याचं कळलं. गाडी तशीच वळवून त्या भागाकडे निघालो. बॉम्बस्फोटात एक जण ठार झाला होता आणि जखमींना सरकारी रुग्णालयात नेलं होतं. बॉम्बस्फोट झाला म्हणजे रस्ते जाम, बघ्यांची गर्दी आणि अॅम्ब्युलन्सचे आवाज ही माझी समजूत; पण त्या जागी पोचेपर्यंत क्रेन आणून सगळं साफ केलं जात होतं. जेमतेम ५० माणसं त्या परिसरात होती. तिथल्या काही दुकानदारांकडून माहिती घेतली. कॅमेऱ्यासमोर बोलताना साऱ्यांचेच चेहरे निर्विकार. मी आणि कुंदन सरकारी रुग्णालयात गेलो. तिथेही कुठलीच गडबड नाही. जखमींना जिथे ठेवलं होतं तिथे गेलो. बेडवरच्या त्या चार जखमींच्या कण्हण्याचा आवाज आणि काही अस्पष्ट हुंदके. सगळ्यांच्या डोळ्यातलं पाणी गोठलेलं. शेवटी न राहवून एकाला विचारलं. एवढा बॉम्बस्फोट होऊन हे सगळे एवढे शांत कसे. ‘क्या करे बहेनजी? किस किस बातपर रोयेंगे और कितनों के लिए रोयेंगे? आज जो बचा वो बच गया. कल का क्या पता?’ त्याच्या त्या थंड उत्तराने अंगावर शहारे आले. एका जखमी मुलाच्या आईसमोर बूम धरला, तेव्हा तिची नजरही तेच सांगत होती. अशांत काश्मीरमधल्या सामान्यांच्या जीवनाचं एक जळजळीत सत्य असं धाडकन अंगावर आलं होतं.
One visual is worth a thousand words हे सांगणाऱ्या दृक््श्राव्य माध्यमात असे सुन्न करणारे, भारावून टाकणारे, कधी काय योग्य आणि काय अयोग्य या विचाराने भंडावून सोडणारे अनेक प्रसंग १५ वर्षांत अनुभवता आले.
मात्र, पत्रकारिता हा माझा प्रांत असेल किंवा टीव्हीसारख्या माध्यमात मी काम करीन, असं मलाच काय माझ्या आसपास वावरणाऱ्यांनाही कधी वाटलं नव्हतं. मुळात मी बऱ्यापैकी इंट्रोव्हर्ट आणि या टीव्ही जगताचा फापटपसारा मोठा. पण कसं काय जुळून आलं माहीत नाही. अगदी सहजपणे घडलं आणि बघता बघता इलेक्ट्रॉनिक मीडियातलीच १५ वर्षं सरली. १५ वर्षं हा तसं बघायला तर खूप छोटा काळ किंवा खूप मोठाही. अगदी दूरदर्शनच्या बातम्यांसाठी पीटीआयच्या बातम्या ट्रान्सलेट करण्यापासून, इन मुंबईसारख्या केबल नेटवर्कमध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमाची तोंडओळख करून घेण्यापासून ते अगदी २४ तास अखंडपणे सुरू राहणाऱ्या वृत्तवाहिनीतल्या सर्व विभागात काम करण्यापर्यंतचा हा प्रवास.
हा प्रवास जसा माझा वैयक्तिक पातळीवरचा होता तसाच तो माध्यमातील तंत्रज्ञानाचा होता. माध्यमात काम करणाऱ्यांच्या मानसिकतेचा होता. आणि या माध्यमाकडे बघणाऱ्यांच्या दृष्टिकोनातलाही होता. खूप काही शिकवणारा होता. घडवणारा होता.
बीएस्सीनंतर एमएस्सी, मग फार्मा कंपनीत नोकरी आणि नोकरीबरोबर जमेल तसं पीएचडी असं सरळ सोप्पं गणित मी आखलं होतं. आणि इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये एमएस्सी बाय रिसर्च इन ऑरगनिक केमिस्ट्री सुरूही होतं. अचानक नाटकातला एक मित्र घरी आला आणि म्हणाला, उद्या आपल्याला एकाकडे जायचंय. तुझं अक्षर चांगलं आहे, हे काम तुला करायचंय. तुझा पॉकेटमनी निघेल याची खात्री. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो अभय परांजपे यांच्याकडे. अभय त्याकाळी चित्रपटाविषयी लेखन करायचे. आणि त्यांना कुणी तरी लेखनिक-मदतनीस असा हवा होता. चित्रपट लेखन हा माझा विषय कधीच नव्हता; पण निव्वळ पॉकेटमनी आणि एका नवीन क्षेत्राशी ओळख म्हणून ते काम सुरू झालं. इलेक्ट्रॉनिक माध्यमाची भाषा आणि प्रिंटची भाषा यात फरक असला पाहिजे याचा पहिला धडा इथे मिळाला. दैनिक सामनाच्या पुरवणीतून लिखाण सुरू झालं. एमएस्सीनंतर एका नामांकित फार्मा कंपनीत नोकरीही.
क्रमश:
mitali.mathkar@gmail.com