आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mitali Mathkar Article About In Mumbai Channel Experience

‘इन मुंबई’चा धुमाकूळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इन मुंबई हे पूर्णपणे लोकल चॅनेल. नावानुसार मुंबई आणि आसपासच्या परिसरात दिसणारं केबल चॅनेल. सी न्यूज चॅनेलही याच सुमारास आलेलं. त्यामुळे या लोकल चॅनेलवरच्या बातम्या पण सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या. गल्लीतल्या ड्रेनेजच्या, पिण्याच्या पाण्याच्या प्रॉब्लेमपासून थेट दिल्लीच्या तख्तापर्यंतच्या. पण इन मुंबई त्या वेळी लोकप्रिय झालं ते लोकांना, लोकांच्या बातम्या तिथे दिसायच्या म्हणून. दुस-यादिवशी सकाळी दारात येणारा पेपर हे एकमेव माध्यम होतं आसपासच्या घडामोडी कळण्याचं. त्यामुळे रात्री घरी परतल्यावर आपल्या गल्लीतल्या घडामोडीही
घरबसल्या बघायला मिळायच्या. त्यामुळेच अनेकदा बातम्यांमध्ये या सर्वसामान्याच्या प्रतिक्रियांना हक्काचं स्थान असायचं. Vox Pop (vox populi या लॅटीन शब्दाचं संक्षिप्त रूप) हे दोन मिनिटांचं सेगमेंट अनेकदा बुलेटीनचा अविभाज्य भाग असायचं. आणि काही वेळा हेडलाइनचाही. या दोन मिनिटांमध्येही जास्तीत जास्त प्रतिक्रिया दाखवण्याकडे कटाक्ष असायचा. त्या वेळच्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही उमेदवार, प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या चर्चा यापेक्षाही सर्वसामान्य मतदाराच्या अपेक्षा आणि त्याच्या नजरेतून उमेदवार याच गोष्टींना अधिक स्थान दिलं गेलं.
आत्ताही निवडणुकांच्या कव्हरेजमध्ये सामान्य माणूस असतो, पण त्याच्या स्थानात बदल झाला आहे. दुसरा भाग म्हणजे क्राइम बातम्यांचा. गुन्हेगारी जगतातल्या बातम्या या आजही अनेक चॅनेल्सवर अर्धा तासाची वेळ राखून आहेत. पूर्णपणे dramatization मुळे म्हणा किंवा अँकरच्या निवेदन शैलीच्या अतिरंजितपणामुळे म्हणा आजही ‘क्राइम’ चा असा एक प्रेक्षकवर्ग निश्चितच कायम आहे. इन मुंबई सुरू होण्याच्या आसपास गुलशन कुमार यांची हत्या झाली होती. एकूणच त्याकाळात मुंबईच्या गुन्हेगारी जगतात खूप घडामोडी होत होत्या. गुलशनकुमार हत्या
प्रकरणाच्या रिपोर्टिंगला चांगला प्रतिसाद मिळाला आणि अगदी सहजपणे क्राइमच्या बातम्यांचं रिपोर्टिंग पण मस्ट झालं.अर्थातच मुंबईसारख्या महानगरीत गुन्हेगारीच्या बातम्या शोधणं काही कठीण नव्हतं. पण पोलिसांच्या बाइटशिवाय कुठलीही क्राइम स्टोरी authentic नसायची. याची परिणती अशी झाली की त्या वेळी मुंबईतल्या अनेक पोलिस स्थानकांत टीव्हीवर इन मुंबई चॅनेलच लावलेलं असायचं. पुढे झीला जॉइन झाल्यावर पहिलीच असाइनमेंट आली ती क्राइम स्टोरीची. ती ही एन्काउंटरची. तेव्हा पोलिसांचा बाइट तर मिळालेला; पण डेड बॉडीच्या शॉटशिवाय स्टोरी पूर्ण
झाली नसती. या बॉडीचे अवघे चार शॉट्स पोलिसांनी घेऊ दिले, पण त्यासाठी कूपर हॉस्पिटलच्या बाहेर रात्री अडीच तास थांबावं लागलेलं... १९९९-२००० या काळात ई टीव्ही येऊ घातलं होतं. अल्फा मराठी सुरू होतं. ही दोन चॅनेल्स जरी infotenment ची असली तरी त्यात बातम्यांनाही प्राधान्यानं स्थान होतं. आणि अख्खा महाराष्ट्र या बातम्यांमधून कव्हर होणार होता. काही नवीन हिंदी चॅनेल्सही येण्याच्या मार्गावर होती. यासाठी मॅनपॉवर तर लागणार होतीच, पण त्याचबरोबर advanced technology पण लागणार होती.साहजिकच या माध्यमात काम करणा-यांमध्ये आणि काम करू
इच्छिणा-यांमध्ये excitement वाढली होती. प्रिंटमध्ये काम करणा-याअनेक पत्रकारांनाही हे क्षेत्र खुणावू लागलं होतं. इन मुंबईतही हे बदलाचे वारे वाहू लागले. आणि नवीन संपादकीय मंडळ रुजू झालं. सोराब घासवाला, संजय रानडे अशी नव्या दमाची अनुभवी माणसं आली. नवीन टेक्नॉलॉजी शिकताना त्यात नवे काही प्रयोग होऊ शकतात का हेही आजमावून बघितलं जाऊ लागलं.

२००० हे नवीन वर्ष सुरू होणार होतं . नवीन वर्षाच्या स्वागतासाठी खास रंगारंग कार्यक्रम दूरदर्शनवर सादर होतं. पण हे वर्ष खास होतं y2k चं. Y2k संबंधित बातम्या तर कव्हर होत होत्या, पण नववर्षाच्या स्वागताचा जल्लोषही कव्हर करायचा होता. ९९ हा आकडा ०० मध्ये बदलत असताना बघणं हे सगळ्यासाठी जास्त औत्सुक्याचं होतं. बरं आम्हाला हा सगळा जल्लोष कव्हर करायचा होता आणि हा अर्ध्या तासाचा कार्यक्रम दुस-यादिवशी संध्याकाळी दाखवायचा होता. म्हणजे एक दिवस उशिरा; पण फील तोच ठेवायचा होता. शेवटी नेमून दिल्याप्रमाणे सगळे रिपोर्टर आपापल्या ठिकाणी गेले आणि प्रत्येकानं आपल्या टेप काउंटरचा (TCR ) उपयोग हा घड्याळासारखा केली. रिपोर्टरच्या प्रत्येक ठिकाणच्या पीटूसीच्या वेळी टेप काउंटरच नववर्षाच्या स्वागताचा काउंटडाऊन बनला. आणि १२ वाजता ९९ चा आकडा आमच्या रेकॉर्डिंगमध्येही ०० झाला. एडिटिंगच्या सोपस्कारानंतर अवघ्या मुंबईचा जल्लोष मुंबईकरांनी पुन्हा अनुभवला. आज लाइव्ह टेलिकास्टमुळे हे सोप्प झालंय, पण कुठलीच साधनं उपलब्ध नसताना केलेलं हे काम जास्त गमतीचं वाटतं.
रविवारी केवळ आठवडाभरातल्या बातम्यांचा राउंड अप करण्याएवजी काही स्पेशल प्रोग्रॅम करता येतील, असा विचार सुरू झाला. आणि आठवड्यात रेग्युलर बातम्यांच्या बरोबरीनेच या स्पेशल प्रोग्रॅमचीही आखणी होऊ लागली. माझा सहकारी नरेंद्र बंडबे याने केलेला शास्त्रीय संगीतावर आधारित कार्यक्रम असो किंवा हिंदीतल्या सहका-यांचे या वीकएंड कार्यक्रमांनाही चांगला प्रतिसाद मिळू लागला. कारण २४ मिनिटांसाठी पूर्णपणे नवीन शॉट्स शूट करावे लागायचे. वेळही खूप द्यावा लागायचा..पण ते दिवसच नव्याचे होते..
mitali.mathkar@gmail.com