आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिपोर्टरसाठी शिकवणीचा तास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकताच मुंबई रेल्वे बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल लागला. नेहमीप्रमाणे या घटनेतील आरोपींचे फोटो, त्या वेळी जखमी झालेल्यांच्या निकालानंतरच्या प्रतिक्रिया, असे बातमी लिहिताना करावे लागतात ते सगळे सोपस्कार झाले. या अशा बातम्या आज कामाचाच एक भाग बनल्या अाहेत. वरकरणी ती एक बातमी म्हणून तुम्ही निभावूनही नेता; पण आत कुठेतरी तुमच्या अंतर्मनामध्ये त्या राहिलेल्या असतात, जशाच्या तशा.

...जुलै महिन्याच्या त्या दिवशी संध्याकाळी घरी पाहुणे जेवायला यायचे होते. सातच्या बुलेटिनची बऱ्यापैकी तयारी झाली होती. ऑफिसमधून लवकर निघाले आणि लोअर परेलला स्लो ट्रेन पकडली. दादरला फास्ट ट्रेन पकडणार होते. घरी जाताना काय काय घेऊन जायचं, याविषयी फोनवर बोलणं सुरू होतं. काही वेळाने लक्षात आलं, लेडीज डब्यातली चुळबुळ नेहमीपेक्षा वाढली आहे. ट्रेन बराच वेळ एकाच जागी थांबली आहे. समोर स्टेशन दिसतंय, पण कुठलीच अनाउन्समेंट नाही. काहीच कळायला मार्ग नाही. तेवढ्यात फोनवर एका नगरसेवकाचा एसएमएस आला- Blast in Railway near Matunga.

एकदम शहारले. म्हणजे पुढच्याच ट्रेनमध्ये. काहीच सुचेना. गाडीतून उतरून ट्रॅकवरून आधी रेल्वे स्टेशन गाठलं. ऑफिसमधून बातमी कन्फर्म झाली. पण नंतर नेटवर्क जॅम. दादर स्टेशनबाहेर रिपरिप पाऊस. एकच गर्दी. ऑफिसं सुटायची वेळ. ट्रेन बंद झाल्या आहेत, एवढंच कळलेलं. मग अॅम्ब्युलन्स, पोलिस व्हॅनचे आवाज येऊ लागले. आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर तणाव. माटुंगा स्टेशनजवळ रेल्वे डब्यात ब्लास्ट, ही बातमी पसरली आणि स्टेशनलगतचा तो परिसरच जणू एकदम पॅनिक मोडमध्ये गेला. गर्दीतून चालत माटुंगा स्टेशनकडे निघाले. टिळक ब्रिजच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर एका चॅनेलची ओबी व्हॅन दिसली. आपल्या ओबी व्हॅनपर्यंत तर पोहोचू, म्हणून चालत होते. मोबाइल फोन बंद झाले होते. कुणाशीच संपर्क होत नव्हता. पोलिसांनी सगळ्याच चॅनेलच्या व्हॅनपण तिथेच रोखून धरल्या होत्या. रिपोर्टर-कॅमेरामन सगळेच पुढे होते. आणि सगळ्यांचेच फोन बंद. तेवढ्यात गर्दीतून कुणीतरी जोरजोरात हाका मारत होतं. झी न्यूजची न्यूज कोऑर्डिनेटर सीमा हातात मिनी डीव्ही नाचवत मला हाका मारत होती. ती जवळ आली व म्हणाली, ‘इसमें ब्लास्ट फुटेज है. बस्स, इसे ऑफिस पहुचाना है. मैं वापस स्टेशन जा रही हँू।’ एवढं बोलून ती गर्दीत नाहीशी झाली. क्षणभर कळेचना. ओबी पण जागेवरून हलवलेली. कुणाशीच संपर्क नाही. तिथे उभ्या असलेल्या पोलिसांना विचारलं, कुठून जाणं शक्य आहे लोअरपरेलपर्यंत? माहीत नाही, नक्की काय झालं. एक बाइकस्वार म्हणाला, झी न्यूज, चला मी सोडतो. कोण कुठला. पण टेप तर घेऊन जायची होती. त्याच्या बाइकवर बसले आणि त्याने गल्लीबोळातनं गाडी चालवत ऑफिसला पोहोचवलं. तो बाइकवाला सीआयडीचा माणूस होता, असं नंतर कळलं.

ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंत ब्लास्टचं फुटेज ऑन एअर गेलं होतं. दहाच्या बातम्या द्यायच्या होत्या. फोन बंदच होते. लोकांना एकमेकांशी संपर्क करणं कठीण झालं होतं. त्या वेळी मिलिंद कोकजेंनी ऑफिसचा लँडलाइन नंबर टीव्हीवर दिला आणि लोकांना या नंबरवर फोन करून आपल्या नातेवाइकांना मेसेज देण्याबाबत सांगितलं. टीव्हीवर तसा स्क्रोल दिला जात होता. नंबर सतत वाजत होता आणि टिकरला बसलेला संदीप ते खुशालीचे, काळजीचे मेसेज टाकत होता.
तेवढाच एक दिलासा.

मग सुरू झाला सगळ्यांच्या प्रतिक्रियांचा सिलसिला. रस्त्यावरची सगळीच वाहतूक फिरवलेली. सगळंच ऑफिस फील्डवर गेलेलं. नेटवर्किंगचा प्रॉब्लेम असल्यानं कोण कुठे आहे, हे कळणं पण अशक्य झालेलं. तेवढ्यात साडेनऊच्या आसपास आमचा रिपोर्टर रफीकचा फोन आला. त्याच्याकडे आर. आर. पाटील यांचा एक्सक्लुझिव्ह बाइट होता. रफीक दक्षिण मुंबईत होता आणि आता पुढच्या सगळया प्रतिक्रिया तिथेच मिळणार होत्या. त्याला ऑफिसला बोलावणं शक्य नव्हतं आणि रायडरही नव्हता. बाइट दहाच्या बातमीपत्रात जाणं आवश्यक होतं. शेवटी रफीकला म्हटलं, तू निघ. आम्ही पण ऑफिसमधून निघतो, टेप घेऊ आणि परत जाऊ. एका एडिटरच्या बाइकवरून मी निघाले आणि रफीक तिथून. जेजेच्या फ्लायओव्हरवर भेटलो. टेप घेतली अन् गाड्या वळवून परत फिरलो. तो इंटरव्ह्यू वेळेत गेला. मेसेजची फोन लाइनपण बारा वाजेपर्यंत सुरू ठेवली. रात्री उशिरा कधीतरी निघालो.

दुसरा दिवस नेहमीसारखाच उगवला.
ट्रेन त्याच ट्रॅकवरनं नेहमीसारखीच धावली.
नंतर काही दिवस हेडलाइन्सचा विषय ब्लास्ट हाच होता. पण सात तारखेचे ते संध्याकाळचे चार तास म्हणजे एक परीक्षाच होती. आपला आतला आवाज कसा ओळखावा, आणीबाणीच्या वेळी निर्णय कसे घ्यावे, क्षण न क्षण महत्त्वाचा असताना रिपोर्टरने काय करावं, याची शिकवणी होती ती. संपर्काची साधनं बंद असताना काय करायचं, अनोळखी व्यक्ती असली तरी तिच्या चांगुलपणावर का आणि कसा विश्वास ठेवायचा, टीमवर्कमधल्या छोट्यातल्या छोट्या कामाचं महत्त्व काय असतं ते सांगण्याची, अगदी रायडरच्यासुद्धा.

(mathkarmitali@gmail.com)