आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोबाइल दुरुस्ती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘नोकरीला लागला न धंद्यात पडला’, असे सर्वसाधारणपणे बहुतेक वेळी ऐकिवात येणारे वाक्य. हे धंद्यात पडणे म्हणजे नक्की काय? हे जेव्हा कुणी कुतूहलापोटी पाहायला जातो किंवा अनुभवण्याचे कष्ट घेतो तेव्हा या चांगल्या प्रगतिशील मार्गातून बरेच शिकायला मिळते. त्या वेळी गरज लक्षात येते ती योग्य वेळी मिळालेल्या मार्गदर्शनाची व विश्वासाची. बहुसंख्य लोकांकडे कल्पनाशक्ती भरपूर असते. पण या कल्पनाशक्तीच्या जोरावर एखादा छोटेखानी का होईना उद्योग सुरू करावा, त्यातून आर्थिक उत्पन्न तर व्हावेच, पण त्याचसोबत समाधान मिळावे अशी सर्वांची इच्छा असते. या सदरातून अशा काही उद्योगांची आपल्याला ओळख करून देणार आहोत की ज्या उद्योगांसाठी शिक्षणाची अट नाही की वयाची मर्यादा नाही. पैशाचा अफाट खर्च नाही की मोठ्या भांडवलाची, पार्टनरची गरज नाही. तर मग पाहू आजचा पहिला व्यवसाय :

‘‘कबूतर जा जा जा’’ चा जमाना गेला न् आता ट्रेन, बस किंवा जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरी ‘मोबाइल’ यंत्राची जोरदार लाट आहे. अगदी बच्चे कंपनीपासून आजी-आजोबांपर्यंत गरजेची न् चैनीची, नितांत प्रेम आणि माणसापेक्षा जास्त जवळची वाटणारी वस्तू... अगदी माणसासारखी वागणारी ही वस्तू गाणी म्हणते, पत्र पाठवते नि आजारी पडल्यावर डॉक्टरांकडेही जाते.. मग आपणच याचे डॉक्टर का होऊ नये? ‘मोबाइल रिपअरिंग’ हा सध्याच्या घडीला एक सर्वोत्तम व्यवसाय आहे. यासाठी आपल्याला यंत्रशिक्षण घेणे गरजेचे. हल्ली बºयाच संस्था कमी पैशात याचे कोर्स उपलब्ध करून देतात. नवनवे मोबाइल्स व त्यांच्या तांत्रिक बाबी समजावून, बिघाड सुधारण्याची माहिती आपल्याला या संस्था करून देतात. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्या घरातून हा व्यवसाय सुरू करू शकतो. या व्यवसायाची सुरुवात जरी धीमी असली तरी सातत्य महत्त्वाचे असते. एकदा का जम बसला की मग मागे पाहणे नाही. मोबाइल रिपेअरिंगसोबत मोबाइल स्पेअर्स व जागा असल्यास छोटे दुकानही टाकू शकतो. मूळ खर्च कमी आणि हळूहळू हे उत्पन्नाचे एक चांगले साधन बनते.
काही महत्त्वाच्या टिप्स
1. प्रामाणिकपणा ही कुठल्याही व्यवसायाचा पाया आहे. ती जपणे आपल्या हातात आहे.
2. उद्योगधंद्यातील सातत्य महत्त्वाचे आहे. जोडधंदे अनेक, मोबाइलसोबत संगणक दुरुस्तीचेही प्रशिक्षण घेता येईल. त्याने व्यवसायाला अजून चांगला प्रतिसाद मिळू शकतो.
3. ज्या संस्था हे कोर्स घेतात, त्या पडताळून मगच नाव नोंदवावे.
4. कुठलाही व्यवसाय करण्यापूर्वी आपण राहतो त्या भागात किंवा दुकान सुरू करणार असू त्या भागात या व्यवसायाला किती मागणी आहे, याची माहिती काढून मग निर्णय घ्यावा.
5. आपल्या ग्राहकाला नेहमीच चांगले व प्रामाणिकपणे काम देणे हे यशाचे चिन्ह आहे. तर वेळ न दवडता सुरुवात करा!