आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञान शिक्षण: तुमच्या मिठात आयोडीन किती आहे?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लहान मुले आणि प्रौढांना दररोज 150 मायक्रोग्रॅम एवढ्या आयोडीनची आवश्यकता असते. ज्या भागात सागरी मीठ खाल्ले जात नाही अशा व्यक्तींच्या आहारातून पुरेसे आयोडीन न मिळाल्यास गलगंड व लहान बालकांमध्ये मेंदूची वाढ नीट न होणे असे प्रकार दिसून येतात. त्यामुळे शासनाने फक्त आयोडीनयुक्त मीठ खाण्यासाठी विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे. आज बाजारात आयोडीनयुक्त मिठाचे अनेक ब्रँड आहेत. मिठामध्ये किती आयोडीन आहे हे समजत नाही.
आजच्या प्रयोगातून तुम्हाला तुमच्या मिठामध्ये किती आयोडीन आहे हे शोधून काढायचे आहे. प्रयोगाचे साहित्य मिळवणे अगदी सोपे आहे. तुमच्या मित्रांच्या घरी जाऊन आधी विविध ब्रँडचे मीठ गोळा करा. काही घरातून कमी सोडियम असलेले मीठ वापरतात. यामध्ये सोडियम क्लोराइडबरोबर पोटॅशियम क्लोराइड असते. आपल्याला दहा-पंधरा ग्रॅम मीठ पुरे. मिठाचे वजन करणे थोडे अडचणीचे वाटल्यास एक लहान आकाराची डबी किंवा चमचा वापरा. ज्यांना स्वयंपाकघरात लुडबुडायची सवय असते त्यांना सपाट चमचा व शीग भरलेला चमचा लगेच समजतो. तुम्हाला दोन सपाट चमचे मीठ लागणार आहे. जेवढ्या ब्रँडचे मीठ तुम्हाला मिळाले तेवढे डिस्पोझिबल प्लास्टिकचे ग्लास हवेत. इतर साहित्यामध्ये दळलेले मीठ, सैंधव, व्हिनेगार, दवाखान्यातून प्रत्येकी एक लहान 30 मिलि बाटली भरून जखमेवर लावायचे आयोडीन व 3% हायड्रोजन पेरॉक्साइड व स्टार्चचे द्रावण. घरी स्टार्च द्रावण सहज करता येते. दोन कप पाण्यात फक्त दोन चमचे साबूदाणा उकळा. उकळलेले द्रावण फार घट्ट वाटत असल्यास त्यात जेवढे द्रावण तेवढे पाणी घाला. द्रावण थंड होऊ द्या. एक ड्रॉपर मिळवा.
आता स्टार्चच्या द्रावणात एक थेंब आयोडीन घालून पाहा द्रावणाचा रंग निळा होईल. आयोडीनमुळे स्टार्चचे द्रावण निळे होते. एकाऐवजी दोन थेंब आयोडीन घातल्यास अधिक निळा रंग झाल्यास आयोडीनमध्ये थोडे पाणी मिसळा.
प्रयोगासाठी प्रत्येक कपामध्ये एका ब्रँडचे दोन सपाट चमचे मीठ कपभर पाण्यात विरघळवा. मीठ विरघळलेल्या पाण्यात एक चमचा व्हिनेगर, एक चमचा हायड्रोजन पेरॉक्साइड घाला. सर्वात शेवटी एक चमचा स्टार्चचे द्रावण घाला. प्रत्येक कपामध्ये साहित्य तेवढेच घाला. चमच्याने प्रत्येक ग्लासमधील मिश्रण हलवा. ज्या मिठामध्ये आयोडीन नाही त्या द्रावणाला कोणताच रंग येणार नाही, पण आयोडीनयुक्त मिठाच्या द्रावणास मात्र आयोडीनच्या प्रमाणात निळा रंग येईल. तुमच्या लक्षात येईल की दळलेल्या खडा मिठामध्ये व सैंधव मिठामध्ये आयोडीन मिसळलेले नसल्याने त्या द्रावणास निळा रंग येणार नाही. या द्रावणात आयोडीन घातल्यास त्यासही निळा रंग येईल. द्रावणाचा सामू आपण व्हिनेगर घातल्याने आम्ल झाला. हायड्रोजन पेरॉक्साइडमुळे मिठातील आयोडीन मुक्त होते. मुक्त झालेल्या आयोडीनची स्ट्रार्च द्रावणाबरोबर झालेल्या क्रियेमुळे द्रावणास निळा रंग आला.