आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कागदी भिरभिरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आम्ही लहान शाळकरी मुले असताना वडिलांनी एके दिवशी चौरस कागदाचे घड्या घालून चक्र तयार केले. बाभळीच्या काट्याने ते एका ज्वारीच्या धाटाला लावले. थोडा जरी वारा आला म्हणजे चक्र भन्नाट फिरे. वारा पडलेला असल्यास आम्ही चक्र घेऊन पळायला लागलो म्हणजे चक्र फिरू लागे. नंतर समजले की, कागदच नव्हे कोणतीही पट्टीच्या आकाराची थोडी वक्र केलेली वस्तूसुद्धा अक्षाभोवती फिरते. आज आपण वार्‍याच्या ऊर्जेसंबंधीचा प्रयोग कागदी चक्राच्या साहाय्याने करणार आहोत. साहित्य एक बाभळीचा काटा. अंदाजे वीस सेमी गुणिले वीस सेमी चौरस कागद. कागद फार जाड नसला तरी चालेल. वहीतील कागद मात्र फाडू नका.

वर्तमानपत्राचा कागद सुद्धा चालेल. तयार चक्र लावण्यासाठी कडब्याचा चाळीस पंचेचाळीस सेमी लांबीचा तुकडा. लाकडी काठी, बांबूचा तुकडा काहीही चालेल. कडब्याचा तुकडा मऊ असल्याने त्यात बाभळीचा काटा व्यवस्थित घुसवता येतो. चक्र करण्याची पद्धत अगदी साधी. विरुद्ध बाजूचे कोपरे जवळ आणून कागदाला घड्या घाला. चारही दोन्ही विरुद्ध बाजूच्या घड्या जेथे एकत्र येतात तेथे कागदाचा मध्य येतो. कात्रीने घडीवरून मध्याच्या दिशेने कागद कापून घ्या. कागदाच्या मध्यापासून एक तृतियांश भाग कापू नका. आता प्रत्येक टोकामध्ये काटा घुसवा व सर्व कोपरे जवळ आणून कागदाच्या मध्यामधून काटा बाहेर काढा. झालेल्या भिरभिर्‍याच्या मागील बाजूने काटा बाहेर येईल. हा काटा चिपाडाच्या टोकास किंवा बाजूमध्ये घुसवला म्हणजे तुमचे भिरभिरे तयार झाले. (आकृती पाहा). तयार केलेले भिरभिरे सायकलला अडकवा आणि ऐटीत सायकलवरून फिरा. जेवढ्या वेगाने तुम्ही सायकल चालवाल तेवढ्या वेगाने भिरभिरे फिरेल. भिरभिर्‍याच्या फिरण्याची दिशा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने होते की विरुद्ध दिशेने होते याची नोंद घ्या. ज्या दिशेने भिरभिरे फिरते त्याच्या विरुद्ध दिशेने फिरण्यासाठी काय करावे लागेल हे शोधून काढा. यासाठी फार डोके लढवण्याची आवश्यकता नाही. वार्‍याची दिशा आणि तुम्ही केलेल्या भिरभिर्‍याच्या चारही कपासारख्या भागावर येणारे वारे कसे बाहेर येते यावर भिरभिरे फिरण्याची दिशा अवलंबून आहे. भिरभिरे आणि वार्‍याची दिशा यामधील कोन बदलून पाहा. भिरभिर्‍याचा वेग आणि फिरण्याची दिशा कशी बदलते हे तुमच्या ध्यानात येईल. सध्या महाराष्ट्राच्या अनेक भागांत जेथे वर्षभर वारे ठरावीक गतीने वाहतात येथे पवन ऊर्जा निर्माण करण्यासाठी पवन विद्युत संयंत्रे बसवलेली आहेत.
(madwanna@hotmail.com)