आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञान शिक्षण: कपड्यावरील डाग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज आपण घरी नेहमी येणा-या एका अडचणीवर काय करायचे त्याचे उत्तर शोधणार आहोत. हे सर्व वैज्ञानिक प्रयोगच आहेत. कपडे, भांडी, फरशी आणि भिंती यावर निरनिराळे डाग पडतात. पांढ-या शुभ्र शर्टावर शाईचे डाग पडलेली मुले आणि घरी त्याना रागावणे हे नेहमीचे आहे. त्याबरोबर खेळताना कपड्यावर चिखलाचे डाग पडतात. स्कूटर, सायकल स्वच्छ करताना वंगणाचे, मशीन तेलाचे डाग पडतात. कपड्यावर चहा सांडतो. रक्ताचे डाग पडतात, भिंतीवर लहान मुले वॅक्स क्रेयॉनने चित्रे काढतात. त्यातल्या त्यात भिंती नव्या रंगवलेल्या असतील तर सर्वांचे लक्ष या चित्राकडे जाते.
आज आपण डाग घालवण्याचा प्रयोग करून पाहणार आहोत. ज्या वस्तूवरील डाग घालवायचा आहे तो नेमका कशाचा आहे हे आधी ठाऊक हवे.
पूर्वी कपड्यवर शाईचे डाग असत. आता ते बॉल पॉइंट शाईचे असतात. उत्तरपत्रिका लिहिताना किंवा मीटिंगमध्ये अचानक बॉल पॉइंटची शाई मधूनच बाहेर येते किंवा पेन खिशात ठेवताना त्याचे टोपण न लावता खिशात उलटे टाकले म्हणजे शाई बाहेर येऊन खिसा रंगतो. नेहमीच्या धुण्यात बॉल पॉइंट शाईचे डाग जात नाहीत. त्यासाठी अल्कोहोल किंवा अ‍ॅसिटोनची आवश्यकता असते. अ‍ॅसिटोन सहजासहजी मिळत नाही. पण नेलपॉलिश रिमूव्हर किंवा व्हाइटनर घट्ट झाले तर ते पातळ करण्यासाठीच्या बाटलीमध्ये अ‍ॅसिटोन असते. बॉल पॉइंट च्या शाईचा डाग जेथे पडला आहे त्यावर हेअर स्प्रेचा फवारा मारा. बहुतेक हेअर स्प्रेमध्ये अल्कोहोल असते. फक्त ते रंगीत असल्यास त्याचाच रंग कपड्यावर लागण्याची शक्यता अधिक आफ्टर शेव्ह लोशन स्प्रेमध्येसुद्धा अल्कोहोल आहे. एका स्वच्छ कपड्यावर हेअर स्प्रेचा फवारा मारून तो कपडा बॉल पॉइंट शाईचा डाग पडलेल्या ठिकाणी थोडा घासा. बॉल पॉइंटची शाई विरघळून हेअर स्प्रे मारलेल्या कपड्यास लागेल. या कपड्यास इस्त्री करू नका. डाग ब-यापैकी फिकट झाल्यानंतर हीच पद्धत आणखी एकदा करून पाहा. कपडा हँगरला अडकवा. त्यानंतर नेहमीप्रमाणे कपडा धुऊन टाका.
पाण्यात विरघळणा-या शाईचे डाग फेनके डिटर्जंटने निघतात. धुण्याआधी त्यावर थोडी डिटर्जंट पावडर लावून डाग पडलेली जागा थोडी ओलसर करा. जुन्या टूथब्रशने डाग घासा. डागावर थोडे पाणी लावा. डिटर्जंटसहीत कपडा बेसिनमध्ये नळाखाली धरा. डाग बराच फिकट झालेला दिसेल. आता नेहमीसारखा कपडा पुन्हा धुऊन टाका. शाईचे डाग निघून जातील. सुती कपडा आणि कृत्रिम धाग्याचे कपडे यावरील बहुतेक शाईचे व बॉल पॉइंट शाईचे डाग या पद्धतीने निघून जातात. जे कपडे पाण्याने धुता येत नाहीत उदा. रेशीम किंवा लोकरीचे सूट, स्वेटर यावर ही पद्धत वापरता येत नाही. कधी कधी लोखंडाचा गंज कपड्यांना लागतो.
जुन्या सळया, लोखंडी तारा, गंजलेले पाइप्स यावर वाळत घातलेले कपडे कोरडे झाल्यानंतर त्यावर पडलेले गंजाचे डाग अगदी वाईट दिसतात. आवडते कपडे असतील तर हळहळण्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही. जेथे लोखंडी गंजाचे डाग आहेत त्यावर कोरडे मीठ टाकायचे. त्यावर लिंबू पिळायचा. ही क्रिया दोन-तीन वेळा केल्यानंतर डाग फिकट झाल्याचे दिसेल. त्यानंतर आणखी एकदा हीच क्रिया करा व कपडा धुऊन टाका. पुढील आठवड्यात आणखी काही डाग कसे घालवायचे याचे फंडे.