आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञान शिक्षण: डाग घालवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या आठवड्यात आपण कपड्यावरील पाण्यात विद्राव्य शाईचे डाग कसे घालवायचे ते शिकलो. आज काही हट्टी डाग कसे घालवायचे ते शिकणार आहोत. यासाठी आवश्यक बहुतेक वस्तू घरातच असतात. जेवताना, हॉटेलमध्ये, सहलीत, बुफे, पार्टी यामध्ये कपड्यावर पडणारे डाग हमखास लोणचे, हळद, तिखट, मसाले, ग्रेव्ही यांचे असतात. यातील कोणताही पदार्थ कपड्यावर पडला म्हणजे पांढ-या पेपर नॅपकीनने जेवढा शक्य होईल तेवढा कपड्यावरील पदार्थ टिपून घ्यायचा. जो तेलकट डाग आहे त्याच्या विरुद्ध बाजूस डिश वॉशिंग साबण लावायचा. मिनिटभर थांबा, डिश वॉशिंग साबणामुळे कपड्यावरील तेल सुटण्यास मदत होईल. सर्व मिश्रण वॉश बेसनमध्ये धुवून टाका व कपडे धुवायला टाका. फळांचे रस, कॉफी, टोमॅटो घातलेले सॉस, यांचे डाग कपड्यावर पडल्यास डागावर खाण्याचे कोरडे मीठ टाका. 20-25 सेकंदानंतर कोरड्या स्वच्छ कपड्याने डाग पुसून घ्या व कपडा ओला करून धुवायला द्या.
ब-याच व्यक्तींना स्कूटरची सीट कव्हर, बसेसच्या सीट्स, सिनेमा थिएटरमधील सीट्स यावर जाताना च्युइंगम चिकटवून ठेवण्याची घाणेरडी सवय असते. ही एक प्रकारची विकृती आहे. बेसावधपणे बसताना च्युइंगम कपड्याला लागला म्हणजे तो सहजासहजी कपड्यापासून वेगळा होत नाही. ज्या ठिकाणी च्युइंगम लागला आहे त्यावर बर्फ लावा. च्युइंगम कडक झाल्यानंतर बटर नाइफने किंवा चमच्याच्या दांडीने खरवडून काढा व कपडा धुवायला द्या.
डाग काढणारा द्रव्यपदार्थ
म्हणजे खाण्याचा सोडा
आणखी एक डाग काढणारे द्रव्य म्हणजे खाण्याचा सोडा. 50-100 ग्रॅम खाण्याचा सोडा घरी आणून ठेवा. खाण्याच्या सोड्याने हळदीचे डाग स्वच्छ होतात. पांढ-या कपड्यावर हळदीचे डाग खूप विचित्र दिसतात. थोड्या प्रमाणात कपड्यावर हळदीचे डाग पडल्यास नेहमीच्या डिटर्जंटने ते काढता येतात, पण खूप मोठा हळदीचा डाग काढण्यासाठी खाण्याचा सोडा व पाणी यांची पेस्ट करायची ती डागावर लावायची. हा कपडा रात्रभर तसाच राहू द्या. दुस-या दिवशी वॉशबेसीनमध्ये सोड्याची पेस्ट पाण्याने धुवून टाका. डाग 90 टक्के फिकट झालेला दिसेल. आणखी एकदा हाच प्रयोग करा. डाग पूर्ण निघालेला दिसेल. कृत्रिम धाग्याचे कपडे व रेशीम यावरील डाग सहजासहजी निघत नाहीत. त्यासाठी कपडे ड्रायक्लिनिंगसाठी दिल्याशिवाय उपाय नाही. याच पद्धतीने गोडे तेल, फोडणी, ग्रीज, मशीन ऑइल यांचे सुती कपड्यावरील डाग काढता येतात.
कपड्यावरील रक्ताचे डाग
कपड्यावरील रक्ताचे डाग लगेच कपडा डिटर्जंटने धुवून टाकला तर लगेच निघतात. रक्ताचे जुने डाग मात्र हट्टी असतात. एकदा गरम पाण्यात भिजवून त्याना डिटर्जंटने धुवावे लागते. सोफ्यावरील नेल पॉलिशचे डाग नेल पॉलिश रिमूव्हर शिवाय निघत नाहीत.
नेल पॉलिश रिमूव्हरमध्ये असणारे असिटोन फ्रेंच पॉलिश, ऑइल पेंट व इतर सहजासहजी न निघणारे डाग सहज काढते. फक्त पेपर नॅपकीन जवळ असूद्या. तो असीटोनमध्ये भिजवून डागावर लावा, दुस-या नॅपकीनने टिपून घ्या.
लहान मुलांना दुस-याच्या भिंतीवर वॅक्स पेन्सिलने चित्रे काढायला अतिशय आवडते. अशी चित्रे पेट्रोलने पुसून टाकता येतात किंवा कोरडा धुण्याचा सोडा चित्र असलेल्या भिंतीवर शिंपडा आणि ओल्या स्पंजाने पुसून टाका. चित्र साफ होऊन जाईल.