आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञान शिक्षण: हृदय, गती आणि व्यायाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या प्रयोगात आपण आपल्या हृदयाची गती मोजायची आहे. हे कशासाठी करायचे याचे एक गणित आहे. सामान्यपणे आपले हृदय मिनिटास 72 वेळा आकुंचन-प्रसरण पावते. हे नाडीच्या ठोक्यावरून पडताळून पाहता येते. प्रयोग करण्याआधी प्रत्येकाने नाडीचे ठोके मोजून पाहायचे आहेत. उजव्या हाताची अंगठ्याजवळील बोटे डाव्या हाताच्या मनगटावर अंगठ्याच्या खाली जेथे अंगठ्याचा प्रारंभ होतो तेथील शिरेवर ठेवून नाडीचे ठोके कसे उजव्या हाताच्या बोटांना जाणवतात ते पाहायचे. सेकंद काट्याच्या घड्याळाच्या साहाय्याने 30 सेकंदांत ते किती पडतात हे मोजून त्याची संख्या दुप्पट केली म्हणजे मिनिटास किती वेळा नाडीचे ठोके पडतात हे समजेल. वृद्ध व्यक्तींच्या नाडीचे ठोके तरुण व्यक्तीहून कमी असतात. झोपेत ते कमी होतात. ताप आलेला असल्यास ते वाढतात. धावून आल्यानंतर ते अधिक वाढतात. ते नक्की वाढलेले असतात. एका व्यक्तीच्या आयुष्यभरात हृदयाचे सरासरी अडीच अब्ज वेळा ठोके पडतात.
70 किलो वजनाच्या मानवी शरीरात साडेपाच लिटर रक्त असते. एका मिनिटात एवढे रक्त तीन वेळा हृदयातून बाहेर पडते. दररोज पुरेसा व्यायाम, चौरस आहार आणि तंबाखूपासून दूर राहिले तर हृदय आयुष्यभर व्यवस्थित कार्य करते. व्यायामामुळे हृदयाची गती वाढते. आपण किती व्यायाम केला पाहिजे म्हणजे हृदय सुरळीत कार्य करेल याचे सूत्र सोपे आहे. प्रौढ व्यक्तीमध्ये 220 वजा व्यक्तीचे वय ही व्यक्तीच्या सर्वाधिक हृदयगतीची सीमा. उदाहरणार्थ 30 वर्षांच्या व्यक्तीमध्ये 220-30= 190 एवढे त्याच्या हृदयाचे सर्वाधिक ठोके दर मिनिटास पडले पाहिजेत. रोज केलेला व्यायाम 80-90% सर्वाधिक हृदय गतीपर्यंत पोहोचण्यासाठी रोज 30 मिनिटे व्यायाम केला पाहिजे. हा व्यायाम भरभरा चालणे, धावणे, पोहणे अशा प्रकारचा असल्यास त्याचा शरीरावर ताण पडत नाही.
आजच्या प्रयोगसाठी स्टॉप वॉच, कागद-पेन्सिल आणि जेवढे शक्य असतील तेवढ्या सर्व वयाच्या व्यक्ती. सहल, शाळा, गॅदरिंग अशा सर्व ठिकाणी हा प्रयोग करून पाहता येतो. आधी व्यक्तीच्या वयावरून सर्वाधिक हृदयगती ठरवून घ्या. त्याच्या 80 टक्के गती गाठण्यासाठी किती व्यायाम करायचा आहे हे पाहता येईल. प्रयोगाआधी 15 मिनिटांची विश्रांती घ्या. नाडीचे ठोके मोजा आणि आपल्या नावासमोर लिहून ठेवा. ही स्थिर स्थिती झाली. व्यायामाआधीची स्थिती प्रयोग संपल्यानंतर परत आली पाहिजे. ती दर मिनिटास 70 ते 80 नाडीचे ठोके एवढी असते. दर 15 मिनिटांनी व्यायामानंतर परत ठोके मोजून लिहायचे आहेत. आता व्यायाम करण्यासाठी आदर्श ठिकाण म्हणजे जिना. दहा पाय-या चढून उतरायच्या. असे 15 मिनिटे करायचे व नाडीचे ठोके मोजायचे. फार दमल्यासारखे झाले तर प्रयोग थांबवून विश्रांती घेण्याची सवलत प्रत्येकास आहे. वर दिलेल्या उदाहरणातील 30 वयाच्या व्यक्तीच्या हृदयाचे ठोके 160 गाठता आले तर थांबा. इतरांनी आपले 220 वजा आपले वय = जेवढे उत्तर येईल त्याच्या 80 टक्के एवढीच हृदयाची गती गाठायची आहे. रक्तदाबाची औषधे चालू असणा-या व्यक्तींनी हा प्रयोग करायचा नाही, पण विद्यार्थी, तरुण आणि इतर निरोगी व्यक्तींनी आपल्याला हृदयाची गती किती गाठायची आहे हे ठरवून तेथेपर्यंत जाऊन पाहायला काय हरकत आहे?