आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबातील आनुवंशिकता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेत अनेक वेळा अनुवंशशास्त्राचा उल्लेख आला म्हणजे बरेच विद्यार्थी बुचकळ्यात पडतात. अभ्यास करताना अनुवंशशास्त्राची ओळख मेंडेलच्या प्रयोगानी केलेली असते. हे सर्वच प्रयोग न समजता आपण पाठ केलेले असतात. पण घरी असलेल्या व्यक्तीमध्येसुद्धा अनुवंशशास्त्राचे नियम दडलेले असतात. ते आपण कसे शोधायचे हे आजच्या प्रयोगामधून पाहायचे आहे. यासाठी प्रयोग करण्याची गरज नाही. गरज आहे ती फक्त निरीक्षणे नोंदवण्याची. साहित्य - कागद, पेन्सिल आणि एकाच कुटुंबातील शक्य तेवढ्या सर्व व्यक्ती. आई, बाबा, बहिणी, भाऊ, आजोबा, आजी, काका, मामा. काका, मामी सर्व जणांची मदत कौटुंबिक आनुवंशिकता शोधण्यासाठी आहे.
सर्वात आधी आपण काय शोधून काढायचे आहे हे पाहूया. अनुवंशशास्त्र फार किचकट नाही. फक्त त्याचे नियम समजले म्हणजे झाले. त्यासाठी आधी कानाची पाळी, बोटांचा आकार, दातांची ठेवण, केसांचा प्रकार या चार लक्षणांची निवड आपण करूया. कानाच्या पाळीचे दोन प्रकार आहेत. काही व्यक्तींची कानाची पाळी चिकटलेली असते तर काहीमध्ये ती सुटी-लोंबत असते. बोटे लांबसडक किंवा आखूड असतात, दाताची ठेवण सरळ किंवा वेडेवाकडे आणि केस, सरळ, वळणदार किंवा कुरळे असतात. केसांमधील आणखी एक प्रकार म्हणजे घुंगरासारखे वळलेले केस. ही सर्व लक्षणे परत दोन गटामध्ये विभागली जातात. प्रभावी किंवा अप्रभावी. जे लक्षण प्रभावी आहे ते मुलांच्यामध्ये उतरते. हे उदाहरणावरून स्पष्ट होईल. चिकटलेली कानाची पाळी प्रभावी, पण सुटी कानाची पाळी अप्रभावी. आखूड बोटे प्रभावी लांब बोटे अप्रभावी. वेडेवाकडे दात प्रभावी, एका सरळ ओळीत दात अप्रभावी. कुरळे व घुंगुरटे केस प्रभावी, सरळ केस अप्रभावी.आता निरीक्षण सुरू. चार कागद घ्या. प्रत्येक कागदावर लक्षणाचे नाव लिहा. घरातील सर्व व्यक्तींची नावे लिहा. लक्षणावरून अनुवंश तक्ता तुम्ही करायचा आहे. व्यक्ती स्त्री असेल तर पोकळ गोल व पुरुष असेल तर चौकोन या खुणा वापरायच्या आहेत. या माहितीवरून तुमच्या कुटुंबात वरील लक्षणांची आनुवंशिकता कशी आहे याची माहिती मिळेल. जे लक्षण व्यक्तीमध्ये दिसेल त्याच्या नावासमोर बरोबर खूण करा व दिसत नसल्यास फुली या प्रकारे तक्ता पूर्ण करा. घरातील सर्वात वयस्क व्यक्तीच्या नावाने तक्ता लिहिल्यास लक्षणाचा प्रवास तुम्हाला सहज समजेल. खालील तक्त्यावरून हे अधिक स्पष्ट होईल. आजीचे नाव, आजोबांचे नाव ही झाली जोडी. आजोबांच्या कानाच्या पाळ्या सुट्या, आजीच्या कानाच्या पाळ्या चिकटलेल्या, बाबांच्या कानाच्या पाळ्या सुट्या, आईच्या कानाच्या पाळ्या पण सुट्या. तुमच्या बहिणीच्या कानाच्या पाळ्या चिकटलेल्या असल्यास त्या आजीकडून आलेल्या आहेत हा निष्कर्ष. आता समजा बहिणीच्या विवाहानंतर तिला झालेल्या बाळाच्या कानाच्या पाळ्या चिकटलेल्या आहेत की नाही हे पाहा. अशा रीतीने तुम्हाला तीनऐवजी चार पिढ्यांमधील कानाच्या पाळीचा इतिहास कळेल.
हाच प्रकार इतर लक्षणांवरून करता येतो. गालावरील खळी, टकलाचा प्रकार, ओठांची ठेवण, बोटावरील केस, शरीरावरील केस, पावलांची ठेवण, डोळ्यांचा रंग, दाताचा रंग, यांची आनुवंशिकता यावरून या लक्षणांचा प्रवास मनोरंजक ठरेल.