आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलबाज्यामागील रसायनशास्त्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवाळी, गणपती उत्सव, लग्न अशा वेळी बाण किंवा भुईनळे उडवलेले पाहताना आपल्याला एक वाटत असते हे नेमके कसे होते? दिवाळीसारख्या सणामध्ये शोभेची दारू उडवायची पद्धत बहुधा चीनमधून आपल्याकडे आली. पेटत्या शेकोटीमध्ये निरनिराळी खनिजे किंवा धातू घातले तर निघणार्‍या ज्वाळेचा रंग बदलतो हे आपल्याला ठावुक होते. आजच्या प्रयोगामध्ये आपण काही धातूंच्या ज्वलनामुळे ज्वाळेचे रंग कसे बदलतात हे शोधून काढायचे आहे. हा प्रयोग करताना उघडी ज्योत किंवा आगीबरोबर हा प्रयोग करणार असल्याने मोठ्या व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली हा प्रयोग करून पाहायचा आहे, हे लक्षात ठेवा.

खगोलशास्त्रज्ञ तार्‍यापासून बाहेर पडणार्‍या प्रकाश किरणांच्या साहाय्याने तो किती दूर आहे हे ठरवतात. तुम्ही थोडेसे असाच प्रयत्न करायचा आहे. ज्योतीमधून बाहेर पडणार्‍या प्रकाश किरणांच्या रंगावरून कोणते मूलद्रव्य जळत आहे, हे शोधायचे आहे. हे नेमके कसे होते याचे उत्तर आहे, अणू आणि ऊर्जा. सर्व द्रव्य अणूने बनलेले आहे. अणूच्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन्स असतात. इलेक्ट्रॉनला ऊर्जा मिळाली म्हणजे ते थोडे दूर जातात. पण इलेक्ट्रॉनमधील ऊर्जा कमी झाली म्हणजे बाहेर पडलेली ऊर्जा प्रकाशकणांच्या स्वरूपात बाहेर पडते.
प्रयोगाचे साहित्य खराट्याच्या 25 सेमी लांबीच्या दहा सरळ काड्या, पाण्यात केलेले डिंकाचे द्रावण, मीठ आणि 50 ग्रॅम मोरचूद, दोन मोठ्या मेणबत्त्या आणि मेणबत्ती पेटवण्यासाठी काड्याची पेटी. कृषी औषधे विक्री केंद्रामध्ये मोरचूद मिळते. ते विषारी असल्याने उघड्या हाताने हाताळू नका. बाजारात प्लास्टिकचे वापरा आणि फेका असे हातमोजे मिळतात. असे हातमोजे घालून मोरचूद हाताळा. मोरचूद पावडर मिळाली तर उत्तम. पण खडे मोरचूद मिळाले तर त्याची दगडाने पूड करा. पूड करताना नाकातोंडावर रुमाल बांधा.

आता प्रयोग खराट्याच्या काडीच्या दहा सेमी भागावर हलक्या हाताने किंवा कापसाने डिंक लावा. सपाट बशीमध्ये मीठ ठेवा व डिंक फासलेली काडी मिठामध्ये घोळवून घ्या. तुम्ही फुलबाज्या पाहिल्या असतील तशी खराट्याची काडी दिसली पाहिजे. मिठाचा फार मोठा थर काडीवर चिकटण्याची आवश्यकता नाही. मिठात घोळलेल्या तीन काड्या, मोरचुदामध्ये घोळवलेल्या तीन काड्या आणि मीठ व मोरचूद या दोन्हीमध्ये घोळवलेल्या तीन काड्या तयार करा. हात स्वच्छ धुऊन घ्या. हे सर्व करण्यासाठी अर्धा तास लागेल. नऊ काड्या तयार झाल्या. थोडा अंधार होईपर्यंत वाट पाहा. संधिप्रकाशात किंवा अंधारात हा प्रयोग आणखी गंमतदार होणार आहे. अंधार पडल्यानंतर मेणबत्ती पेटवा. मिठात घोळवलेली काडी मेणबत्तीवर पेटवा. काडी पेटल्यानंतर दिसणारा सोनेरी पिवळा उजेड सोडियमच्या ज्वलनाने दिसतो. मोरचुदातील तांब्याच्या ज्वलनाने पडणारा उजेड निळसर हिरव्या रंगाचा दिसतो. याचप्रमाणे कोबाल्ट, निकेल, मँगनीज या धातूंच्या ज्वलनाने पडणारे प्रकाश किरण वेगळ्या रंगाचे दिसतात. हवेत गेल्यानंतर फुटणार्‍या बाणामध्ये विविध धातूंच्या क्षारांचे मिश्रण वापरलेले असल्याने विविध रंगांची उधळण दिसते.