आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mohan Madwanna Article About Science, Divya Marathi

दरड कोसळण्यामागचे समान बलाचे विज्ञान..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गेल्या वर्षी तुम्ही टेलिव्हिजनवर उत्तराखंड आणि बद्रीनाथ परिसरात दरडी कोसळल्याची दृश्ये पाहिली असतील. वास्तविक शेकडो टन वजनाचे खडक, टेकड्या, छोटे डोंगर, हिमकडे एकाएकी पत्त्यासारखे कसे कोसळतात ते पाहून भयचकित व्हायला होते. आजच्या प्रयोगात आपण दरड कशा कोसळतात यामागील विज्ञान समजावून घेणार आहोत. वास्तविक पृथ्वीवरील सर्व स्थायू वस्तूंवर गुरुत्वाकर्षणाचा परिणाम एकसारखा व्हायला पाहिजे. हवेत फेकलेला चेंडू खाली येतो. तसेच हवेत उंच फेकलेली कोणतीही वस्तू खाली येते. अशावेळी उतारावरून दगड, माती, गोटे, हिमकडे खाली येताना नेमके काय होत असेल बरे?
आजच्या प्रयोगाचे सर्व साहित्य तुमच्या घरातच आहे. परीक्षेस जाताना पेपर लिहिताना वापरायचा क्लिप बोर्ड, सेलो टेप, शक्यतो 50 पैशांची आठ नाणी. टिश्यू पेपर, पट्टी, कंपासपेटीत सापडला तर कोनमापक.
दरड कोसळण्यामागे एक समान बल असते. ते म्हणजे गुरुत्वाकर्षण. कोणत्याही बलास परिमाण आणि दिशा असते. उतारावर गुरुत्वाकर्षणाचा परिणाम उताराच्या समांतर दिशेने कार्य करतो, तर गुरुत्वाकर्षणाचे लंब बल उताराच्या पृष्ठभागावर कार्य करते. जेव्हा उताराचा कोन वाढतो तेव्हा गुरुत्वाकर्षणाचे समांतर बल वाढते. त्याचबरोबर लंब बल क्षीण होते. घसरणीविरुद्ध बल म्हणजे घर्षण. घर्षण वस्तूस उतारावरून घसरू देत नाही. वस्तूचे न घसरणे गुरुत्वाकर्षणाच्या लंब बलावर अवलंबून असते. उतार जेवढा तीव्र तेवढा उताराचा कोन अधिक व वस्तू घसरत येण्याचा वेग अधिक. आज आपण उताराचा कोन आणि वस्तू कशा घसरतात यावर प्रयोग करणार आहोत.
तुम्ही आणलेल्या नाण्यांचे दोन समान गट करा. म्हणजे चार नाणी. एका सेलो टेपवर एकापुढे एक अशी दोन नाणी चिकटवा. त्यावर आणखी एक एक नाणे ठेवा. नाण्याच्या रुंदीच्या बाजूने टेप लावल्यास चार नाण्यांची एक आयताकृती रचना होईल. उरलेली चार नाणी अशाच पद्धतीने सेलोटेपने चिकटवा पण त्याची एक बाजू टेपशिवाय तशीच राहू द्या. म्हणजे नाणे टेपवर चिकटवलेले असले तरी एका बाजूस ते मोकळे असल्याने त्याचा पृष्ठभाग मोकळाच राहील.
दोन्ही नाण्यांचे गट लेखन बोर्डाच्या क्लिपच्या बाजूजवळ ठेवा. खुणेसाठी जेथे नाणी ठेवली आहेत त्याच्या प्रारंभी एक पेन्सिलीची रेघ ओढा. बोर्डाची क्लिपपासूनची दूरची बाजू टेबलाला टेकलेली ठेवून क्लिपची बाजू हळूहळू वर उचलायची आहे. तुम्ही घसरगुंडीवर बसला असाल तर तुमच्या बोर्डाची घसरगुंडीच बनवायची आहे. क्लिपची बाजू हळूहळू वर उचलली म्हणजे एका विशिष्ट कोनानंतर टेप लावलेल्या नाण्यांचा गट आधी घसरतो की नाण्याचा पृष्ठभाग मोकळा असलेला गट आधी घसरत खाली येतो हे तुम्हाला पाहायचे आहे.
काय होते ते पाहा. सर्व बाजूंनी टेप लावलेला नाण्याचा गट उशिरा बोर्डावरून खाली येईल, पण ज्या गटाचा पृष्ठभाग उघडा आहे ती नाणी लवकर बोर्डावरून खाली येतील. या प्रयोगाचा निष्कर्ष तुम्ही काढायचा आहे. यासाठी एक क्लू देतो. कोणत्या गटाचे घर्षण कमी व कोणत्याचे अधिक हे पाहा. एकदा हे समजले की उत्तराखंडमध्ये मोठे गोटे, माती आणि दरडी कशा वेगाने खाली आल्या हे नक्की समजेल.
madwanna@hotmail.com