आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरंगणारे साबणाचे फुगे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज आपण साबणाचे फुगे जवळून पाहण्याचा खेळ करून पाहायचा आहे. आता तुम्ही म्हणाल, साबणाचा फुगा पाहायचा कसा? आम्ही हात लावला की तो फुटून जातो. हवेत जोपर्यंत साबणाचा फुगा हवेत आहे तोपर्यंत तो दिसतो, पण जमिनीशी स्पर्श झाला की तो फुटतो. मग साबणाचा फुगा पाहायचा कसा? आजचा प्रयोग आहे तरंगणारे साबणाचे फुगे.

साबणाचा फुगा हवेत थोडा वेळ तरंगत राहतो. अत्यंत पातळ साबणाच्या आवरणात हवा भरलेली असल्याने साबणाचा फुगा तरंगतो. खोलीत बाहेरून हवेचा झोत येत नसेल तर फुगा हळूहळू खाली येतो व जमिनीस स्पर्श झाला की फुटून जातो. हवेच्या झोताबरोबर दारे-खिडक्यांतून फुगा तरंगत बाहेर जातो व कशाचाही स्पर्श झाला की फुटून जातो. आजच्या प्रयोगात आपण साबणाचा फुगा टिकवून ठेवायचा आहे. हवा हे नायट्रोजन, ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साइड वायूचे मिश्रण आहे. यातील कार्बन डायऑक्साइड हा सर्वात जड वायू आहे. आपल्याला साबणाचा फुगा तसाच ठेवायचा असेल तर तो कार्बन डायऑक्साइडवर पकडता येतो. हे तुम्हाला जमले म्हणजे फुग्याचे अधिक वेळ निरीक्षण करता येईल.

आपला प्रयोग आता सुरू झाला. साहित्य एक वीस लिटर प्लॅस्टिकची बादली. बादली पारदर्शक असली तर उत्तम. काचेची बशी, खाण्याचा सोडा चमचाभर, थोडे पाणी, व्हिनेगार किंवा लिंबाचा चमचाभर रस, साबणाचे फुगे बनवण्यासाठी लिक्विड सोप आणि स्ट्रॉ. बादलीच्या तळाशी काचेची बशी ठेवा. त्यात चमचाभर खाण्याचा सोडा घाला, सोड्यावर लिंबाचा रस किंवा चमचाभर व्हिनेगार घाला. मिश्रण फसफसायला लागेल. खाण्याच्या सोड्यावर आम्लाची क्रिया झाली म्हणजे त्यातून कार्बन डायऑक्साइड बाहेर पडतो. तो हवेहून जड असल्याने बादलीतून लवकर बाहेर पडत नाही.
आता तुम्ही स्ट्रॉच्या साहाय्याने नेहमीसारखे साबणाचे फुगे करायचे. तुमचे कौशल्य यापुढे आहे. साबणाचा फुगा बादलीत पडायला हवा. हवेतून फुगा खाली येतो हे तुम्हाला ठाऊक आहे. बादलीत आलेला फुगा तळाशी न जाता तो बादलीतील कार्बन डायऑक्साइडवर तरंगत राहतो. अर्थात बादलीत किती कार्बन डायऑक्साइड आहे यावर हे अवलंबून आहे. बादली उचलून साबणाचा फुगा पकडण्याचा प्रयत्न केल्यास बादलीतील कार्बन डायऑक्साइड बाहेर सांडेल. त्याऐवजी फुगाच बादलीत जाईल असे प्रयत्न करा. कार्बन डायऑक्साइड रंगहीन असल्याने तो दिसत नाही. पण या बादलीत जळती मेणबत्ती सोडल्यास ती विझते. तरंगणा-या फुग्याचे निरीक्षण करा. हवे तर मोबाइलमध्ये छायाचित्र काढण्याची सोय असेल तर त्याचे छायाचित्र काढा व तरंगणा-या साबणाच्या फुग्याची जादू मित्र-मैत्रिणीबरोबर शेअर करा. तुमचा भाव वाढेल. साबणाच्या फुग्याचा पृष्ठभाग कसा दिसतो त्याचे निरीक्षण करा. त्यावर रंग कसे दिसतात किंवा कोणत्याही रंगाच्या साबणाचा फुगा पांढराच कसा दिसतो, याची उत्तरे पुन्हा केव्हा तरी.