आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञान शिक्षण: लहान होत जाणारा चंद्र

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंद्र उगवताना मोठा दिसतो, पण पौर्णिमेच्या सायंकाळी हळूहळू तो डोक्यावर जसा येत जाईल तसा लहान होत जातो. जी बाब चंद्राची तीच सूर्याची. मावळता आणि उगवणारा सूर्य अधिक मोठा दिसतो. आजच्या प्रयोगात खरेच चंद्र मोठा होतो की, आपल्याला तसे वाटते हे शोधून काढायचे आहे. हा प्रयोग तुम्ही शक्यतो पौर्णिमेच्या सायंकाळी करून पाहायचा आहे.
प्रत्यक्षात चंद्राचा आकार कधीच बदलत नाही, पण चंद्राच्या आकाराची जाणीव त्याच्या आकाशातील स्थानावरून बदलल्यासारखी वाटते. याचे एक कारण म्हणजे डोक्यावर आलेला चंद्र आपल्यास अधिक जवळ आला आहे असे वाटते. याउलट क्षितिजाजवळ असलेला चंद्र अधिक दूर असल्यासारखे वाटते. आपल्या मेंदूचे चंद्राचा आकार व अंतर यांचे गणित थोडे चुकते.
याचे आणखी एक कारण संभवते ते म्हणजे कोणत्याही चकचकीत वस्तूकडे बराच वेळ पाहिले म्हणजे डोळ्यातील प्रकाश संवेदी शंकूपेशी थकतात. जी चकचकीत वस्तू ज्या ठिकाणी आहे त्याऐवजी ती आकाशात भलत्याच ठिकाणी दिसायला लागते. दृष्टिपटलावरील चंद्राची प्रतिमा त्याच आकाराची असते, पण त्याच्या आकाराची जाणीव मात्र बदलते.
साहित्य : एक जाड निळ्या रंगाचा मोठा कागद. पिवळ्या रंगाचा एक मोठा कागद. कात्री, डिंक किंवा चिकटपट्टी. सेकंद काटा असलेले घड्याळ किंवा मोबाइलमधील स्टॉप वॉच व एक मदतनीस.
दिवसा सूर्याचा आकार कमी किंवा मोठा दिसतो. पण शक्यतो हा प्रयोग सायंकाळ ते मध्यरात्रीपर्यंत करा. दिवसा सूर्याकडे पाहणे टाळा. कारण तीव्र सूर्याकडे थेट पाहण्याने डोळ्यावर गंभीर परिणाम होतो. आता प्रयोग. निळ्या कागदाचे पाच-पाच सेंमी आकाराचे चार तुकडे कात्रीने कापून घ्या. ते पिवळ्या कागदावर चिकटवा. पिवळ्या कागदावरील दोन निळ्या तुकड्यांमध्ये 10-15 सेंमी अंतर असावे. पिवळा कागद त्यावरील निळ्या चौकोनासहित डोळ्यासमोर धरा. निळ्या चौकोनाकडे 30 सेकंद टक लावून पाहा. तुमच्याबरोबर असलेल्या व्यक्तीने 30 सेकंद झाल्यानंतर तुम्हाला वेळ संपल्याचे सांगायचे आहे. वेळ संपली म्हणजे तुम्ही पिवळ्या कागदावरील रिकाम्या जागेकडे पाहायचे आहे. तुम्हाला रिकाम्या पिवळ्या कागदावर निळ्या चौकोनाची खोटी प्रतिमा दिसेल. तुम्हाला निळ्या चौकोनाची प्रतिमा पिवळ्या कागदावर स्पष्ट दिसत नसल्यास प्रयोग दोन-तीन वेळा परत करून पाहा. निळ्या चौकोनाची प्रतिमा दिसणे बंद झाले म्हणजे ज्या अंतरावरून तुम्ही पिवळ्या कागदावर निळ्या चौकोनाची प्रतिमा रिकाम्या ठिकाणी पाहत होता ते अंतर वाढवत जा. म्हणजे एक मीटर, दोन मीटर व तीन मीटर अंतरावरून हा टक लावून पाहणे व रिकाम्या पिवळ्या कागदावर नंतर दिसणारी प्रतिमा पाहणे असे करून पाहा. जसे अंतर वाढेल तसे नंतर दिसणा-या प्रतिमेचा आकार बदलल्याचे तुम्हाला लक्षात येईल. सायंकाळी तुम्ही बनवलेले पिवळ्या कागदावरील निळे चौकोन पटांगणावर किंवा घराच्या गच्चीवर घेऊन जा. आता पिवळ्या कागदावर निळ्या चौकोनाची प्रतिमा न पाहता तीस सेकंद निळ्या चौकोनाकडे पाहून झाले म्हणजे स्वच्छ निळ्या आकाशात क्षितिजावर काय दिसते ते पाहा. तुम्हाला दिसणारी आकाशावरील प्रतिमा लहान आकाराची, त्याच आकाराची किंवा मोठ्या आकाराची दिसते का हे नोंदवून ठेवा.
एकदा क्षितिजावर व दुस-या वेळेस डोक्यावर आकाशात आणखी एकदा हा प्रयोग करून पाहा. तुम्ही ज्या वेळेस क्षितिजाजवळ प्रतिमा पाहता तेव्हा ती मोठी व डोक्यावर आकाशात पाहाल तेव्हा ती लहान दिसते. प्रतिमा लहान किंवा मोठी दिसणे याचे सूत्र इमर्ट्स नियमाप्रमाणे निघते. त्यानुसार जेव्हा आपण क्षितिजावर चंद्र पाहतो तो मोठा दिसतो व डोक्यावर पाहतो तेव्हा लहान. प्रत्यक्षात चंद्राची दृष्टिपटलावरील प्रतिमा तेवढ्याच आकाराची असते.