आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mohini Modak Article About 15 August Independents Day

नागरिकत्वाचे संस्कार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशभावना निर्माण करण्याचं परंतु त्याचबरोबर आत्मपरीक्षण करण्याचं, जुन्या चुका टाळून प्रगतीच्या वाटा चोखाळायचं, स्वातंत्र्यदिन हे निमित्त.
स्वातंत्र्यपूर्व पिढीपुढे स्वातंत्र्य मिळवण्याचे, स्वातंत्र्योत्तर पिढीपुढे देश घडवण्याचे ध्येय होते. नंतरच्या पिढीने मात्र नेमके ध्येय शोधले नाही.


बिरबल-
बादशहाच्या एका कथेत बिरबल रस्त्याच्या मधोमध एक मोठ्ठा दगड ठेवतो. कुणी दुर्लक्ष करतं, कुणी बादशहाच्या कारभाराला नावं ठेवत तो दगड टाळून पुढे जातं, कुणी त्याला आपटून पडतं पण दगड उचलून कुणीही बाजूला करत नाही. राज्यात ‘डोळस, सजग नागरिक’ किती हे एका छोट्याशा प्रयोगातून बिरबल दाखवून देतो. उद्या आपला स्वातंत्र्यदिन. देश म्हणून आपली हळूहळू आपली प्रगती होते आहे हे निर्विवाद, परंतु नागरिक म्हणून आपण प्रगत झालो का?

खरं तर देशभावना निर्माण करण्याचं परंतु त्याचबरोबर आत्मपरिक्षण करण्याचं, जुन्या चुका टाळून प्रगतीच्या वाटा चोखाळायचं, स्वातंत्र्यदिन हे केवळ निमित्त असायला हवं. स्वातंत्र्यपूर्व काळातील पिढीपुढे स्वातंत्र्य मिळवण्याचे तर स्वातंत्र्योत्तर पिढीपुढे देश घडवण्याचे ध्येय होते. त्या नंतरच्या पिढीला मात्र नेमके असे ध्येय शोधता आले नाही. दुसऱ्या महायुद्धानंतर उद्ध्वस्त झालेला जपान आपल्या बरोबरीने रांगता रांगता केव्हाच पुढे निघून गेला. मध्यंतरी जपानमध्ये झालेल्या देश हादरवून टाकणाऱ्या भूकंपातसुद्धा त्यांच्या नागरिकांनी उत्तम आपत्ती व्यवस्थापन आणि सहकार्य करून आपल्या सुजाणतेचं दर्शन जगाला घडवलं. भारतीय जनता मात्र अद्याप सुजाण नागरिक होऊ शकली नाही याचं कारण मागची पिढी उत्तम नागरिकत्वाचे संस्कार करायला काहीशी कमी पडली हे तर नसावं?

एका सामाजिक संस्थेने खेड्यात बांधून दिलेल्या शौचालयांचा नीट वापर केला जातोय का याची पाहणी केली. वापर न करणाऱ्या एका वृद्ध स्त्रीला कारण विचारताच तिने प्रतिप्रश्न केला की, कोसभर लांब जाऊन आणलेले घागरभर पाणी यासाठी वापरून टाकलं तर बाकी कामांना लागणाऱ्या पाण्याचं काय! थोडक्यात जिथे मूलभूत सोयीसुविधांची वानवा आहे तिथल्या नागरिकांकडून आदर्शत्वाच्या अपेक्षा करणे काहीसे अन्यायाचे ठरेल पण तथाकथित सुशिक्षित व सुविधा उपभाेगणाऱ्या शहरी वर्गाचे काय? त्यावरही सुजाणतेचा संस्कार झालेला दिसत नाही. प्रचंड कचरा, बेशिस्त वाहतूक, भ्रष्टाचारी व्यवस्था आणि नागरी असुविधांनी बेजार होऊन ‘इथे राहण्यात काही अर्थ नाही’ असे म्हणत तरुण पिढी परदेशात स्थायिक होण्याची स्वप्ने पाहू लागते. पण या त्रुटींकडे बोट दाखवताना उरलेली बोटे स्वत:कडे आहेत हे सोयीस्करपणे विसरतो.

मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी म्हणतात, ‘संविधानाचे पालन, भारताच्या सार्वभौमतेचे संरक्षण, स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग, पर्यावरणाचे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण आणि याबरोबरच विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बाळगणे, पाल्याला शिक्षणाच्या संधी देणे, आवश्यक असल्यास राष्ट्रीय सेवा बजावणे, अशी मूलभूत कर्तव्ये आपण पार पाडत असू तरच आपल्याला हक्कांबद्दल बोलण्याचा अधिकार आहे.’ ही कर्तव्ये आजच्या पिढीला शिकवली गेली का?

मागच्या पिढीने अपत्यांवर प्रेम केले, यथाशक्ती शिक्षण दिले, धार्मिक संस्कार तर आवर्जून केले पण नागरिक म्हणून घडवण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. त्यामुळे आपण पार्किंग करताना दुसऱ्याच्या सोयीचा विचार करत नाही. रस्त्यावर गप्पा मारत समांतर गाड्या चालवतो. प्लॅस्टिक पिशव्यांचा अतिवापर, पाण्याचा अपव्यय आणि सार्वजनिक स्वच्छतागृहांबद्दल तर काय बोलावे. झाडांवर, किल्ल्याच्या भिंतींवर आपले नाव कोरण्यात धन्यता मानतो. रस्त्यावर थुंकणे, मनाविरुद्ध घटना घडल्यास हिंसक निदर्शनं करण्यात आपल्याला गैर वाटत नाही. वेळ न पाळण्याचे समर्थन ‘इंडियन टाइम’ असं करताना आपल्याला खंत वाटत नाही. कारण असे करू नये हे आपल्याला कुणी सांगितलेच नाही.

बदलाची सुरुवात स्वत:पासून करू. निदान भावी पिढी तरी नागरिक म्हणून परिपक्व होईल हा प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. शालेय अभ्यासक्रमात नागरिकशास्त्र शिकवले जाते, नागरिकत्वाचे भान म्हणजे काय हे मात्र शिकविले जात नाही. सुशिक्षितांना वाटते त्यात काय शिकायचे पण तत्त्वज्ञ अॅरिस्टॉटल यांचे हे वाक्य बोलके आहे, ‘प्रत्येक चांगला माणूस हा एक चांगला नागरिक असतोच असे नाही.’ चांगला नागरिक घडण्यासाठी सर्वात आधी मनात रुजायला हवे ‘देशप्रेम.’ ते जर मनात असले तर रहदारीच्या नियमांचे पालन, स्वच्छतेचा पुरस्कार, रांगेची शिस्त आणि वक्तशीरपणा ही चतु:सूत्री फार कठीण नाही.’ सारासार विवेक, विज्ञानवादी दृष्टिकोन या त्यापुढच्या पायऱ्या. तसे घडले तर सरकारलाही त्याच्या जबाबदाऱ्या ठणकावून सांगता येतील. शेवटी सरकार नागरिकांमधूनच बनते. मूल्यशिक्षण ही घरातल्या संस्कारातून शिकवण्याची बाब जर शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट होऊ शकते तर ‘समाजशिक्षणाचा’ अंतर्भाव का होऊ नये! हे होईल तेव्हा होईल. या स्वातंत्र्यदिनापासून उद्याच्या पिढीसाठी समाजशिक्षणाची सुरुवात आपल्या कुटुंबापासून आपण नक्कीच करू शकतो.