आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बघायला तर हवंच ना...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘आज रात्री अंतराळातून घातक कॉस्मिक किरणं पृथ्वीवर उतरणार आहेत. सुरक्षेसाठी सर्वांनी रात्री मोबाइल स्वत:पासून दूर ठेवावा, असे बीबीसीने दहा मिनिटांपूर्वी जाहीर केले आहे,’ असे सांगणारा अजब संदेश व्हॉट्सअ‍ॅपवरच्या नातेवाइकांच्या ग्रुपवर आला. त्यावर लगेच गौरवचे उत्तर आले, ‘काहीही काय! मी बीबीसी वेबसाइट चेक केली. असे काहीही घडले नाही किंवा घडणार नाही, कूsssल. पुढे एक स्माइली.’ शहानिशा न करता संदेश पुढे पाठवणार्‍या त्या काकांचं वय असेल पन्नास आणि त्या संदेशाचा फोलपणा निदर्शनाला आणणारा गौरव जेमतेम १६ वर्षांचा.

याचा अर्थ आजची पिढी आधीच्या पिढ्यांपेक्षा फारच हुशार आहे, असं अजिबात नाही; पण या पिढीचा दृष्टिकोन नवा आहे, तिला लहान वयापासून तंत्रज्ञान हाताळायची सवय झाली आहे. जगभरातून वाहणारा माहितीचा ओघ एका क्लिकमधे त्यांच्यासमोर उपलब्ध होतो आहे. त्यात ज्ञान आणि मनोरंजन आहे, नको त्या माहितीचादेखील भरणा आहे. यातलं काय घ्यावं आणि काय घेऊ नये, हे सांगण्याचं काम खरं ज्यांचं आहे ती मागची पिढी तंत्रज्ञानाचा तितक्या सफाईने वापर करू शकत नाही. बहुसंख्य पालकांना लॅपटॉप किंवा मोबाइलचं अद्ययावत मॉडेल कोणतं आणि त्यातले फीचर्स कसे वापरायचे हे मुलंच सांगतात. पालकांना जिथे वापरच नीट करता येत नाही तिथे ते त्या बाबतीत मुला-मुलीवर नियंत्रण ठेवणार कसे!
‘काल घरातली वीज गेली होती. त्यामुळे मी माझ्या घरातल्या लोकांशी जरा गप्पा मारल्या आणि मला कळलं, अरे वा, मस्त आहेत की ही माणसं!’ टीनएजर मुलाची, आजच्या परिस्थितीवर नेमकं भाष्य करणारी ही प्रतिक्रिया बोचरा विनोद म्हणून सोशल नेटवर्किंग साइट्सवर फिरत असते. घरातल्या दोन पिढ्यांमधला संवाद हरवत चालला आहे तो केवळ तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापरामुळे नव्हे, तर दोन पिढ्यांमधील वाढत्या अंतरामुळे म्हणजेच वाढत्या ‘जनरेशन गॅप’ मुळे.

वीस ते पंचवीस वर्षांनी पिढी बदलते, असे साधारणतः मानले जाते. पण आता जगभरातली दोन पिढ्यांमधील अंतराची कल्पना चक्क सहा वर्षांवर आली आहे. हे अंतर शून्य होणार नाही, मात्र ते वैचारिकदृष्ट्या जितके कमी होईल तितका घरातला सुसंवाद वाढेल.

मध्यंतरी एका वर्तमानपत्राने १८९३ मध्ये एका वाचकाने त्यांना लिहिलेलं पत्र छापलं होतं. ते पत्र तेव्हाच्या ज्या पिढीबद्दल लिहिलं गेलं ती पिढी आज हयात नाही. ‘कुठे चालली आहे आजची पिढी, कशाचं गांभीर्य नाही, नुसता थिल्लरपणा! आमच्या काळी असलं मुळीच सहन केलं गेलं नसतं,’ असा त्या पत्राचा आशय होता. वाचताना गंमत वाटते कारण त्यावर आजची तारीख घातली तरी हे पत्र जसंच्या तसं लागू होतं. म्हणजेच प्रत्येक दोन पिढ्यांमधे विसंवाद हा असतोच. त्याचं कारण बदल! पोशाख, अभिव्यक्ती, अभिरुचीदेखील बदलली आहे. आयुष्याची ध्येयं बदलली आहेत. मार्ग आणि प्रेरणा बदलल्या आहेत. हे बदल अपरिहार्य आहेत. मात्र, पिढी बदलली तरी आतला माणूस तोच असतो. त्याच्या मूलभूत गरजा त्याच असतात. नात्यांची असोशी तीच असते. हे जर समजून घेतलं नव्या पिढीकडे एका समजूतदार नजरेने पाहता येईल. त्यांची ऊर्जा योग्य पद्धतीने वापरता येईल. जग जवळ येत चाललं आहे तसतशी आजची पिढी विशाल जगाकडे तंत्रज्ञानाने उघडून दिलेल्या खिडकीतून अतिशय कुतूहलाने पाहते आहे.

हे कुतूहल शमवायला त्यांचे पालक आणि शिक्षक काहीसे कमी पडताहेत, असं जाणवतं. त्यामुळे आजची पिढी सैरभैर झाली तर दोष फक्त त्या पिढीला देता येणार नाही. मागच्या पिढीच्या ‘असं का’ या प्रश्नाला त्यांचे पालक ‘कारण अशी पद्धत आहे,’ एवढंच उत्तर कडक आवाजात देत, त्यावर प्रतिप्रश्न करायची मुलांची बिशाद नसे. आजच्या पिढीला असं का? या प्रश्नाचं मोघम उत्तर चालणार नाही. ती पालकांना अधिक अडचणीत आणणारे प्रश्न विचारणार आहे; पण त्यासाठी बहुतेक पालक आणि शिक्षकही स्वत:च्या कक्षा रुंदावण्याच्या भानगडीत पडत नाहीत. शिवाय ही आजची पिढी बहुसंख्येने इंग्रजी माध्यमात शिकते (ते इंग्रजी अचूक असते असे मुळीच नाही) बहुतेक आईबाप मराठी माध्यमातून शिकलेले. त्यामुळे कित्येक बायका अगदी स्वत: पदवीधर असल्या तरीही ‘सायन्स आणि गणित’ यांसारख्या विषयाच्या प्रश्नांना ‘बाबांना विचार’ म्हणून टोलवतात. बाबा ‘ट्यूशन टीचरना विचार’ म्हणून टोलवतात. आपल्या आईबाबांना एवढेही येत नाही, हा मुलांचा ग्रह पक्का होतो. याची परिणती पुढे ‘तुम्हाला नाही कळणार ते’ अशा मुलांच्या उद्गारात होते तेव्हा आईबाबा खंतावतात. कुटुंबातील मुलांची संख्या हमारे ‘दो’वरून ‘एक’वर आली आहे. त्यामुळे काही पालक फक्त अपत्याला केंद्रस्थानी ठेवून जगतात.

अति काळजी किंवा प्रचंड लाड या आवर्तात त्या मुलांची निकोप वाढ होऊ शकत नाही. धर्म, संस्कृती, मूल्य, राजकारण, मनोरंजन, सामाजिक प्रश्न, संस्कार अशा वेगवेगळ्या संदर्भात नेमकी काय भूमिका असावी, याबाबत आईवडील स्वत:च गोंधळलेले असतात. जबाबदार नागरिक घडवायचा असेल तर मुळात पालक सुजाण आणि समंजस हवेत तरच मुलांच्या हृदयात मूल्य आणि विचारात विवेक रुजवता येईल. त्यासाठी ज्येष्ठांनी स्वत:ला बदलायचं आहे. नवीन पिढीचे प्रश्न त्यांच्या नजरेतून, त्यांच्या आकलनाच्या परिघातून, त्यांच्या गतीने समजावून घ्यायला हवे. कवयित्री सुजाता लोहकरे याबद्दल नेमक्या शब्दांत सांगतात...
बघायला तर हवंच ना
थोडं आत - थोडं बाहेर - जरासं थांबून
बोलायला हवंच ना
थोडं आपल्याच पायाखालच्या
मातीशी... आणि त्यातलंच काहीबाही घेत
पुढे वाहणार्‍या हवेशीही!
पुन्हा भेटूया. नवीन वर्षाच्या मन:पूर्वक
हार्दिक शुभेच्छा!

मोहिनी मोडक | अकोला
mohinimodak@gmail.com