आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदर ऑन डिमांड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘हॅपी संक्रांत’ असे म्हणून शेजारच्या चिमुरडीने मला नमस्काराऐवजी शेकहँड केला आणि मी दिलेली तिळगुळाची वडी घेऊन ती पळाली. अशा वेळी गंमत वाटते. ‘कसा का होईना’ पण सणाचा संदर्भ आजची पिढी जपते आहे म्हणून हसावं की अशा विचित्र पद्धतीने शुभेच्छा देते आहे म्हणून रडावं, असा प्रश्न पडतो. मला वाटतं, वेष्टनापेक्षा गाभा महत्त्वाचा हेच याचं उत्तर असायला हवं. मोठ्यांचा आदर करावा, हे प्रत्येक पिढीला लहानपणापासून शिकवलं जातं. जगातला कुठलाही देश याला अपवाद नाही. त्यातून आपली संस्कृती माता, पिता आणि गुरुजनांबरोबरच ‘अतिथी देवो भव!’सुद्धा म्हणणारी.
साहजिकच आपल्या देशात आणि संस्कृतीत ज्येष्ठांविषयी आदर व्यक्त करणं हे आजवर अंगभूत कर्तव्य असायचं. कुटुंबप्रमुखांचा निर्णय अंतिम असायचा. वडीलकीच्या नात्याने त्यांनी घालून दिलेले नियम पाळले जायचे. त्यात चूक झाली तर शिक्षा केली जायची. ही शिक्षादेखील शिस्तीचा भाग असे, ती प्रसंगी कठोर असली तरी त्या बाबतीत मधे पडायची कुणाची बिशाद नसे. शेवटी आई किंवा आजीचा मायेचा हात अंगावरून फिरला, की बांध फुटत असे आणि त्यात सारे किल्मिष वाहून जात असे. या सगळ्यातून शिस्तीचं महत्त्व, संयम, सहनशीलता असं बरच काही शिकायला मिळायचं. पुढच्या आयुष्यात ही पुंजी कामी यायची.
अर्थात आईवडिलांबद्दल किंवा एकूणच वडीलधा-यांबद्दल वाटणा-या ‘आदर’ या शब्दाखाली, ब-याच प्रमाणात ‘भीती’ दडली होती. या भीतीने कित्येक बालपणं काळवंडून गेली, अनादर नको म्हणून न पटणारे निर्णय खालच्या मानेने स्वीकारणारी कित्येक व्यक्तिमत्त्वं फुलायच्या आधीच कोमेजून गेली, हे नाकारता येत नाही. तरीही काळाबरोबर हा धाक आणि त्याच बरोबर ‘आदर’ही उणावतो आहे, याची आजच्या पालकांना फारच काळजी वाटते आहे.
या संदर्भात नुकताच वाचनात आलेला, साठ वर्षांपूर्वीचा हा प्रसंग सांगावासा वाटतो. महर्षी अण्णासाहेब कर्वे यांचा मुलगा दिनकर कर्वे यांच्या घरी काही तरी समारंभ होता. दिनकर कर्वे यांचे मोठे बंधू शंकर कर्वे त्यासाठी आफ्रिकेहून पुण्याला आले होते. घरात पाहुणेमंडळी गप्पा मारत होती. साठीच्या वयाचे शंकर कर्वे गप्पा मारताना एकीकडे धूम्रपान करत होते. अचानक ते उठले आणि त्यांनी चटकन सिगरेट विझवली आणि घाईघाईने अॅश ट्रेमध्ये टाकून दिली. ‘काय झाले,’ असे त्यांना कुणी तरी विचारले त्यावर त्यांनी दाराकडे इशारा केला. नव्वदीला पोहोचलेले अण्णासाहेब दारातून आत येत होते. आधीच्या पिढीच्या दृष्टीने ही कृती अतिशय सभ्य, सुसंस्कृत आणि आदर्श मानली गेली असती. आजची पिढी या प्रसंगाकडे काहीशा वेगळ्या दृष्टीने पाहते. आदर म्हणून मुळात त्यांनी वडिलांना न रुचणारी गोष्ट करणं (म्हणजेच उदा : सिगारेट पिणं) बंद केलं का? नाही. मग फक्त तोंडदेखला आदर दाखवणं हा दांभिकपणा नव्हे काय?
हल्ली बरीच मुलं वडिलांना ‘ए बाबा’ म्हणू लागली आहेत. आईला ‘अगं आई’ म्हणण्यामागे अधिक जवळीक आणि आत्मीयता असते असे म्हटले जायचे. मग वडील-मुलांच्या नात्यातला पूर्वीचा ताण जाऊन, ते नाते एकेरी उल्लेखाने अधिक मोकळे होत असेल तर त्याला अनादर न मानता केवळ संबोधनात्मक बदल म्हणून सहज स्वीकारायला हवे. मात्र, डेल लॅपटॉपच्या जाहिरातीतील मुलगी बापाला चक्क ‘ट्यूबलाइट’ म्हणते. (पूर्वीच्या तीर्थरूपांनी कानाखाली आवाज काढला असता) तेव्हा मोकळेपणा आणि उद्धटपणा यातला फरक पालकांनी मुलांना नीट सांगायलाच हवा.
आजच्या पिढीच्या वागण्यातली बेफिकिरी, ‘हू केअर्स’ असे चेह-यावरील ‘उर्मट’ भाव घरातल्या वडीलधा-या मंडळींना असह्य होतात. कुणालाही अरे-तुरे करणे, आपल्या शिक्षकांचा एकेरी उल्लेख करणे, ‘टीचर आली, ती म्हणाली,’ हे ऐकताना कसंसंच वाटतं; पण त्यात अपमानाचा हेतू नसून ब-याचदा भाषेचा गोंधळ असतो. (पालकांनीही प्रामाणिकपणे आठवून पाहावे की, आपल्या शाळेच्या दिवसांत आपण शिक्षकांना काय काय ‘विशेष’ नावे ठेवली होती आणि आपापसात आपण त्या नावांचा सांकेतिक वापर करत काय धमाल करत असू.) शिवाय ज्यांच्यापुढे नतमस्तक व्हावे, असे शिक्षक आता खरोखरच किती आहेत हा संशोधनाचा विषय आहे. त्यामागे सामाजिक कारणेही असतील; परंतु बहुसंख्य शिक्षक आता ‘पोटार्थी’ झाले आहेत. अजूनही ज्या शिक्षकांचे आपापल्या विषयांवर प्रभुत्व असते आणि शिकवण्याची आच असते, त्यांना विद्यार्थीप्रियता आणि सन्मान नक्कीच लाभतो.
सणसमारंभात भेटणा-या, घरी पाहुणे म्हणून आलेल्या ज्येष्ठांना मुलं योग्य तो सन्मान देत नाहीत, त्यांच्याशी नीट बोलत नाहीत, तसं बजावलं तर त्यांना लगेच ‘बोsssर होतं’, असे आरोपदेखील आजच्या पिढीवर होत आहेत. खरं आहे; परंतु काही पालक वृद्ध मंडळींसमोर उसनं हसून मग त्या व्यक्तीच्या वागण्याबद्दल पाठीमागे नकारात्मक बोलत असतील तर तो खोटा आदर तरी काय कामाचा! आजच्या पिढीची आदराची अभिव्यक्ती बदलली आहे. एका चित्रपटगृहात टीनएजर मुलांचा गट तिथल्या बाकांवर बसून आधीचा सिनेमा संपण्याची वाट पाहत गप्पा मारत होता. काही वयस्कर स्त्रिया तिथे आल्या, एकही बाक रिकामा नव्हता; पण त्यांना पाहून त्या मुलांनी न सांगता चटकन आपले बाक रिकामे केले. आदर वाकूनच व्यक्त होतो असे नाही, साध्या सोप्या देहबोलीतूनही व्यक्त होतो.
वाढत्या वयाबरोबर परिपक्वता येते, त्या अनुभवाच्या बोलांचा आजच्या पिढीने उपयोग करून घेतला पाहिजे. दुसरीकडे थरथरत्या वृद्ध हातांना आधार द्यायला तरुणाईची काठी आवश्यक आहे. मात्र, श्रेष्ठत्व वयावर अवलंबून असावं की विचारांवर आणि कर्तृत्वावर? आजची मुलं म्हणतात, “तुम्ही केवळ आमच्या आधी जन्माला आलात म्हणून तुम्ही थोर झालात का?” खरं तर सामान्य व्यक्तीच्या आतला ‘माणूस’ मोठा असला तर त्याचा आपसूक सन्मान होतो. एखाद्या क्षेत्रात झोकून देऊन अद्वितीय कामगिरी करणा-यांना समाजाच्या सगळ्या स्तरांतून मान मिळतो. ‘दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती’ म्हणणारे कविवर्य बोरकर हेच सांगतात. मूल्यं स्वीकारणं, समजून घेणं आणि ती मुलांसमोर स्वत:च्या कृतीतून ठेवणं ही सोपी गोष्ट नाही. ती पालकांना, गुरुजनांना, वडिलधा-यांना कष्टपूर्वक साध्य करायला हवी तरच त्यांचा आदरयुक्त धाक वाटेल. आजच्या पिढीची धारणा हीच आहे की ‘आदर हा कमवायचा असतो, ती केवळ वंशपरंपरेने, वयपरत्वे किंवा मागून मिळणारी गोष्ट नाही आणि नसावी...’