आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आपल्या मुलापुरता पसारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘ह्या विश्वाचा पसारा केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा’ असं कवी केशवसुत म्हणाले होते. मुलांपलीकडे जणू दुसरे जगच नसलेले आजचे बहुसंख्य पालक पाहून म्हणावेसे वाटते, ह्या विश्वाचा पसारा आपापल्या मुलांपुरता.
स्टेशनवर एका आठवड्याच्या उन्हाळी शिबिरासाठी निघालेली १०-१२ वर्षे वयोगटातील तीसचाळीस मुलं, त्यांना निरोप देण्यासाठी आलेले त्यांचे आईवडील आणि आयोजकांची टीम असा मोठ्ठा घोळका जमला होता. एक वडील मुलाच्या बुटाच्या नाड्या नीट बांधून देत होते. एक आई मुलाला समजावत होती, “एनर्जी बार दिलेत, जेवण आवडलं नाही तर सरळ ते खा हं.” दुसरी तिच्या मुलाचे हात सारखे सॅनिटायझर लावून पुसत होती. बहुतेक आईवडील मुलांना कुरवाळत सतत सूचना देत होते, आयोजकांना प्रश्न विचारून भंडावून सोडत होते. गाडी हलल्यावर धास्तावलेल्या मनाने पालक पांगले. मुलं शिबिरस्थानी पोहोचल्यावर अनेक पालक ‘मुलांशी फोनवर बोलू द्या’ म्हणून आयोजकांपाशी हट्ट धरत होते.
खरं तर ‘घराच्या सुरक्षित कोषाबाहेरचं जग’ मुलांना समजावं, त्यांना निसर्ग अनुभवता यावा, नवे मित्र मिळावेत, स्वत:ची कामं स्वत: करायला शिकता यावी, ‘शेअरिंग’ म्हणजे काय ते कळावं, त्यांच्यातले सुप्त कलागुण त्यांना जाणवावेत यासाठी ही शिबिरं असतात. आईवडिलांनी मुलांचं बोट सोडलंच नाही तर येईल त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची लवचिकता या मुलांमधे कशी निर्माण होणार? मुलांबद्दल प्रेम असणं, काळजी वाटणं अगदी स्वाभाविक आहे; पण त्याचा अतिरेक मुलांचं मोकळेपण, बालपण हिरावून तर घेत नाही ना? पाल्यांचे अति लाड त्यांच्या धोका पत्करणाच्या मूलभूत क्षमतेला मारक तर ठरत नाहीयेत ना?
आजोळी सुटी घालवणा-या मागच्या पिढीतील बहुतेक घरे अभावग्रस्त असायची, तर काही समृद्ध. कित्येक वडिलांना आपलं मूल नक्की कोणत्या इयत्तेत शिकतं, हेदेखील माहीत नसायचं. हे जरी समर्थनीय नसलं तरी तेव्हा समाधानाच्या कल्पना ब-याचशा सारख्या असत, त्यामुळे त्या पिढीला खेळत बागडत बालपण मनमुराद उपभोगता आलं. उन्हाळी सुट्या लागल्या की मिळेल त्या वस्तूचं खेळण्यात रूपांतर करणं, धडपडत सायकल शिकणं, आमरसाचा एकत्र आनंद घेणं, पुस्तकं वाचणं, रात्री पत्त्यांचे डाव मांडणं आणि अनायासे लॉजिक शिकणं, गच्चीत बिछाने पसरून चांदणं भरल्या आकाशाकडे पाहत पाहत दमून डोळे मिटणं यातल्या सुखाला आजची पिढी पारखी झाली आहे.
यात त्यांचा दोष नाही, शेवटी काळ आणि ‘सुखाची व्याख्या’ या दोन्ही बदलत जाणा-या गोष्टी आहेत; परंतु मूल्यं तर शाश्वत असायला हवीत. मुलांच्या निकोप वाढीला आजच्या पालकांनी त्यांच्यावर लादलेली जीवनपद्धती आणि घातलेले सुरक्षाकवच मारक तर ठरत नाहीये ना? मुलांच्या बाह्य व्यक्तिमत्त्व विकासासाठी पंचतारांकित शिबिरांबरोबरच आंतरिक विकास आणि व्यक्ती ‘घडवण्यावर’ भर देणारी सेवांकुर, निर्माण यांसारखी बालशिबिरे याचाही पालकांनी विचार करायला हवा. यातून मुलांची वेगवेगळ्या विचारप्रवाहांशी ओळख होऊन त्यांचे व्यक्तिमत्त्व परिपक्व व्हायला मदत होईल.
एका कार्यक्रमात येथील एक प्रसिद्ध उद्योजक सांगत होते, “सध्या माझी मुलं महाविद्यालयात शिकतायत. मला व्यवसायात थोडी मदतदेखील करतात. सहसा आम्ही एसीशिवाय प्रवास करत नाही; परंतु आकस्मिक कारण उद्भवल्यास किंवा आवश्यकतेनुसार मी त्यांना तिस-या वर्गानेदेखील लांबचे प्रवास करायला लावतो. त्यांचे त्या प्रवासात खरे समाजशिक्षण होते. सुखसोयींची किंमत, कष्टाचे महत्त्व, गरज आणि चैन यातला फरक समजतो, ‘माणसं’ कळतात, समाजात जगण्याचे किती स्तर आहेत ते कळतात, संवेदनशीलता वाढते.”
“पण मुलं एखाद्या वेळेस अडचणीत सापडतील याची भीती नाही वाटत का,” असे विचारताच ते म्हणाले, “आज संपर्काची इतकी साधनं उपलब्ध असताना भीती कसली? उलट मुलं स्मार्ट होतात. स्मार्टनेस म्हणजे फक्त ब्रँडेड कपडे किंवा सफाईदार इंग्रजी नाही. स्मार्टनेस म्हणजे निर्णयक्षमता, समयसूचकता, व्यवहारकुशलता. मुळात मुलांना चुका करण्याची संधीच आपण दिली नाही तर त्यांचे निर्णयकौशल्य वाढेल कसे! मग ती आपली म्हणजे पालकांची चूक ठरेल. या सगळ्यामुळे उद्या मोठं झाल्यावर, जगताना, स्वतंत्रपणे व्यवसाय करताना ज्या अडचणी आणि आव्हानं समोर येतील त्याला तोंड देण्यासाठी मुलं तयार होतील.”
थोडक्यात पालकांनी मुलांवर लक्ष जरूर ठेवावं; पण आयुष्याच्या अंगणात मुलांना जरा मोकळं सोडावं. या संदर्भात खलिल जिब्रानचे शब्द पालकांना बजावतात...
‘तुम्ही सांभाळा मुलांचं शारीर अस्तित्व
पण अधिराज्य नका गाजवू त्यांच्या आत्म्यावर
तुम्ही आहात केवळ एक धनुष्य
ज्यातून सुटतील हे चैतन्याचे तीर
उद्याच्या दिशेनं...’
mohinimodak@gmail.com