आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तर्कशुध्‍द पिढीसाठी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘भगवान की लीला’ सांगणारा एक मेसेज आला. त्यात हा मेसेज अमुक जणांना पुढे पाठवला तर माझी कशी भरभराट होईल आणि नाही पाठवला तर माझं कसं वाईट होईल, असंही लिहिलं होतं. खंत याची वाटली की मेसेज पाठवणारा महाविद्यालयीन विद्यार्थी अभ्यासात हुशार, स्मार्टफोन आणि त्यावरील वेगवेगळे अॅप्स सहजपणे वापरणारा. भक्ती हा वैयक्तिक श्रद्धेचा भाग आहे मात्र असे शाप (!) देणारे मेसेज अंधश्रद्धेला खतपाणी घालतात हे समजण्याइतका विवेक त्याच्या जवळ का नसावा, असं वाटलं. “ग्रहण होतं म्हणून इंटरव्ह्यूला नको जाऊस, असं आई म्हणाली,” असं एखादी पदव्युत्तर पदवी घेणारी विद्यार्थिनी सांगते तेव्हा काय बोलावं कळेनासं होतं. आजची पिढी स्मार्ट किंवा आधुनिक आहे असं आपण म्हणतो ते त्यांच्या स्टायलिश राहणीवरून, चटपटीत वागण्यावरून, तंत्रज्ञान सहजतेने वापरण्यावरून. वृत्ती आणि विचारांनीदेखील ही पिढी पुरोगामी, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन बाळगणारी असती तरच त्यांना ख-या अर्थाने स्मार्ट म्हणता आले असते. अपवाद वगळता तसं झालेलं दिसत नाही. त्यांच्यावर बुद्धिवादाचे संस्कार करताना मागची पिढी कुठे तरी कमी पडली असावी का!
आपल्याकडे विज्ञानाची कास धरणे म्हणजे अध्यात्मापासून दुरावणे असा एक अपसमज आहे. जिथे प्रेम, सहवेदना, मानवता, करुणा, त्याग अशी मूल्यं मानली आणि जोपासली जातात ते खरे अध्यात्म. मग ते विज्ञानाच्या वाटेत आडवे येईलच कसे. ते सहप्रवासी का होऊ नयेत! चिकित्सेची भीती असते ती अंधश्रद्धेला, ख-या अध्यात्माला नव्हे. आपल्या पाल्यावर धार्मिक संस्कार करताना त्यातील ‘उत्कट भव्य तेचि घ्यावे मळमळीत अवघे टाकावे,’ याचा विचार पालक फारसा करत नाही. श्रद्धेचा निकष ज्ञान असायला हवा. श्रद्धा तपासायला हव्यात, कालबाह्य श्रद्धांचा त्याग करायला हवा. अनेक देशांमध्ये धार्मिक कडवेपण एका पिढीकडून दुस-या पिढीकडे इतके झिरपत गेले आहे की, त्याची परिणती जिहादी तरुणांच्या दहशतवादी संघटनांमधल्या वाढत्या संख्येत दिसून येते आहे. त्याने देशाच्या आणि धर्माच्याही प्रगतीला खीळ बसते आहे. आपणदेखील आपल्या गौरवशाली इतिहासाच्या साखरझोपेतून बाहेर पडून जगाकडे उघडणा‍-या खिडकीतून बाहेर बघायला फारसे उत्सुक नाही.
या वर्षाच्या सुरुवातीला मुंबईत झालेल्या अखिल भारतीय सायन्स काँग्रेसच्या एका परिसंवादात राइट बंधूंनी विमानाचा शोध लावण्यापूर्वी सुमारे तीन हजार वर्षं भारतात विमानं उडत होती, ती आजच्या विमानांपेक्षा आधुनिक होती, असे दावे केले गेले. त्यासाठी वेद-पुराणातील दाखले दिले गेले. भारताने आज स्वबळावर यशस्वी केलेल्या चांद्रयान आणि मंगळ मोहिमेऐवजी पुराणांची चर्चा झाली. पुराणकाळातील विमानाचे अवशेष कुठल्याही उत्खननात सापडलेले नाहीत. विज्ञानात, कोणत्याही संशोधनात प्रमाण किंवा पुरावे असावे लागतात. असे दावे विज्ञान परिषदेत स्वीकारले जाऊ शकत नाहीत. शिवाय भारताप्रमाणेच बहुतेक देशांमधे वेगवेगळ्या पुराणकथा आहेत आणि त्यातही अशा स्वरूपाच्या हकिकती आहेत. ‘अपोलो’पासून आताच्या ‘ओरॅकल’ या अत्याधुनिक वाटणा-या नावांचे मूळ ग्रीक व रोमन पुराणकथांमध्ये आहे. आपल्याकडे ध्रुव ता-याची पुराणकथा प्रसिद्ध असेल तर चिनी पुराणकथांमधे २७ ऐवजी २८ नक्षत्रांची कहाणी आहे. जपानमधे ‘सप्तर्षी’बद्दलची कथा एका अस्वलासंदर्भात प्रसिद्ध आहे. अशा दाव्यांना सत्य मानायचे असेल तर जगासमोर ते संशोधन करून सिद्ध करावे लागतील. पुराणकथांचा बोधकथा म्हणून प्रतीकात्मक वापर करायला काहीच हरकत नाही. ते न करता आणि आपण पुराणकाळी किती प्रगत होतो या आनंदात मश्गूल राहण्यापेक्षा आपण आज का मागे पडतो आहोत हे समजून घेणे, मूळ भारतीय शोधांचे तर्कशुद्ध संशोधन करून त्याचे पेटंट इतर देशांनी बळकावू नये याची काळजी घेणे देशासाठी जास्त महत्त्वाचे आहे. त्यासाठी तरुणांमधे वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करायला हवा.
भर समुद्रात तळाशी भोके पडलेली नाव सोडून मग ती बुडू नये म्हणून त्या समुद्राला प्रसन्न करण्यासाठी नारळांचे ढीग जरी अर्पण केले, नवस केले, मंत्र म्हटले तरी तो समुद्र प्रवाशांसह त्या नावेस बुडवल्यावाचून राहत नाही, असे म्हणणारे विज्ञाननिष्ठ स्वा. सावरकर. आज सोशल नेटवर्किंग साइट्सवर बहुतेक पुराणकथांची विज्ञानाशी जबरदस्तीने सांगड घालण्याचा आटापिटा पाहिला की सावरकरांचा ‘खरा सनातन धर्म कोणता,’ हा निबंध आठवतो. त्यात ते नमूद करतात, ‘हे सनातन धर्म, हे सृष्टिनियम संपूर्णपणे मानवाला आज अवगत नाहीत. आज अवगत आहेसे वाटते, ते विज्ञानाच्या विकासाने थोडेसे चुकलेलेही आढळेल आणि अनेक नवनवीन नियमांच्या ज्ञानाची भर त्यात निश्चित पडेल. तेव्हा आम्ही आपल्या या वैज्ञानिक स्मृतीत न लाजता, न लपविता किंवा आजच्या श्लोकांच्या अर्थाची अप्रामाणिक ओढताण न करता नवीन श्लोक घालून ती सुधारणा घडवून आणू आणि उलट मनुष्याचे ज्ञान वाढले म्हणून त्या सुधारणेचे भूषणच मानू.’
भारताचे महासत्ता होण्याचे स्वप्न केवळ जीडीपीच्या वाढत्या दरावर अवलंबून नसून विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनावरही अवलंबून आहे. आजच्या पालकांनी विज्ञानाची महती, मानवी शक्तीचे तोकडेपण मान्य केले आणि नव्याचा स्वीकार करण्याची मानसिकता येत्या पिढीत निर्माण केली तर तीसुद्धा एक देशसेवाच ठरेल. आजच्या पालकांनी प्रत्येक बाब बुद्धीच्या आणि तर्काच्या कसोटीवर घासून मगच स्वीकारणारी, गैरसोयीचे किंवा कठीण असले तरी सतत प्रश्न विचारणारी भावी पिढी निर्माण करायला हवी आणि त्यांची उत्तरे शोधण्यासाठी प्रयत्नशील राहायला हवे तरच इतिहासासारखे आपले भविष्यदेखील अभिमान बाळगण्याजाेगे घडेल.