आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mohini Modak Article About Traditions And Modern Outlook

काय घ्याल, काय टाकाल?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सणवार-व्रतवैकल्यांमध्ये कालानुरूप बदल आवश्यक आहेत, असं काही जणींना वाटतं; तर जुनं ते सोनं म्हणून हे सगळं जपण्याचा काही जणींचा अट्टाहासअसतो. मात्र यातून सुवर्णमध्यही कसा साधता येऊ शकतो, हे सांगणारा हा लेख.
बऱ्याच काळापासून परदेशात वास्तव्याला असलेली मैत्रीण माझ्याशी फोनवर बोलत होती. ती म्हणाली, “आज माझ्याकडे श्रावणातला शुक्रवार आहे, पुरणपोळी केलीय.” “परदेशी राहूनही परंपरा जपतेस म्हणजे तुझ्या भारतातल्या सासूबाईंना अगदी कौतुक वाटत असेल तुझं,” असं म्हणताच ती सांगू
लागली, “मी या सगळ्यात कालानुरूप बदल केलेत. जेवायला मी शेजारणींना बोलावते, एक चिनी आहे, एक जर्मन आणि एक मंगोलियन. ती सवाष्ण आहे की नाही, हे माझ्यासाठी महत्त्वाचं नाही. या निमित्ताने आमचं नातं घट्ट होतं, हे महत्त्वाचं. सुरुवातीला सासूबाईंना सांस्कृतिक धक्के बसले, पण आता त्यांनी मनापासून स्वीकारले हे बदल. बाकी मतं ईमेलमध्ये लिहिते.”
वाचूया तिच्या शब्दात :
“आजच्या संगणकाच्या भाषेत सांगायचे तर आपले सणवार आणि व्रतवैकल्ये म्हणजे आपल्या संस्कृतीचे ‘front end’ आहे आणि त्यामागची मूल्यबैठक, दृष्टिकोन हे ‘back end’. एकसुरी जगण्याला यामुळे चैतन्य, अर्थ लाभतो. आनंद मिळतो. त्या त्या ऋतूनुसार साजरे केले जाणारे सणवार लोकांना एकत्र आणतात, निसर्गाशी जोडतात. ‘मी’पणाच्या परिघातून बाहेर काढून समष्टी, सृष्टी अन् परमेष्टीशी नातं जोडायला शिकवतात. त्यातून मुलांवर होणारे संस्कार,
एकत्र आलेलं कुटुंब याचीही मला विलक्षण असोशी आहे. मात्र केवळ परंपरेने चालत आलेले आहेत म्हणून आपण करतो ती व्रते आणि सणवार त्यांच्या मूळ भूमिकेशी आणि बदलत्या काळाशी सुसंगत नसतील तर त्यातला तो भाग किंवा ती संपूर्ण प्रथा त्याज्य मानायला हवी, थांबवायला हवी किंवा गाभा योग्य असेल तर तोच ठेवून पद्धत बदलायला हवी. नाही का?
उपासाचं उदाहरण घेऊ. माझ्यासाठी साबुदाणा, दाणे, बटाटे अधिक अ‍ॅसिडिटी म्हणजे उपास, हे समीकरण नाही. जे एरवी केल्यावाचून राहवत नाही ते टाळणं. खिचडी आवडते म्हणून ती करते कधीतरी; पण शक्यतो त्या व्रताच्या दिवशी फलाहार किंवा साधं, मोजकं खाणं. टीव्ही-मोबाइलला सुट्टी देणं किंवा मुलांना घेऊन ट्रेकला जाणं, जरा गप्प राहून स्वयंनिरीक्षण करणं. हे सगळे उपासाचेच प्रकार नाहीत का! एकेक करून पाहात असते. माझ्या सासूबाई म्हणायच्या, “व्रतं मानसिक आधार देतात. अखंड महत्त्वाकांक्षांनी धगधगलेलं अहंकारी, अशांत मन आणि या सगळ्याच्या पल्याड पोहोचलेलं आध्यात्मिक शांत मन
यांच्यामधला प्रवास व्रतांमुळे सोपा होतो.” पण इतकी समज असलेल्या स्त्रिया किती असतात गं! कर्मकांडांच्या ओझ्याखाली दबलेल्या बहुसंख्य स्त्रिया ‘का’ हा प्रश्न मनात येऊच देत नाहीत. त्या निमित्ताने नटणं-मुरडणं, साडी-दागिन्यांत जीव रमवणं या पलीकडे फार काही उच्च भावनेने व्रते करताना, मोजके अपवाद वगळता, मी स्त्रियांना पाहिलेलं नाही.
बहुसंख्य प्रथा या ‘सौभाग्यवती’ (चांगली पत्नी मिळणं हे पुरुषांचंही सौभाग्य नव्हे का! पण समाजमान्य आणि समजायला सोपा म्हणून हा शब्द वापरला) स्त्रियांसाठी आहेत. त्या सगळ्या प्रथा नाइलाजाने किंवा स्वेच्छेने अविवाहित राहिलेल्या स्त्रियांना समाजाच्या मुख्य प्रवाहापासून तुम्ही वेगळ्या आहात, हे सांगतात. यातून जीवनात ‘पुरुषाचे’ असणे त्या जित्याजागत्या बाईच्या अस्तित्वापेक्षा जास्त महत्त्वाचे ठरते. बहुतेक पाळणे ‘मुलगा व्हावा किंवा होणार’
म्हणून रचलेले आहेत, आजही ते गायले जातात. ‘ढोर, गँवार, पशु और नारी, यह सब ताडन के अधिकारी’ असं वाद्यांच्या गजरात स्त्रियाही टाळ्या पिटत म्हणत असतात. काही समाजात मुलगा झाला (तरच) लोकगीतं गात त्या महान (!) आईची वाद्यांच्या साथीने आजही मिरवणूक काढली जाते. यातून नेमका कोणता समाज घडतो आहे? कोणती संस्कृती जपली जाते आहे? म्हणूनच माझ्या व्रतवैकल्यात मी सगळ्या सहकारी स्त्रियांना, मैत्रिणींना सामावून घेते. त्यात
माझी घरकामाला येणारी विधवा बाई येते आणि माझ्या कंपनीतली माझी घटस्फोटित बॉसदेखील. याशिवाय उद्यापन म्हणजे माझ्यासाठी एखाद्या गरजू मुला-मुलीच्या शिक्षणाचा मला झेपेल तसा खर्च उचलणं किंवा एखाद्या चांगल्या संस्थेच्या मदतीत निदान खारीचा वाटा उचलणं.

राहिला प्रश्न दाम्पत्यजीवनाचा. सासूबाईंचं हे मत मला पटतं. त्या म्हणतात, “व्रतवैकल्यांच्या आधारे आपला संसार घट्ट धरून ठेवणारं पारंपरिक भारतीय स्त्रीचं भावविश्व मला प्रामाणिक वाटतं. हे सारं वैवाहिक जीवन अधिकाधिक परिपक्व करतं.” खरंय, एकमेकांसाठी पतीपत्नींनी वैयक्तिक स्तरावर काय करावं, हा त्यांच्या आपसातील भावबंधाचा भाग आहे; पण त्याला सार्वजनिक स्वरूप देण्याची गरज नाही. पतीचं आयुष्य वाढावं म्हणून वडाच्या फांद्या तोडून
आणून त्या पूजण्याने वटवृक्षाचं आयुष्य निश्चित कमी होईल. चोरून फुले तोडून झाडे आणि पर्यावरण ओरबाडून लक्ष वाहण्याने काय साधेल माहीत नाही, पण यात कितीतरी मानवी तास वाया जातात, हे निश्चित माहीत आहे. जेव्हा स्त्रीला उंबरठा ओलांडण्यावरही बंदी होती, तेव्हा तिला मोकळा श्वास घेता यावा म्हणून सामूहिक व्रतवैकल्याचे हे प्रयोग आले असावेत. अबोध वयात वरलेल्या जोडीदाराबद्दलची आत्मीयता वाढावी आणि नव्या परिवारातील अपरिचित
वातावरणाशी एकरूप होता यावं, हा उद्देश असेल. आता उंबरठा ओलांडण्यासाठी इतर अनेक उत्तम पर्याय आहेत. अबोध वयातील लग्ने आता अगदीच दुर्गम भागात होत असतील. तेव्हा ते प्रयोजनही उरलेले नाही.
या व्रतांच्या बहुसंख्य कहाण्यांमधल्या आटपाट नगरातल्या आवडत्या नावडत्या राण्या, त्यातल्या चमत्कारिक घटना, शाप-उ:शाप, वसा घेतल्याबरोबर होणाऱ्या जादू या सगळ्याचा आजच्या तंत्रयुगाशी काही तरी संबंध आहे का? या अतार्किक कहाण्या टाळून फक्त शांत मनाने पूजा केली तर ती पुरेशी नाही का! वसा घ्यायचाच तर नवं काही शिकण्याचा, नवं काही वाचण्याचा, नवं काही बघण्याचा का घेऊ नये? एक लोककथा आहे. एका गुरूंच्या प्रवचनात त्यांचे
मांजर म्याऊ म्याऊ करत अडथळा आणत असे, म्हणून त्याला बांधून ठेवायला सुरुवात झाली.
पुढे गुरूंच्या जागी दुसरे गुरू आले. ते मांजरही राहिले नाही. तरीही एक मांजर पकडून आणून, बांधून ठेवून, मगच प्रवचन सुरू करायची प्रथा तशीच राहिली. तसं आपल्या प्रथांचं झालेलं आहे. जगणं सुंदर करण्यासाठी आपल्या रिवाजांकडे नव्याने आणि बारकाईने पाहण्याची, त्यातलं कालबाह्य ते सोडण्याची, बदलण्याची आणि उत्तम ते मन:पूर्वक जतन करण्याची नजर आज हवी आहे, असं मला मनापासून वाटतं.”