आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेम गली अति सांकरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘किताबों से जो जाती राबता था,
आज टूट गया है
लेकिन किताबें गिरने पर
उठाने के बहाने जो रिश्ते बनते थे
उनका क्या होगा?’
कवी गुलजार सहज शब्दांत एक वस्तुस्थिती सांगून जातात. आजच्या इंटरनेट युगात पुस्तकं आपल्याला दुरावलीत, साहजिक त्यांच्यामुळे जुळणारी नाजूक नातीही संपली. अर्थात ती नाती सोशल नेटवर्किंग, कॉलेजमधलं गॅदरिंग अशा वेगवेगळ्या माध्यमातून जुळत असतात पण पुस्तकांनी दिलेला भक्कम वैचारिक पाया या नात्याला कुठून मिळणार! कालच्या पिढीतल्या कित्येकांचं समंजस प्रेम नैतिक दडपणामुळे अव्यक्त राहिलेलं तर कित्येकांचं आर्थिक, सामाजिक तफावतींमुळे वडीलधार्‍यांनी अस्वीकृत केलेलं. आजची पिढी या बाबतीत बिनधास्त आहे. बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड, ब्रेकअप हे शब्द सर्रास वापरणारी, मात्र आजच्या पिढीला खरंच ‘प्रेम’ या शब्दाची उंची, खोली आणि व्याप्ती धड कळते तरी आहे का! प्रेमातला गोडवा, त्यातली हुरहूर, त्यातली असोशी आणि त्याचं गांभीर्य... यातलं किती झिरपतंय आजच्या पिढीपर्यंत!
‘प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं,’ असं कवी पाडगावकर म्हणतात. प्रत्येक पिढीची प्रेम ही भावना, गाभ्यामध्ये ‘सेम’ असेलही पण प्रेमाकडे पाहण्याची पिढीनुसार बदलणारी मानसिकता समजून घ्यायची असेल तर चित्रपटगीतं ऐकावीत. ‘छोड दो आचल, जमाना क्या कहेगा’ अशी तेव्हा धीट, पण आता मर्यादशील वाटणारी प्रेमगीतं केव्हाच कालबाह्य झाली. ‘बाहों में आ सोणीये बस एक रात के लिये... तू मेरा हीरो’ अशी आजची गाणी आहेत. ‘जनम जनम का साथ’वरून ‘बस एक रात’ म्हणजेच ‘चले तो चांद तक, नही तो शाम तक’ इथपर्यंत प्रेम या संकल्पनेची व्याख्या ठिसूळ होत जाताना दिसतेय.

बॉयफ्रेंडने फेसबुकवरील त्याचे ‘कमिटेड’ हे स्टेटस बदलून ‘सिंगल’ असे केल्याचा धक्का (!) सहन न होऊन अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थिनीने मध्यंतरी आत्महत्या केली. आपल्या फोटोला मिळणारे लाइक्स आणि कॉमेंट हा मुलांसाठी जीवनमरणाइतका महत्त्वाचा प्रश्न झाला आहे. एकतर्फी प्रेमातून घडणार्‍या हल्ल्यांच्या, मैत्रिणीच्या नकळत तिचा व्हिडिओ रेकॉर्ड करून तिला अंकित करायचे एक शस्त्र म्हणून तो वापरल्या जाण्याच्या घटना वाढत आहेत. या सगळ्यामागे कारण एकच. प्रेम, मैत्री आणि शारीरिक आकर्षण यांमधल्या सीमारेषा अपरिपक्व वयातील मुलांना स्पष्ट समजलेल्या नाहीत.

आजच्या पिढीला सांगायला हवंय, की ‘प्रेमात पडणं’ ही आयुष्यातली अत्यंत सुंदर आणि महत्त्वाची घडामोड असली तरी प्रेम म्हणजेच आयुष्य नव्हे. कवी संदीप खरेंच्या या दोन ओळी प्रेमाचे सार सांगून जातात..
‘प्रेमात म्हणे आरंभ गोड अन् अंतापास विराणी
जो बुडालेला तो तरलेला, तरला तो बुडला, राणी’

प्रेमाची पहिली पायरी त्यागाची असते. आयुष्यातल्या प्राथमिकता ओळखून मनाला जीवनाशी जोडण्याचे जे नैसर्गिक नियम असतात ते पाळले गेले तर ते खरे प्रेम. जिथे नकारात्मकता असते, प्रेम दूर जाण्याची सतत भीती असते, स्वत:मधल्या त्रुटी स्वीकारून नकार पचवण्याची ताकद नसते, ते प्रेम नाहीच, असे अभ्यासक म्हणतात. मुलांनी स्वत:लाच प्रश्न विचारावा, हे आकर्षण तर नाही? यात स्वार्थ आणि अहंकार तर दडलेला नाही ना? प्रतिसादाचा अट्टहास तर नाही? कुठल्याही परिस्थितीत एकमेकांना साथ देऊ शकू का? नसाल तर पुढचं पाऊल टाकू नका, कारण तुम्हाला प्रेम म्हणजे काय हे अजून समजलेलं नाही.

दोष फक्त तरुणाईचा नाही. प्रेम या कल्पनेभोवती प्रसारमाध्यमांमधील जाहिरातींचं अर्थकारण केंद्रित झालं आहे. पालकांनी वेळ काढून माध्यमांवरून कोसळणार्‍या माहितीतून नेमके काय घ्यायचे, कुठे थांबायचे हे मुलांना सांगायला हवे. पौगंडावस्थेतील मुलांशी लैंगिक शिक्षणाबाबत बोलायला संकोच वाटत असेल तर kidshealth.org सारख्या संकेतस्थळांची, वैद्यकीय तज्ज्ञांची, समुपदेशकांची मदत घ्यायला हवी. बाहेरून चुकीची माहिती मिळण्यापेक्षा योग्य ती माहिती मुलांना योग्य पद्धतीने दिली तर धोक्याची वळणं नीट पार करता येतील.

मुलांमध्ये या वयात साठून राहिलेली प्रचंड ऊर्जा एखाद्या चांगल्या उद्देशाकडे, छानशा छंदाकडे वळवता आली तर बसता उठता प्रेमात पडण्यापेक्षा अधिक उदात्त ध्येय त्यांच्या आयुष्याला लाभेल. त्यातूनही प्रेमात पडलीच तर निदान ही मुलं या भावनेला पुरेशा गांभीर्याने समजू शकतील कारण प्रेम नावाचं वादळ आयुष्यात परवानगी घेऊन येत नाही.whatsappवर एकमेकांना गुलाब पाठवण्याइतकं प्रेम सोपं नाही, ऊठसूट ‘लव्ह यू, हेट यू’ म्हणण्याइतकं बालिश नक्कीच नाही. प्रेम म्हणजे एकमेकांचा आदर, सन्मान, काळजी, एकमेकांच्या साथीने रुजणं आणि वाढणं, विश्वास. आयुष्यातल्या अनुभवाबरोबर ही व्याख्या प्रगल्भ होत जाते.

खरं प्रेम म्हणजे दोन मनांची एकरूपता. इतकी, की त्याबाबत कबीर म्हणतात -
जब मैं थी तब हरि नाही, जब हरि है मैं नाही,
प्रेम गली अति सांकरी, ज्यामें दो न समाई.
हे जर आतून उमगलं तर valentine dayच्या वेगळ्या शुभेच्छा हव्यात कशाला !
मोहिनी मोडक, अकोला
mohinimodak@gmail.com