आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mohini Modak Article About Womens Wearing Clothes Fashion

डोईचा पदर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
“डोईचा पदर आला खांद्यावरी
भरल्या बाजारी जाईन मी...”
असं म्हणणार्‍या संत जनाबाईंनी तत्कालीन समाजातील स्त्रीच्या पेहरावाबद्दलच नव्हे, तर तिच्या एकूण वर्तनाबद्दल असलेल्या प्रस्थापित चौकटीला आव्हान दिलं. अर्थात यामुळे परिस्थिती फारशी बदलली नाही. पाश्चात्त्य पोशाख घालायचा नाही ही नवर्‍याची अट कटाक्षाने पाळण्याच्या बदल्यात पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशींना तर अमेरिकेतील थंडी असह्य होऊन क्षयरोगामुळे स्वत:चा जीव गमवावा लागला. आता असे जाचक नियम काहीसे शिथिल झाले असले तरी अजूनही मुलींच्या/स्त्रियांच्या पेहरावाकडे मागच्या पिढीचेच नव्हे, तर सबंध समाजाचे डोळ्यात तेल घालून लक्ष असते.

निर्भयावरील बीबीसीने केलेल्या वादग्रस्त माहितीपटात आरोपीच्या वकिलांनी जी काही मुक्ताफळे उधळली त्यात त्यांनी आजच्या मुलींच्या वागण्याबोलण्याच्या पद्धतीवर आणि राहणीवर आक्षेप घेतला होता. त्याने आरोपीचे समर्थन करताना म्हटले होते की समाजाने घालून दिलेली चौकट ओलांडणार्‍या मुलीच अत्याचाराच्या घटनांना जबाबदार आहेत. त्या वकिलाच्या मानसिकतेचा वरवर जोरदार निषेध होत असला तरी आतून कुठे तरी बहुसंख्य लोकांचे तेच मत आहे. अशा स्वरूपाचे विधान दोन वर्षांपूर्वी कॅनडातील एका पोलिस अधिकार्‍यानेदेखील केले होते. या मध्ययुगीन काळातील विचारांना विरोध करण्यासाठी, ’शारीरिक बळाचा वापर करून एखाद्या पुरुषाने स्त्रीवर अत्याचार करणे हे चूकच, त्याचा तिच्या कपड्यांशी संबंध नाही’ या भूमिकेतून जगभरातील अनेक देशांत स्लट वॉकचे (भारतात दिल्लीतदेखील) आयोजन करण्यात आले होते. ज्यांना त्यामागचा उद्देश कळला नाही अशा स्त्रियांनी त्या मोर्चात वाह्यात कपडे घालून त्या भूमिकेचा विपर्यास केला. समाजात व्यक्तिस्वातंत्र्य आणि स्वैराचार यातील फरक न समजलेल्या काही मूर्ख प्रसिद्धिलोलुप स्त्रियांमुळे, संस्कृती आणि अब्रू जपण्याच्या भीतीने समाज सरसकट सर्वच स्त्रियांच्या पेहरावावर अंकुश ठेवू पाहतो.

या बाबतीत पुरोगामी राहायचे की प्रतिगामी, याबाबत भारतीय समाज गोंधळलेला आहे. उदा : सानिया मिर्झाने टेनिस खेळताना शॉर्ट्स घालणेच योग्य आहे, जलद हालचालींसाठी तोच पोशाख सोयिस्कर आहे हे भारतीय मनाला एव्हाना पटले आहे. (अर्थात तिलाही मौलवींच्या टीकेला आणि विरोधाला सामोरे जावेच लागले होते) पण भारतासारख्या उष्ण प्रदेशात पर्यटनाला आलेल्या परदेशी तरुणींनी सुटसुटीतपणा या निकषाखाली तसा पोशाख घातला तर त्यांचा हेतू ‘शरीरप्रदर्शन’ असा मानला जातो. (आठवा ‘अतिथी देवो भव!’च्या सरकारी जाहिराती) मग निदान ‘भारतीय पोशाखातील’ मुलींना तरी बिनधोकपणे संचार करता यायला हवा, पण ते तसेही नाही. सोशल मीडियावर एक व्हिडिओ बराच गाजतो आहे. त्यात एक भारतीय वेशातील तरुणी दिल्लीमधील गर्दीच्या वेगवेगळ्या ठिकाणी एकटी चालत जाते. नंतरच्या क्लिपमधे तीच तरुणी पाश्चात्त्य पोशाखात त्याच ठिकाणांवरून चालत जाते. दोन्ही केसेसमधे छुप्या कॅमेर्‍याने टिपलेल्या, तिच्याकडे बघणार्‍या नजरा, शेरेबाजी यात फारसा काही फरक नसतो. अभारतीय पोशाखामुळे स्त्रिया आपल्याकडे लक्ष वेधून घेतात आणि अत्याचाराला बळी पडतात या समजुतीला छेद देणारा हा व्हिडिओ आहे.

मध्यंतरी एका नातेवाइकाकडे गेले होते. त्यांना त्यांच्या इंजिनिअर मुलीसाठी एक चांगलेसे स्थळ कळले होते. तिचे वडील म्हणत होते, निदान त्या दिवशी तरी साडी नेस. मुलीचे म्हणणे होते, लग्न ठरले तर लग्नात पारंपरिक विधी करताना नक्की नेसेन मी साडी. एरवी मी जशी असते आणि जशी दिसते तसंच त्यांनी मला स्वीकारावं, त्या प्रसंगापुरते उगाच कृत्रिम रूपात दाखवणे ही उलट त्यांची फसवणूक नाही का!

मग आई पुढे आली, “अगं, साडी कशी भारदस्त दिसते, भारताच्या मंगळ मोहिमेतील अनेक शास्त्रज्ञ स्त्रियांचे फोटो जगभर झळकले, साडीच नेसलेली होती ना त्यांनी. तुमच्या कॉर्पोरेट वर्ल्डमधल्या किती तरी उच्चपदस्थ स्त्रिया आवर्जून साडी नेसतात.” मुलगी उत्तरली, “माझा विरोध साडीला नसून साडी नेसण्याच्या सक्तीला आहे. काळानुरूप गैरसोयीचे म्हणून पुरुषांनी धोतर केव्हाच टाकून दिले. साडी तर त्याहून लांबलचक आहे. ”

आता मात्र तिच्या आजीला राहवले नाही, त्या म्हणाल्या, “ते काहीही असलं तरी साडी हा भारतीय संस्कृतीतला सर्वात सभ्य पोशाख आहे, त्यातच बाई शोभून दिसते.” यावर नात म्हणाली, “आजी, पुण्यात शंभर वर्षांपूर्वी सकच्छ (कासोटा घालून नऊवारी) आणि विकच्छ (आजची पाचवारी साडी) असा वाद रंगला होता तेव्हा आज ज्या साडीला तू सभ्य वगैरे म्हणतेयस ना, तेव्हाच्या समाजाने हीच पाचवारी साडी नेसणार्‍या स्त्रियांना उच्छृंखल, कुळबुडव्या, वाया गेलेल्या वगैरे म्हटलं होतं. आता ते किती हास्यास्पद वाटतं! कशाला सभ्य आणि कशाला अयोग्य म्हणायचं हे शेवटी काळाच्या कोणत्या तुकड्यावर उभे राहून आपण त्या गोष्टीकडे पाहतो यावर अवलंबून असतं.”

याचा अर्थ मुलींनी सर्रास तोकडे कपडे घालून फिरावे असा मुळीच नाही, तर त्या त्या परिस्थितीनुसार सोयीचा, सुखकर, आरामदायी पोशाख निवडण्याचे स्वातंत्र्य त्यांना असावे. शरीर हाच खरं तर आत्म्याचा पोशाख आहे असं म्हणणार्‍या आपल्या संस्कृतीचा गाभा जपणं महत्त्वाचं. अर्थात मुलाखतीला जाताना, विशिष्ट प्रसंग, सामाजिक समारंभाला काय परिधान करवे याची जाण त्या व्यक्तीला यशस्वी बनवू शकते.

मात्र, पोशाख कोणता आहे यापेक्षा तो आपल्याला शोभतो का, त्यात अवघडल्यासारखे तर वाटत नाही ना, ज्या ठिकाणी आपण जात आहोत तिथे तो घालणे योग्य आहे ना, याचे भान स्त्री असो वा पुरुष, दोघांनाही असायला हवे. समाजस्वास्थ्याची जबाबदारी स्त्रीइतकीच पुरुषांचीदेखील आहे त्यामुळे स्त्रीकडे ‘मादी’ म्हणून न पाहता ‘माणूस’ म्हणून पाहण्याचा संकेत रुजला तर तिच्या पोशाख वैविध्याकडे सूचकतेने बघणार्‍या नजरा आपोआप निवळतील.

मोहिनी मोडक, अकोला
mohinimodak@gmail.com