आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माध्यमांसह जगूया ! (रस्सीखेच)

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात कोणतेही तंत्रज्ञान पोहोचायला बराच कालावधी जावा लागला. त्यामुळे विकसित राष्ट्रे जशी तंत्रज्ञानाच्या बरोबरीने भौतिक प्रगती करत गेली, तसे आपले झाले नाही. तंत्रज्ञान तयार मुलासारखे हातात दिल्याने त्याच्याशी आपली नाळ जुळलेली नाही. त्याच्याशी नाते जुळायला आणखी वेळ लागणार. तोवर थोडेफार सामाजिक आणि सांस्कृतिक धक्के बसणार.

सणाच्या दिवशी घरात आणलेला श्रीखंडाचा डबा उघडून त्याचा आस्वाद घेणार, तोच त्या छोट्या मुलाला आई दटावते, “तुला कितीदा सांगितलंय, आधी फोटो काढायचा, अपलोड करायचा, मग खायचं.” हा बोचरा विनोद बहुतेकांनी ऐकला असेल. बुडत असलेल्या माणसाला वाचवायचं सोडून त्याचा व्हिडिओ काढणाऱ्या किंवा त्या पार्श्वभूमीवर ‘सेल्फी’ काढणाऱ्या महाभागाचं व्यंगचित्रदेखील पाहण्यात आलं असेल. ही काहीशी टोकाची परिस्थिती मानली तरी हे मात्र खरं की, गेल्या पिढीत मीडिया अर्थात माध्यमांचं आयुष्यातलं स्थान हे जेवणातल्या चटणी-कोशिंबिरीएवढं होतं. आताच्या पिढीचं आयुष्यच माध्यमकेंद्री झालंय. माध्यमांच्या विस्फोटामुळे माणूस माणसापासून दुरावला, वाचनसंस्कृती लोप पावली, सायबर गुन्हेगारी वाढली, असे आरोप आजच्या पिढीवर होत आहेत. त्यात काही अंशी तथ्य असले तरी खरं तर ही दोन पिढ्यांतील वैचारिक आणि सांस्कृतिक तफावत ज्याला आपण जनरेशन गॅप म्हणतो, त्याची निष्पत्ती आहे.

तंत्रज्ञानाला नेमकं कसं सामोरं जावं, कसं हाताळावं, त्याचे भलेबुरे परिणाम काय होऊ शकतात, हे कळायच्या आत ते वेगाने माध्यमांमार्फत आपल्यावर येऊन आदळले, हे या अपरिपक्वतेमागचं मूळ कारण. १४५०मध्ये गटेनबर्गने छपाईयंत्र बनवले. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात दूरसंदेश, दूरध्वनी, छायाचित्र असे महत्त्वाचे शोध लागले. ल्युमिए बंधूंनी बनवलेला कॅमेरा, जॉन लोगी बेअर्डने केलेले दूरचित्रवाणीचे प्रात्यक्षिक या महत्त्वाच्या घडामोडींमुळे २०व्या शतकाच्या पूर्वार्धात नभोवाणी आणि दूरचित्रवाणी प्रस्थापित झाली. या सुमारास आपला देश स्वातंत्र्यलढ्यात गुंतलेला होता. साहजिक भारतात कोणतेही तंत्रज्ञान पोहोचायला बराच कालावधी जावा लागला. त्यामुळे विकसित राष्ट्रे जशी तंत्रज्ञानाच्या बरोबरीने भौतिक प्रगती करत गेली, तसे आपले झाले नाही. तंत्रज्ञान तयार मुलासारखे हातात दिल्याने त्याच्याशी आपली नाळ जुळलेली नाही. त्याच्याशी नाते जुळायला आणखी वेळ लागणार. तोवर थोडेफार सामाजिक आणि सांस्कृतिक धक्के बसणार.

माध्यमं आणि आजची पिढी एकमेकांसह जगायला अद्याप शिकत आहेत. खरा संवाद फक्त भेटल्यावरच होतो, असं आजची पिढी आता मानत नाही. कॉलेज, क्लासेस, नोकरी, व्यवसाय सांभाळण्याच्या धावपळीत घर, नातेवाईक, मित्रपरिवार यांनाही जपायचं, हा तोल सोपा नाही. मग व्हॉट‌्सअॅप किंवा सोशल मीडिया हा आधारच नाही का? कधी गप्पा, कधी मस्करी, कधी चर्चा, इमोजी, स्मायली हे ‘व्यक्त होणंच’ आहे. सोशल मीडियाच्या व्यासपीठानं सर्वसामान्य व्यक्तीला व्यासपीठ मिळवून दिलं. याचा सकारात्मक वापर करून जगात आणि देशात नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी अनेक आंदोलने यशस्वी केली. पिकासा, फोटोबकेटसारख्या फोटो शेअरिंग साइट्सवरून जगभरात छायाचित्रांची देवाणघेवाण सुरू असते. वेगवेगळ्या विषयांवर ब्लॉग लिहिणं, लेखावर प्रतिक्रियेच्या द्वारे चर्चा करणं यातून उलट आजची पिढी अधिक संवादी होऊ लागली आहे.

मागची पिढी अधिक वाचन करायची; पण ती पिढी ‘काय’ वाचायची, हेही पाहायला हवे. वाचन फक्त आजच्या पिढीने करावं, अशी अपेक्षा करणारी मागची पिढी, टीव्हीला खिळल्याने आपलं वाचन कमी झाल्याची कबुली देत नाही. वाचनाच्या स्वरूपापेक्षा पुस्तकांशी संपर्क येणं हे जास्त महत्त्वाचं नाही का! मौखिक परंपरेपासून छापील पुस्तकांपर्यंत आणि आता ई बुक, ऑडिओ बुक, वर्तमानपत्रांचे अ‍ॅप्स किंवा किंडलपर्यंत माध्यम बदलत वाचन पुढे जातेच आहे. थोडक्यात, आज वाचनसंस्कृती लोप पावत नसून बदलते आहे, इतकेच. ई-साहित्य संमेलनांसारखे सुखद बदल होत आहेत.

मात्र आजची पिढी ही सादरीकरणाकडे जितके लक्ष देते, तितके आशयाला देत नाही. कार्यक्रमाची बौद्धिक पातळी कमी ठेवली की प्रेक्षकसंख्याही वाढते. त्वरित प्रतिक्रिया देण्याच्या नादात अविचारीपणे, अभ्यास न करता मते मांडण्याचे खूळ लागते. यामुळे माध्यमे ‘पोकळ’ होऊ लागली आहेत. शिवाय त्यांच्यावर अभारतीय भांडवलशहांची मालकी असल्याने ‘काय दाखवावे’ याची सूत्रे त्यांच्या हातात आहेत. त्यांच्या

(अ)नैतिकतेच्या व्याख्या भारतीयांवर सतत लादल्या जात आहेत. भारत हा ‘देश’ म्हणून एकसंध राहण्याऐवजी बाजारपेठ कसा बनून राहील, यातच त्यांना जास्त रस आहे. या सगळ्यात आजच्या पिढीचा वैचारिक गोंधळ होतो आहे. त्याची परिणीती माध्यमांचा उपयोग अफवा, अंधश्रद्धा, अश्लीलता पसरवण्यासाठी होतो आहे.

ही समज खरं तर ज्यांनी वाढवायची ती मागची पिढी आत्ता कुठे तंत्रज्ञान वापराचे धडे आजच्या पिढीकडून बिचकत बिचकत घेते आहे. त्यांचा यात दोष नाही; पण मग तंत्रज्ञानाबरोबरच हवे नको निवडण्याची समज विकसित करणार कोण? योग्य सायबर वापरासह, कायद्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवायला हवी. पारंपरिक माध्यमे आजही जगण्याला आशय आणि प्रेरणा देतात. त्यांचे जतन होणे महत्त्वाचे आहे. माध्यमांच्या झंझावातात मूल्ये उन्मळून पडत असतील तर ती जपण्याची आणि स्वानुभवावरून शहाणं होऊन भावी पिढीला माध्यमांसह जगण्याचा विवेक शिकवण्याची जबाबदारी आजच्या पिढीची आहे. तरच या भरकटलेपणातून आपण सावरू शकू. मग माध्यमांनी हिरावून घेतलेले आपल्या आयुष्याचे सुकाणू पुन्हा आपल्या हातात येऊ शकेल.
mohinimodak@gmail.com