आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरा : चेतनेचे स्फुल्लिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लेखिका आयटी प्रोफेशनल, व्यावसायिक प्रशिक्षक असून स्तंभलेखन, प्रासंगिक लेखन करत असतात. वाचनप्रेम वाढावे, यासाठी त्या विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांत सहभाग घेत असतात. 
 
एका स्त्रीचं अंतर्विश्व किती समृद्ध असू शकतं याची प्रचिती देणारी एक अप्रतिम व्यक्तिरेखा म्हणजे ’किरा आर्गुनोव्हा’. आयन रँड या गाजलेल्या लेखिकेच्या ’वि द लिव्हिंग’ या झपाटून टाकणाऱ्या पुस्तकाची किरा ही नायिका. आयन रँड ही फक्त लेखिका नाही तर एक विचारधारा मानली जाते. रशियातल्या समूहवादाला झुगारून व्यक्तिस्वातंत्र्याचा सन्मान करणाऱ्या अमेरिकेत ती स्थायिक झाली. तिथे तिने निर्माण केलेल्या व्यक्तिवादी, वास्तववादी साहित्यकृतींपैकी एक म्हणजे ’’वि द लिव्हिंग.’ लेखिकेचे वैचारिक प्रतिबिंब म्हणजे ’किरा’. १९३६मध्ये प्रकाशित झालेली, बरीचशी आत्मचरित्रात्मक मानली गेलेली ही कादंबरी. यातली ’चेतनेचे स्फुल्लिंग’ असलेली, व्यक्तिवादाचं तत्त्वज्ञान ठामपणे मांडणारी किरा मात्र कालातीत वाटते. किराच्या संकल्पना निश्चित आहेत. ’जगणं म्हणजे काय? जगण्यातलं सौंदर्य म्हणजे काय?’ हे तिला नेमकं माहीत आहे. आजच्या आधुनिक स्त्रीलासुद्धा हेवा वाटावा असा नि:शंकपणा किरामध्ये आहे.
 
किरा म्हणजे कोणी असामान्य स्त्री नव्हे. जग बदलून टाकण्याची, भव्यदिव्य स्वप्नं म्हणजे तिला वेडगळ कवीकल्पना वाटते. स्वत:च्या प्रतिभेच्या आणि बुद्धिमत्तेच्या बळावर स्वतःचं चिमुकलं पण परिपूर्ण असं जग निर्माण करण्य़ाची क्षमता दर्शनी नाजूक असलेल्या किराच्या मनगटात आहे. तिच्या भोवतीचं लहानसं जग बदलण्याची तिची स्वप्न वास्तववादी आहेत. त्यासाठी झोकून देण्याची तिची तयारी आहे. तिला जे मिळवायचंय ते तिच्या क्षमतेवर. किरा मला भावते ती यामुळेच.
बोल्शेविक क्रांतीनंतर रशियात साम्यवादी सरकारचा एकछत्री अंमल सुरू झाला होता. या पार्श्वभूमीवर रँडने साकारलेली किरा ही एकूणच ’सामर्थ्याच्या गैरवापराला नकार देणाऱ्या, स्वत्व शाबूत असलेल्या मानवी मनोवृत्तीची’ प्रतिनिधी आहे. हे राजकीय अराजक माजलं तेव्हा आयन रँडने नुकतंच तारुण्यात पदार्पण केलं होतं. साम्यवादाच्या नावाखाली उद्ध्वस्त होणारा समाज पाहिला, समाजल्याण आणि मानवतावादाच्या नावाखाली मूलभूत हक्कांची गळचेपी होताना पाहिली, त्या धगीत तीही होरपळून निघाली. या सगळ्य़ा भावभावनांचे पडसाद किराच्या व्यक्तिरेखेत उमटले आहेत. १९२२-२९ या काळात घडलेली ही कादंबरी केवळ अमुक एका काळातले आक्रंदन मांडत नाही, वेदनेचे भांडवल करत नाही. उलट वेदना महत्वाची नसून माणसाने त्याविरुद्ध दिलेला लढा, माणसाची विजिगीषु वृत्ती सर्वाधिक महत्त्वाची आहे, ते मानवी अस्तित्वाचं वैशिष्ट्य आहे, हेच सार्वकालिक तत्त्वज्ञान किराच्या भूमिकेतून मांडलेलं दिसतं.
 
अत्यंत प्रतिकूल पार्श्वभूमीवर आपल्या आकांक्षा जपत राहणारी ’किरा’ हे या कादंबरीतलं एकमेव, खऱ्या अर्थाने जिवंत पात्र. कादंबरी सुरू होते तेव्हा राज्यक्रांती दरम्यान विस्थापित झालेलं तिचं कुटुंब पेट्रोग्राडला (सत्तांतरानंतर ’लेनिनग्राड’) नुकतंच परत आलेलं असतं. लहानपणापासून निसर्गात भटकणं, वाहत्या नदीत तराफ्यांवर पाय रोवून सुसाट रोरावत जाणं या सगळ्यातून किराला एक गोष्ट गवसलेली असते ती म्हणजे ’एकटेपणातला आनंद.’ याचा अर्थ ती माणूसघाणी असते असा नव्हे. नातलगांशी तिचे सौहार्दाचे संबंध असतात. क्रांतीपूर्वी सुखवस्तू आयुष्य उपभोगू शकलेल्या नागरिकांची आता बूर्झ्वा म्हणून हेटाळणी होत असते. आता साम्यवादी सत्तेच्या टाचेखाली आलेल्या या नागरिकांना दोन वेळचे अन्न मिळवण्यासाठी झगडावे लागत असताना १८ वर्षांची किरा मात्र अभियंता होऊन बांधकामतज्ज्ञ होण्य़ाचे ध्येय बाळगून असते. त्या वेळेस एखाद्या सभ्य सुसंस्कृत मुलीने हे क्षेत्र निवडणे म्हणजे गहजबच. "स्त्री म्हणून स्वत:च्या अंगभूत गुणांचा समाजासाठी उपयोग करून द्यायचा सोडून, तू हे भलतंच, पुरषी क्षेत्र का निवडते आहेस,"असं व्हिक्टर हा तिचा साम्यवादी मावसभाऊ तिला जरबेने विचारतो. "आपल्या थोर श्रमिक देशाची सेवा करता यावी म्हणूनच तंत्रक्षेत्र निवडलंस ना तू?"हा प्रश्न तंत्रशाळेत नव्याने भेटलेली साम्यवादी सहाध्यायी सोनियादेखील तिला विचारते. दोघांनाही ती शांतपणे एकच उत्तर देते."फक्त स्वत:ची आवड, पॅशन म्हणून हे शिकते आहे. बस्स. लाल म्हणजेच साम्यवादी सरकारसाठी किंवा समाजासाठी नव्हे."आजही कित्येक जणांना आपल्या आयुष्याबद्दल इतक्या नेमकेपणाने निर्णय़ घेता येत नाहीत.
लिपस्टिकसारख्या प्रसाधनाकडेसुद्धा ’व्यक्तिवादी वस्तू’ म्हणून पाहणाऱ्या या देशात, सामाजिक बांधिलकी, संपत्तीचं समान वाटप अशा देखण्या शब्दांमागचा पोकळपणा किरा पुरेपूर ओळखून असते. जेव्हा तिचा तंत्रशाळेतला नितळ मनाचा पण कट्टर साम्यवादी मित्र आंद्रेई टॅगानोव्ह तिला विचारतो, "साम्यवादात चूक काय आहे? माणसाने माणसासाठी जगावं याहून जगण्याचं उत्तम ध्येय काय असू शकतं?"त्यावर किरा म्हणते, "हे म्हणणं सोपं आहे पण जे लोक हुशार, प्रतिभावंत, सर्वोत्तम आहेत त्यांना समान दर्जाच्या नावाखाली कर्तृत्वशून्य, लायक नसलेल्या लोकांच्या पातळीला का ओढून आणायचं? लाखो निस्तेज, खुरडणाऱ्या आत्म्यांसाठी या उत्कट, उमद्या, जीवनाचा अर्थ समजलेल्या, खऱ्या अर्थाने माणूस असलेल्या लोकांचा बळी का द्यायचा?"तिचे हे अगदी विरुद्ध पण स्पष्ट विचार ऐकता ऐकता या प्रकाशशलाकेत आंद्रेईसह आपणही गुंतत जातो. किराने मांडलेलं हे तथ्य वास्तवात येऊन त्याची परिणती १९९० साली रशियाची शकले होण्यात झाली हे आपण जाणतोच. आदर्शवाद हा दिसायला सुंदर असला तरी व्यवहार्य असतोच असे नाही. किराचा ’वास्तववाद’ हा मला तिच्या व्यक्तिमत्वाचा एक विलोभनीय पैलू वाटतो. साम्यवादाला कडाडून विरोध करणारी, ’हे तत्त्व राबवणारी माणसे नव्हे तर हा विचारच मुळात चूक आहे,’ हे ठणकावून सांगणारी किरा निव्वळ वैचारिक मतभेद आहेत म्हणून आंद्रेईशी मैत्री मात्र तोडत नाही. तिला त्यापलीकडचा माणूस दिसतो. ती तो निखळ मनाने जपते. ’माणसाने माणसासाठी कसं जगावं,’ हे किराला अधिक नीट उमगलेलं आहे. साहजिकच या पारदर्शी व्यक्तिमत्वाबद्दलचे आंद्रेईचे आकर्षण, तो साम्यवादी संघटनेत वरिष्ठ पदावर पोचल्यानंतरही वाढतच राहते.
परंतु किरा गुंतली असते लिओ केव्हालेन्स्कीमध्ये. साम्यवाद्यांच्या हेरगिरीला, कारवायांना न जुमानता तिला आसुसून भेटायला येणारा फरार प्रतिक्रांतिवादी, देखणा लिओ! सुरुवातीला एकमेकांच्या साथीने सगळ्य़ा अडचणींवर मात करू म्हणत एकमेकात रममाण झालेले हे दोन आशावादी जीव सगळीकडून होणाऱ्या सरकारी मुस्कटदाबीमुळे घुसमटू लागतात. किरा मात्र त्यांची स्वप्नं उराशी धरून लिओला धीर देत राहते. गरिबी, अन्याय, आजार आणि अपमान याला कणखरपणे तोंड देणारी किरा आपल्याला चकित करते तशीच लिओलाही. लिओ म्हणतो, "माझी आता एकच आस आहे, ती म्हणजे आयुष्यात एखाद्या गोष्टीची तीव्र आस कशी बाळगावी असावी ते मला तुझ्याकडून शिकायचे आहे."साम्यवादी विचारसरणीच्या कोणत्याही संघटनेचं सदस्यत्व घेतलं तर सरकारकडून चार सोयी मिळायच्या, रेशनकार्डावर अन्न थोडं अधिक मिळायचं, घरभाडं कमी लागायचं परंतु आपल्या विचारांशी, मूल्यांशी प्रतारणा करण्य़ाच्या बदल्यात मिळणाऱ्या या सवलती लिओ आणि किरा नाकारतात. दोघांना आपली जुजबी नोकरीही गमवावी लागते. बूर्झ्वा असल्याचा शिक्का कपाळी असल्याने नवी नोकरी मिळणं अशक्य होते. कसंबसं दोघं शिकत राहतात पण लिओ आता खचू लागतो. ’आपण पेकाटात लाथ मारू हाकलून दिलेली दोन कुत्री आहोत,’ असं तो उद्वेगाने म्हणू लागतो. एवढं होऊनही त्यांचे परस्परांवरील प्रेम सुतराम कमी होत नाही. किरा आणि आंद्रेईची तंत्रशाळेत अधूनमधून भेट होत राहते, पण इतकी उपासमार होत असतानाही स्वाभिमानी किरा कधीही आंद्रेई जवळ परिस्थितीचे रडगाणॆ गात नाही. त्यालाच ते जाणवते. तिच्या अंतर्मनातलं सौंदर्य तिच्या चेहर्‍यावर झळकत राहतं. तिच्या देहबोलीतून व्यक्त होत राहतं. त्याची भूल लिओहून अधिक आंद्रेईला पडते. आणि आपल्यालाही. मजुरीची कष्टाची कामे करत कदान्न खात राहिल्याने प्रकृती ढासळलेल्या लिओमध्ये क्षयाची लक्षणे दिसू लागतात. त्याला हवापालटासाठी पाठवता यावं म्हणून किरा जीवाचं रान करते. ’लाखो कामगार क्रांतिकाळात गेले, एक बूर्झ्वा मेला तर काय हरकत आहे,’ अशा संवेदनाहीन शब्दात तिला आर्थिक आणि सरकारी मदतीची दारे बंद केली जातात. शेवटी लिओला जगवण्य़ासाठी तिला एकच मार्ग दिसतो- आंद्रेई. त्या बदल्यात ती त्याला शरीराबरोबरच प्रेमाची खोटी कबुली देते. तिच्या आणि लिओच्या नात्याची कल्पना नसलेला, किरावर निरातिशय पण अव्यक्त प्रेम करणारा आंद्रेई तिच्यावर सर्वस्व उधळून देतो. किरा प्रेम हे मूल्य जीवापाड जपणारी आहे त्यामुळेच तिच्या प्रेमासाठी ती ’स्व-पलीकडे’ पाहू शकली असावी. अनाथालयाची कळा आलेल्या त्या शहरात लिओ बरा होऊन किरासाठी परत येतो पण फक्त शरीराने. मनाने तो जणू मृतप्राय अवस्थेत असतो.
तडफडत किंवा साम्यवाद्यांना शरण जाऊन रोज तीळ तीळ मरण्य़ापेक्षा काळाबाजार करून उरलेले ४ दिवस चैनीत जगणे परवडले या निष्कर्षाला पोचलेला लिओ विवेक बाजूला ठेवतो. किराच्या विरोधाला न जुमानता वाममार्गाला लागतो. त्याला आतून जगावंसं वाटावं, आपल्या जबाबदारीपोटी तरी त्याची नैतिकता जागी राहावी म्हणून किरा त्याला लग्नाची गळ घालू लागते तेव्हा आधीच पूर्णत: खचलेला लिओ तिला म्हणतो, "तू जर मला थांबवू शकत नाहीयेस तर तो लाल कारकुनाने खरडलेला एक कागदाचा तुकडा मला कसा थांबवू शकेल?"इथे मला किराचा विस्मय वाटतो. लिओने लग्नाला होकार द्यावा म्हणून ती त्याच्यावर भावनिक दबाब टाकू शकली असती, स्त्रीसुलभ आक्रोश करू शकली असती पण किरा असामान्य आहे. कागदोपत्री नात्यापेक्षा मनाचे भावबंध तिच्यासाठी अधिक महत्त्वाचे आहेत, तितकेच लिओचे व्यक्तिस्वातंत्र्यदेखील. साम्यवादी संघटनेचा वरिष्ठ अधिकारी या नात्याने लिओवर कारवाई करण्यासाठी आंद्रेईला लिओच्या घराच्या झडतीचा परवाना मिळतो आणि तिथल्या कपाटात त्याला त्याने किराला भेट दिलेले पोशाख, वस्तू दिसतात. सुरा खुपसल्यासारखं ते सत्य काळजात रुतलेला आंद्रेई मनाने कोलमडतो. एव्हाना तथाकथित साम्यवादाचा खोटा जयजयकार करणाऱ्या सहकाऱ्यांची वैचरिक अधोगती पाहणाऱ्या आंद्रेईला साम्यवादाचा फोलपणा जाणवू लागलेला असतो. किरा विपरीत स्थितीतही साम्यवादाला शरण जात नाही हे पाहताना ’माणूस कसा असू शकतो, कसा असायला हवा हे मी तुझ्यात पाहतो,’ हे तो तिला सांगतो. तिने आपल्याला वापरलं ते स्वार्थासाठी नाही तर केवळ लिओवरच्या तिच्या निस्सीम प्रेमाखातर हे त्याला कळतं तेव्हा किरा त्याच्या नजरेला अधिकच उंच भासू लागते. ’समाजहिताच्या नावाखाली वैयक्तिक भावनांचा चुराडा करण्य़ाचा हक्क साम्यवाद्यांना नाही,’ हे रोखठोकपणे सांगणाऱ्या किराने आंद्रेईच्याच नव्हे तर समूहवादी मानसिकतेच्या डोळ्यात अंजन घातलेलं आहे. किरा दुसऱ्या कुणाची असणं हे पहाडासारखं दु:ख अंगावर कोसळतं तेव्हा माणसाच्या वैयक्तिक भावना त्याचं विश्व कसं आणि किती व्यापून टाकतात हे त्याला लख्ख उमगतं. साम्यवादाने नाकारलेलं माणसाचं खासगीपण हाच त्याच्या जगण्याचा आधार आणि ऊर्जा असते हे सत्य मान्य करून आंद्रेई आपलं आयुष्य संपवतो.
 
आपल्या पाठीमागे किरा आणि आंद्रेई यांच्यात निर्माण झालेल्या संबंधांबद्दल कळल्यावर किराने आपला विश्वासघात केला असं समजून लिओ व्यथित होतो. परंतु त्या आधीच त्याने सॅनिटोरियममध्ये ओळख झालेल्या स्त्रीच्यासोबत परदेशात जाऊन आयुष्य़ घालवायची बेगमी केलेली असते. इथे लिओ कणाहीन झाल्याचे स्पष्ट दिसते. किरा त्याला आंद्रेईबद्दल कोणतेही स्पष्टीकरण देत नाही कारण तिचा आत्मा निष्कलंक असतो. ’जर तू जिवंत असलास आणि विसरला नाहीस तर भेटू,’ अशी अनिश्चितता त्यांच्या प्रत्येक भेटीच्या निरोपाच्या क्षणी स्वीकारणारी किरा आतून शांत राहते ती यामुळेच. ज्याच्या प्रेमासाठी आपण आपलं शील पणाला लावलं त्याने आपल्याला त्यागावं याचा खेद ती वाटून घेत नाही. निरपेक्ष प्रेम कदाचित यालाच म्हणत असावेत. किरा स्त्रीवादी असती तर कदाचित या अन्यायाने पेटून उठली असती पण किरा स्त्री-पुरुष या भेदांच्या पलीकडे खुल्या मनाने पाहणारी, व्यक्तिवादी आहे कदाचित म्हणूनच ती या घटनाक्रमाकडे विद्ध मनाने पण वस्तुनिष्ठपणे पाहू शकली आहे. एकाकी किरा स्वप्नांची साथ सोडत नाही. वैध मार्गाने परवानगी मिळत नाही म्हटल्यावर छुप्या मार्गाने देशाबाहेर पळ काढण्याचा निकराचा प्रयत्न करते. अश्रू ओघळल्यानेसुद्धा वेदना व्हाव्यात अशी कडाक्याची थंडी साहत रात्रभर चालत राहते. सीमेवरील साम्यवादी सरकारी पहारेकऱ्याची गोळी तिचा वेध घेते तेव्हा हाडं गोठवणाऱ्या बर्फातून स्वातंत्र्याच्या दिशेने चालत राहिलेल्या किराचं शरीर कोसळतं पण आत्मा तसाच राहतो, अलांच्छित, अवध्य, अभंग आणि अविनाशी.
नायिका म्हणून आपल्या नजरेसमोर किरा अचूक उभी करण्य़ात लेखिकेची साहित्यिक प्रतिभा महत्त्वाची आहेच परंतु किरा एक विचारदीप घेऊन उभी आहे आणि वाचनाअंती तो ती आपल्या सुपूर्द करते. त्यागमूर्ती म्हणून गृहीत धरल्या गेलेल्या, सामाजिक, धार्मिक अपेक्षांच्या दडपणाखाली घुसमटणाऱ्या अनेक स्त्रियांना त्यांना काय हवं आहे याचा उच्चार करण्याचं, निर्णय घेण्याचं धैर्य किरा देऊ शकते. केवळ स्त्रियांनाच नव्हे तर झुंडशाहीमुळे दडपलेल्या गेलेल्या अनेक आवाजांना हुंकारण्य़ाचं बळ देण्य़ाची ताकद किरामध्ये आहे. खुज्या विचारांच्या काळोखात किरा तिच्या स्वयंप्रेरणॆने चमकत राहते आणि इतर अनेक आयुष्यांना कळत- नकळत प्रेरणा देत राहते. आपणही तिच्यासवे जगण्य़ातली मूल्यं प्रामाणिकपणे पण वास्तववादी भूमिकेतून जपण्यातलं सौंदर्य शोधायला लागतो. मग वाटायला लागतं, क्षणाचं असो वा दीर्घ, आयुष्य असावं तर किरासारखं, स्वतंत्र आणि अपराजित.
(मूळ इंग्रजी पुस्तक व मंजिरी जोशी यांनी केलेल्या मराठी अनुवादाची मदत हा लेख लिहिताना घेतली आहे.)
बातम्या आणखी आहेत...