आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलं नक्‍की कशासाठी हवंय ?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जनरेशन गॅप अर्थात पिढ्यांमधील दरी यावर आधारित हा स्तंभ लिहिता लिहिता जाणवले, एकाच व्यक्तीच्या मनात देखील स्वत:च्या जीवनातल्या टप्प्यांबाबत अशी दरी असते. वयपरत्वे अनुभवाअंती आपल्या सवयी, आवडीनिवडी, आचार-विचार, अगदी मूल्यं आणि श्रद्धादेखील बदलत जाताना दिसतात. मग जर स्वत:तले बदल आपण सहजतेने स्वीकारत पुढे जातो तर पिढ्यांमधील अंतराकडे आपण सहज वृत्तीने का पाहू शकत नाही. पालक होतेवेळेस आपली जी काय वैचारिक-मानसिक घडण झालेली असते, त्याच मुशीत आपण मुलांना बसवू पाहतो. खरं तर कालांतराने आपण पुन्हा बदलतो आणि मागे वळून पाहताना ’तेव्हा आपलं जरा चुकलंच,’ असं वाटू लागतं, तोवर उशीर झालेला असतो.

मुलांचं करिअर हा आजच्या पालकांच्या दृष्टीने सर्वात संवेदनशील मुद्दा. स्वातंत्र्योत्तर पिढीला विनासायास नोकऱ्या मिळाल्या. पुलंच्या भाषेत सांगायचे तर, लोक एकदा का बँकेतल्या किंवा पोस्टातल्या नोकरीला चिकटले की तिथेच जन्म काढून मुलाला ’ग्रॅज्युएट’ करून आणि मुलीला ’उजवून’ घराला ’श्रमसाफल्य’ वगैरे नाव देणे, हीच आयुष्याची इतिकर्तव्यता मानत असत. मधल्या पिढीला त्या मानाने थोडा संघर्ष करावा लागला परंतु तोवर करिअर हा शब्द अपवादानेच वापरला जायचा. आता मात्र तो परवलीचा शब्द झाला आहे. करिअरची खरी व्याख्या, ’आवडीच्या क्षेत्रात झोकून देऊन कार्य करणे’ अशी आहे. व्यवहारात मात्र ’लठ्ठ पगाराची नोकरी किंवा भरपूर नफा देणारा व्यवसाय’ म्हणजे करिअर असे गृहीत धरले जाते.

“पैसा कमावणे हे ध्येय असू नये असे नाही, उलट ते अतिशय महत्त्वाचे आहे पण ते एकमेव ध्येय नसावे. आयुष्यात नाती, छंद, कला, वाचन, सामाजिक भान, पर्यटन एकूणच जीवनानुभवांना महत्त्व नसले तर माणसात आणि यंत्रमानवात फरक तो काय” असे सांगणाऱ्या पोस्ट्स पालक वाचतात, नि फक्त फॉरवर्ड करतात. जावई निवडताना मात्र तो शक्यतो ’आयटी’तला असावा याची काळजी घेतात आणि मुलगा भलत्याच क्षेत्रात जाऊ नये याचीही. त्यासाठी ते खूप कष्ट घेतात. त्या बदल्यात, दहावीपर्यंत मुलाने अबॅकसपासून स्केटिंगपर्यंत सर्व क्लासेस करावे, शिवाय भरपूर मार्क्स मिळवून चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळवावा, मग एकामागून दुसऱ्या ट्यूशनला धावावे शिवाय आयआयटी किंवा तत्सम परीक्षांची तयारी करावी, बारावीला त्याहून चांगले गुण मिळवून इंजीनिअर वा डॉक्टर व्हावे (आणि स्कॉलरशिपवर परदेशी जाता आले तर मग गंगेत घोडे न्हाले.) अशा त्यांच्या ’सामान्य’ अपेक्षा असतात.

पालकांच्या दृष्टीने यात चूक काय !
चूक एकच, मुलाची कुवत समजून न घेणे.
या अपेक्षा पूर्ण न करू शकलेली एक खंतावलेल्या मनाची पिढीच्या पिढी त्यातून घडते आहे. इतर अनेक कलाकौशल्ये या मुलांमधे असू शकतात पण साचेबद्ध अपेक्षांच्या चक्रात प्रवाहाविरुद्ध काही करण्याचे त्यांना भय वाटू लागते. अशी ’हरलेल्या मनाची’ मुले मूठभर जिंकलेल्या (!) मुलांकडे असूयेने पाहत जमेल ते काम करत आयुष्य रेटत राहतात. हे बदलायचे तर करिअरच्या वेगवेगळ्या पर्यायांचा पालकांनी मनमोकळा स्वीकार केला पाहिजे. आंतरिक सुख आणि भौतिक गरजा यांचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न मुलांच्या हातात हात घालून केला पाहिजे.
प्रख्यात विचारवंत जे. कृष्णमूर्ती पालकत्वाकडे एका वेगळ्याच दृष्टिकोनातून, काहीसं अंतर राखून पाहतात. ते विचारतात की, आपल्याला मुले कशासाठी हवीत हा प्रश्न आई-वडील स्वत:ला कधी विचारतात का. आपले नाव पुढे चालावे, आपल्या इस्टेटीस वारस लाभावा एवढ्यासाठीच बहुतेकांना मुले हवी असतात. आपल्या समाधानाचे, आपली भावनात्मक गरज भागवण्याचे एक साधन अशीच मुलाकडे बघण्याची आपली दृष्टी असते. आपण मुलाकडे आपल्या स्वप्नपूर्तीचं अवजार म्हणून पाहाणं आधी बंद करू या. मुलाला समजावून घ्यायचे तर त्यात धिक्काराचा भाग त्यात येता कामा नये. त्या नात्यातही सन्मानच असायला हवा. कृष्णमूर्ती म्हणतात, पालक ज्याला प्रेम म्हणतात ते मालकी हक्काचेच दुसरे नाव आहे. आपल्या मुलावर प्रेम करणे म्हणजे त्यांचे मन समजावून घेणे, ज्यायोगे त्यांची मने संवेदनशील होतील असे शिक्षण त्यांना देणे, त्यांच्या व्यक्तित्वात सुसंवाद होईल अशी जीवनदृष्टी त्यांना देणे. त्या आधी ती पालक म्हणून स्वत:त निर्माण करणे.

त्यांचे विचार वाचल्यावर लक्षात येते की, आपल्या संस्कार, प्रेमाच्या कक्षा किती सीमित आहेत. अब्राहम लिंकन यांनी गुरुजींना लिहिलेल्या पत्रात फक्त क्रमिक नव्हे तर जीवन शिक्षण देण्याचं आवाहन केलं आहे. या पातळीवर आपण आपल्या मुलातील परिवर्तन कधी बघतच नाही. जगात प्रेम, सद्भाव निर्माण करण्याची त्याचीही जबाबदारी आहे, समाजाप्रती त्याला उत्तम बांधीलकी जपता यायला हवी, साहित्य कलेतही त्यानं रमावं, भरभरून जगावं इतका उदात्त विचार आपण ‘पॅकेज’ या शब्दात अडकल्यामुळे करूच शकत नाही. आपण केवळ आजच्या समाजमान्य प्रतिष्ठित पदांवरच मुलांनी जावे यासाठी धडपडत असतो. तुम्ही म्हणाल, हे तत्त्वज्ञान मान्य असलं तरी शेवटी समाज ,‘तुमचा मुलगा काय करतो’ हेच विचारणार, ‘तुमचा मुलगा कसा आहे’ हे नव्हे, त्याचं काय? खरंय, अशा वेळी पालक म्हणून आपण करायचं याचं उत्तर खलिल जिब्रानने त्यांच्या एका कवितेतून दिलं आहे...

“तुम्ही सांभाळा मुलांचं शारीर अस्तित्व
पण अधिराज्य नका गाजवू त्यांच्या आत्म्यावर
तुम्ही आहात केवळ एक धनुष्य
ज्यातून सुटतील हे चैतन्याचे तीर
उद्याच्या दिशेनं
तो धनुर्धारी दोरी ताणेल तेव्हा
वाका आनंदानं! बस इतकंच!”
mohinimodak@gmail.com
बातम्या आणखी आहेत...