आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिरुचीतील दरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका संगीतविषयक कार्यक्रमात प्रसिद्ध सिंथेसायझर वादक सत्यजित प्रभू मागील पिढ्यांपासून आजच्या पिढीपर्यंत संगीतात होत गेलेल्या बदलाबद्दल बोलत होते. सहवादकाने त्यांना म्हटलं, ‘मेलडी हरवत चाललीय, हल्लीच्या गाण्यांचा ‘राग’ कोणता हेदेखील ओळखता येत नाही. आता ‘लुंगी डान्स’चा राग कुणाला ओळखता तरी येतो का?’ त्यावर प्रभूंचं उत्तर होतं, ‘मला येतो ना! राग ‘अनावर.’ यातला गमतीचा भाग सोडला तरीही आजच्या पिढीच्या कलेबाबतच्या. विशेषत: जनमानस व्यापणाऱ्या संगीत कलेबाबतच्या अभिरुचीवरचं प्रश्नचिन्ह कायम राहतं.
असं म्हणतात की, साहिर लुधियानवी चित्रपटासाठी गीतलेखन करताना संगीतकारापेक्षा एक रुपया जास्त मानधन घेत असत. गाण्यात सुरांइतकंच किंवा त्याहीपेक्षा शब्दांचं महत्त्व अधिक असं त्यांना वाटायचं. सिनेगीतातल्या ‘काव्या’ला इतकी किंमत असण्याचा तो काळ केव्हाच मागे पडला. आता शब्दांवर सुरांच अतिक्रमण झालंय. टॉलस्टॉयच्या मते कला माणसाच्या जीवनातला अविभाज्य घटक असायला हवा. जी कलाकृती सर्वसामान्यांना कळत नाही ती कसली आलीय चांगली कलाकृती, असे त्यांचे मत होते. हा निकष अनेक टीकाकारांना मान्य नव्हता. आजही तो संगीताच्या बाबतीत मान्य करायचा तर केवळ ठेक्यामुळे सर्वसामान्यांना चटकन भावणारी हिंदीत धुमाकूळ घालणारी मुन्नी, फेव्हिकॉल, शीला, वगैरे प्रकरणं आणि मराठीतली त्याची कोंबडी, रिक्षावाला, वगैरे रूपं महान कलाकृती म्हणून गणली गेली असती.
या विरोधी टीकाकारांच्या मते कलाकृती व्यवस्थित कळायला आस्वादकाची तेवढी पात्रता व तयारी असायला हवी आणि म्हणूनच खालावलेल्या अभिरुचीबद्दल फक्त आजच्या पिढीला दोष देता येणार नाही. आजच्या पिढीचा ‘कान’ आणि ‘डोळे’ तयार करण्याची जबाबदारी या आधीच्या पिढीची होती. परंतु ८०च्या दशकापासून उमराव जान, बाजारसारख्या चित्रपटांचे अपवाद सोडले तर सिनेसंगीताचा दर्जा उतरणीला लागला. संगीत नाटकं जवळपास बंद झाली, शास्त्रीय संगीताची समज आणि रसिकांची टक्केवारी अधिकच उणावली. जागतिकीकरणानंतर वाढत गेलेल्या चंगळवादाचा परिणाम संगीतावरही झाला. बाजाराची मागणी तसा पुरवठा करण्याच्या नादात भाषेचा दर्जाही खालावत गेला. आज सोशल नेटवर्किंगवर कित्येकदा अगदी सुमार दर्जाच्या, ट ला ट जुळवणाऱ्या कविता शेअर केल्या जातात, त्याला हजारो लाइक्स मिळतात. त्याचीच पुढे ‘गाणी’ होतात. ती ‘गाजतात.’ आशयघन साहित्य म्हणजे काय, हे समजून घेण्याइतका वेळ आजच्या धावपळीच्या जगात आहे कुणाला! मैफिलींचा श्रोता म्हणून आनंद लुटण्याइतका निवांतपणा कुणाजवळ फारसा नाही. शिवाय आजच्या ‘सबकुछ इन्स्टंट’ पिढीला लगेच बोssssर होतं. कलेमध्ये गुणवत्तेपेक्षा, रियाजापेक्षा सादरीकरणाला अवास्तव महत्त्व आलं आहे. क्वचित एखादं उत्तम गाणं गायक उत्कटपणे सादर करत असतो आणि अचानक विंगेतून वेगाने एक नर्तकांची फौज येते आणि गायकाला घेरून नाचू लागते, रंगबिरंगी दिव्यांची जोरात उघडझाप सुरू होते आणि या गदारोळात ते गाणं हरवून जातं.
पिढ्या बदलल्या तरी कला आणि साहित्यातला आत्मा हरवता कामा नये, असा आग्रह धरणाऱ्या क्रोचे या इटालियन तत्त्वज्ञाने माणसाच्या जगण्याचे न-नैतिक आणि नैतिक असे भाग पाडले आहेत. थकल्याभागल्या सामान्य माणसाच्या मनोरंजनासाठी न-नैतिक कलाप्रकार वापरले जात. पूर्वीचे वग, तमाशा, नौटंकी ही त्याची उदाहरणं. हल्ली त्याची जागा सवंग ‘आयटम साँग’ने घेतली आहे. हे कलाप्रकार केवळ विश्रांतीच्या काळासाठी वापरले जावेत असा संकेत होता. दुर्दैवाने या कला (!) प्रकाराने आयुष्यातला सर्वच काळ व्यापायला सुरुवात केली आहे आणि हे गंभीर आहे. खरं तर एखादी कला जीवनाला जितक्या गंभीरपणे भिडते, सामोरी जाते तितकी तिच्यातली नैतिक बाजू आणि पर्यायाने गुणवत्ता महत्त्वाची होत जाते. या पार्श्वभूमीवर आजही जेव्हा एखादा अभिजीत पोहनकर ‘पिया बावरी...’सारखी दर्जेदार फ्यूजन कलाकृती निर्माण करतो, एखादे काळजाला हात घालणारे सूफी गीत कानावर पडते, बालगंधर्वमधल्या ‘चिन्मया सकल हृदया...’सारखी रिंगटोन एखाद्या विशीतल्या मुलाच्या मोबाइलवर वाजते, विविध वाहिन्यांवरचे लिटिल चॅम्प्स तयारीने गातात, गुलजार, जावेद अख्तरसारख्यांच्या रचना, अमिताभ भट्टाचार्यचे ‘रे कबीरा...’सारखे अर्थगर्भ गीत मनाचा ठाव घेतं तेव्हा जाणवतं...सगळंच संपलेलं नाही.
अल्प प्रमाणात का होईना पण संगीतात नवनवीन प्रयोग होत आहेत आणि माध्यमांच्या मदतीने ते वेगाने सर्वदूर पोचत आहेत. पिढी बदलते आहे, आस्वादक्षमता बदलते आहे. ती जोपासायला हवी. साधारणपणे आपल्यावर कलेचे जसे संस्कार झाले असतील तशा आपल्या आवडीनिवडी घडत जातात. सिनेसंगीत सतत ऐकले गेले तर ते आवडू लागते, गझल किंवा नाट्यसंगीताचा संस्कार झाला तर ते मनाला भिडते, सिंफनी किंवा पाश्चिमात्त्य सुरावटी ऐकत राहिल्या तर त्या आवडू लागतात. या वैविध्यातून कान तयार होतो आणि सरसनिरस ठरविण्याचे कौशल्य निर्माण होते. लोकप्रियता आणि गुणवत्तेचा समन्वय साधला जाऊ शकतो. तेव्हा आजच्या पिढीच्या अभिरुचीला नावे ठेवण्यापेक्षा गरज आहे ती उमद्या कलाकारांना प्रोत्साहन आणि कलेतील प्रयोगांना दाद देण्याची, नवतेचा स्वीकार करण्याची आणि वैविध्यपूर्ण संगीत कलेचे संस्कार आजच्या पिढीवर करण्याची.
बातम्या आणखी आहेत...