आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कथा पहिली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भावनेचं रूप घेऊन शब्द कागदावर अवतरतात. भावनांच्या लडीतून कथाविश्व आकारास येत जातं. या विश्वाची काही वैशिष्ट्यं असतात. ती कधी दीर्घकथेतून उलगडतात, कधी लघुकथेतून. परंतु अत्यल्प शब्दांत अवघे विश्व सामावलेली कथा आपल्याला निराळ्या रूपात भेटते. एकदा भेटली की, कायमस्वरूपी आपली होऊन जाते. अशाच वाचकमनांवर प्रभाव टाकणाऱ्या लघुत्तम कथांना व्यासपीठ देणारे हे पाक्षिक सदर...
 
गुजराती गल्लीच्या पाठीमागे ढिगाने उकिरडे दिवसेंदिवस पडून आहेत. समोरच दाल मिल आहे. मिलच्या शेजारी पडीक जागेत भल्यामोठ्ठ्या खड्ड्यात एका डुकरिणीने काही दिवसांपूर्वी काही पिल्लांना जन्म दिलाय. डुकरिणीचं नाक तीक्ष्ण आहे, बाजूने माणूस वा कुत्रे गेल्याचा वास आला, तरी ती फेंदारलेलं नाक अजून फेंदारून गुरकावतेय. एका ढिगाजवळ परकर नि फाटलेल्या पोलक्यातील चिपाड छातीची एक बाई गोणपाटात धरलेल्या तान्ह्या जिवाला पाजतच खायला काही मिळतंय का, म्हणून उकिरडा चाफलतेय... तीन मजली इमारतीतील शेठाणी घरावर इन्कम टॅक्सवाल्यांची धाड पडणार, असा सुगावा लागल्याने घरातील रोकड, दागदागिने असा ऐवज एका गोणपाटात बांधून मिलमध्ये येते. इमानदार रफीक तिचा ऐवज ठेवून घ्यायला नकार देतो. शेठाणी तो ऐवज कुणी आपल्याला बघत नाही ना, अशा पद्धतीने उकिरड्यात लपवून निघून जाते. कोवळ्या मांसाच्या वासानं आलेली काही हापापलेली कुत्री पिल्लं ओरबाडायला डुकरिणीशी झटापट करतायेत. दुसऱ्या उकिरड्यावर तरी काही मिळेल, या आशेनं बाई तान्ह्याला स्तनांपासून विलग करत गोणपाटात लपेटून दुसऱ्या उकिरड्यावर जाते. उकिरडा चाफलताना तिला शेठाणीने लपवलेलं गोणपाट हाताशी लागतं. ते ती उघडून पाहते नि तिचे डोळेच गरगरतात. पैशांच्या लालसेने तान्ह्याला तिथे ठेवून ऐवजाचं गोणपाट उचलायचं, असं ती मनोमन ठरवते. इकडे कुत्र्यांची नि डुकरिणीची झटापट वाढते, डुकरीण जिवाच्या आकांताने ओरडतेय... तिच्या जबड्यात साऱ्या विश्वाची ऊर्जा एकवटली आहे. हा आवाज ऐकून रफीक बाहेर येतो, पायाशी पडलेला दगड कुत्र्यांवर भिरकावतो. कुत्री भेदरतात. बाई ज्या उकिरड्यावर असते, तिकडे सटकतात. कुत्र्यांचा हा सैरभैर अवतार बघून बाई घाईघाईनं गोणपाट उचलते, नि जीव मुठीत घेऊन धावत सुटते. रफीक आत जातो तशी कुत्री पुन्हा डुकरिणीच्या पिलांकडे मोर्चा वळवतात. डुकरीण त्वेषाने तापलीये. ती पुन्हा ताकद एकवटून कुत्र्यांवर गुरकावतेय... ते दृश्य पाहून पुढे निघून आलेल्या बाईला स्वतःचीच लाज वाटते. आपण काही कागदाच्या तुकड्यांसाठी पोटच्या पोराला उकिरड्यावर टाकून आलोत नि एक डुकरीण मात्र पिलांच्या जिवासाठी कुत्र्यांशी लढतेय... या विचारासरशी बाई मागे वळून बाळाकडे धाव घेते. रस्त्यावरचे दगड कुत्र्यांच्या दिशेने भिरकावते नि डुकरिणीजवळ हातातलं गोणपाट ठेवते. डुकरीण बाईवरसुद्धा गुरकावते. पण बाई बाळ ठेवलंय त्या उकिरड्यावर जाते.  भराभर उकिरड्याचा उपसा करते. काही क्षणांच्या उपश्यानंतर गोणपाठ डोळ्यांना दिसतं, तशी ती त्वेषाने त्यावर झेप घेते. बाई उकिरड्यावर आहे, हे पाहून कुत्री पुन्हा डुकरिणीजवळ येतात. पुन्हा झटापट होते. कुत्रे घाबरून मागे सरकतात. बाईने डुकरिणीजवळ टाकलेलं गोणपाट तोंडात धरून पळून जातात. बाई धपापत्या उरानं त्या लचक्या कुत्र्यांना गोणपाट तोंडात धरून नेताना केवळ बघते. हाताशी राहिलेलं गोणपाट छातीशी लावते. पण लेकराची काहीच हालचाल कशी नाही, म्हणून गोणपाटाकडे बघते आणि दुसऱ्या क्षणी किंचाळून उकिरड्यावर धाडकन कोसळते... बाईच्या गोणपाटात शेठाणीने लपवलेला ऐवज असतो नि कुत्र्यांनी पळवलेल्या गोणपाटात तिचं बाळ असतं...
 
कथा दुसरी
तिला जुबेदाच्या दुकानातून निघायला अंमळ उशीरच झाला. याकूब, तिचा शोहर घरी पोहोचायच्या आत तिला घरी पोहोचायचं होतं, म्हणून ती भराभर चालत घराच्या दिशेने निघाली होती. दुरूनच घराचं दार उघडं असल्याचं तिला दिसलं, नि आता आपली काही खैर नाही, हे तिने ओळखलं. दारूच्या नशेत तर्र याकूबने तिला रिदाशिवाय घरात प्रवेश करताना पाहिलं नि  मार मार मारलं. दारूच्या नशेत शिव्या घालतच पडल्या जागी तो तिला उपभोगत राहिला. तो अखेर थकला, तेव्हाच फातिमाची सुटका झाली...
 
सकाळी कण्हत त्याच अवस्थेत तिने रोजची कामं आटोपली. कपभर चहा नि जर्मनच्या तडा गेलेल्या ताटलीत दोन बनपाव तिने याकूबजवळ ठेवले. बऱ्याच हाका मारूनही याकूब उठला नाही, तेव्हा तिने नाक्यावरच्या हकीमला बोलावलं. याकूब आता कधीच उठणार नाही, असं सांगितल्यावर ती जागच्या जागी स्तब्ध झाली. मोहल्ल्यातल्या लोकांनी पीएमसाठी पलीकडच्या बड्या अस्पतालमध्ये याकूबची बॉडी हलवली. सारे सोपस्कार त्यांनीच पार पाडले. याकूबचं ‘चाळीसाव्वं’ आहे, पण फातिमा पूर्वीपेक्षा जास्त खंगलीये. ती तिच्या मोठ्या लोखंडी ट्रंकेतून कागद काढून भिंतीवरच्या कॅलेंडरकडे एक नजर टाकते... ट्रंकेतल्या एका सफेद कागदावर असतो ती आई होणार असल्याचा रिपोर्ट, नि दुसऱ्या सफेद कागदावर असतो याकूबमुळे तिला झालेल्या एड्सचा रिपोर्ट...

- रेखाचित्रे : प्रदीप म्हापसेकर
monalisa.vishwas@gmail.com
बातम्या आणखी आहेत...