आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बा मेघदूता!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बत्तिसावा कालिदास : बा मेघदूता!
मेघदूत : ओ कालिदास भौ! आपला बा न्हाई काडायचा सांगून ठिवतो. काय-बाय ऐकून न्हाई घेनार आपन.
बत्तिसावा कालिदास : तू तं नाराज झाला भौ! आपन तर तुले जरा प्रेमआदराने बोलत होतो. तू भल्लाच मतलब काढला त्यातून. असं रागेजून कसं चालंल बाप्पा.

मेघदूत : तसं आसंल तर ठीक हाये. पर म्हाई याद कशाले काढली तुमी? आखाडी आली वाटतं जवळ.
बत्तिसावा कालिदास : वा भौ! तुमी आक्षी बराबर ओयखलं बरं. एवडे तुमी शायने, आन तरीबी हे फुलचाडे लोक तुमाले ढग काऊन म्हणतेत, तेच समजत नाई आपल्याले. ते असो. आखाडीच्या पईल्या दिशी परंपरेनुसार तुमाले...
मेघदूत : म्हाईत हाये हो भौ. उगाच लांबड नका लावू. तुमच्या लवरले उजनीले जाऊन तुमची ख्यालीखुशाली सांगायची हाये, ते म्हाईत हाये मले. काय असंल ते पट्टदिशी सांगा, अन् जाऊ द्या मले.
बत्तिसावा कालिदास : हेच. ते फुलचाडे लोक काय खोटं नाय बोलत. तू लेका ढगच हायेस. तुले कधी कुठे बरसावं ते बी कळत न्हाई. धरनात बरसाचं सोडून तू शेहरात बरसतोस. आन तेबी दिवसा. लोक बिच्चारे तयार बियार होऊनशान भायेर पडतात, आन तू नेमका तवाच त्यायच्यावर पानी ओत बदाबदा. ‘ढ’ लेकाचा. आन त्या समुद्राचंच पानी आसतं ना रे तुह्या पोटात. मग इतला गर्व कसला करतो बे फुटाण्या. तरी बरं त्या बारा बोडक्याच्या दादानं धमकी देताच वट्ट ताळ्यावर आले तुमी समदे आन निमूटपणे बरसून राह्यले औंदा. आमच्या दादाची पावरच हाये तशी! आन म्हाया लवरले निरोप सांगाले तू उजनीले जाणार व्हय रे बह्याडा. उजनी राह्यली तिकडं सोलापूरले. तिकडं गेला की, ती मानसं काई तुले सोडणार न्हाई. लई कडू हायेत. बोलताना बी कडू कडू केल्याबिगर त्यानले बोलनं गोड लागत न्हाई. तवा आता नीट ध्यान देऊन ऐक. म्हाया लवरच्या बापाची उचलबांगडी झालीय इकडं मुंबैले. तिथं कसं जायचं, ते मालूम नसंल तुले म्हणून सांगतो. इथनं सुटायचं, आन थेट संत्रापुरी गाठाची. म्हणजे, आपलं नागपूर बे. खाली मोठमोठाले पूल दिसले की, समजून घ्याचं नागपूर आलं म्हणून!
मेघदूत : म्हाईत हाय नं भौ! आपल्या नितीनभौनंच बांधले नं समदे पूल. गडावानी मानूस हाय तो.
बत्तिसावा कालिदास : हाय न्हाई, होता होता. देवेंद्रानं कबजा केलाय आता तठीसा. तुह्या नितीनभौले आता पुलावर काय फूटपाथवर पन जागा ठिवली न्हाई, त्या लोकांनी. तूबी जपून आस. लगोलग तिथून वर्ध्याले सुटायचं. खालून दालवड्याचा मस्त घमघमीत वास आला, की समजाचं वर्धा आलं म्हणून.

तिथनं यवतमाळ गाठायचं. खाली कपाशीचे गठ्ठे आन त्याच्याखाली शेतकर्‍याचे मुडदे दिसले, की समजाचं यवतमाळ आलं म्हणून. त्यायच्यासाठी थोडा टाइम थांबून जरूर चार टिपं गाळ. कारण, त्यायच्यावर रडाले बी आता कोनी उरलं न्हाई. कोनी म्हणतात, ते आळशी हाये, आन कोनी म्हणतं की ते अडानी हाये. तू काय बोलू नको त्यानला. तिथनं वाशीमले बगल देऊन अकोला आन बुलडाण्यात जाचं. ‘गण गण गणात बोते’ असा गजानन म्हाराजाचा मंत्र आन् सोबतीले तिरथराम शर्माच्या शेगाव कचोरीचा फर्मास वास आला, की समजाचं हेच ते अकोला-बुलडाना म्हणून. तिथनं पुढं बरसातीच्या दिसात बी जिथं टँकरच्या रांगा आन् त्याच्या मागं हंडे कळश्या घेतलेल्या लोकांच्या रांगा दिसंन तुले, तिथं समजाचं, की जालना आलं म्हणून. तिथनं आपल्या मुंडेबाबाचं नगर गाठाचं. शेजारीच, साईबाबाचं शिर्डी दिसल तुले. त्याच्या पुढं तुले ढिगानं पाट्या दिसल्या, वाडेहुडे दिसले, रस्त्यावर गाड्या-बिड्यांची गर्दी दिसली की समजाचं विद्येचं माहेरघर आलं म्हणून.

मेघदूत : भौ तुमी विद्या पण पटवली का? असला बाहेरख्यालीपना चांगला न्हाय बरं. वैनीले सांगीन बरं.
बत्तिसावा कालिदास : ये भुसनळ्या, मी पुन्याची गोष्ट करतोय. इथं दाखवलास तसला श्यानपना तिथं नको दाखवू. आन उगाच तिथल्या पाट्यांचे अर्थ शोधू नको. तिथनं थेट एक्स्प्रेस हायवेनं मुंबई गाठाची. खाली तुले मरनाची गर्दी दिसंल लोकांची. तुले वाटंल की, कोणती जत्रा सुरू हाय. ती लोकलची जत्रा हाय. ती 24Ÿ7 भरते तिथं. अन् आता तिथं जोराचा पाऊस बी आसंल. खाली रस्त्यावरपन लोकानले चालाले अडचण व्हते. तू तर वरतून जानारा. तवा जपून, न्हाईतर जाशील उडत, भलतीकडंच. तिथं पोचला की...

मेघदूत : ओ भौ! झालं का तुमचं सांगून. कोणत्या टायमात राहून राह्यले तुमी. जग गेलं तिकडं, आनं तुमी अजून इकडंच. हा मोबाइल घ्या, आन लावा वैनीले फोन. झालंच तर फेसबुकवर पन हाये वैनी. चांगले चारेक हजार फ्रेंड हायेत वैनीचे. लई पॉप्युलर हाये ती. तुमी बी रिक्वेस्ट पाठवा, आन ऑनलाइन चॅटिंग करत बसा. उगा माह्या डोक्यात जाऊ नका. आपली सटकली तर ढगफुटी व्हते, आन मंग उत्तराखंड व्हतं, समजलं का!