आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातातही इच्छाशक्तीने तारले...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अत्यंत साधं पण स्थिर आयुष्य मी व माझी पत्नी, मुलगा जगत होतो. एक्सेलो इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये मी नोकरीला होतो. सोबत छोटासा व्यवसाय करीत होतो. पण देवाच्या मनात काय आलं कुणास ठाऊक, तो भयानक दिवस माझ्या आयुष्यात उगवला. 19 डिसेंबर 1993 ला माझा जीवघेणा अपघात झाला. दुपारची वेळ होती. माहूरला जाताना अपघात झालेला. ट्रकने धडक दिलेली. हेल्मेट घातल्याने सुदैवाने डोके वाचले पण पूर्ण शरीर उद्ध्वस्त झाले. या अपघातामुळे दोन्ही माकडहाडे पूर्णत: तुटली, गुदद्वार फाटले. तसेच मोठे आतडे बाहेर आले.
आदल्याच दिवशी माझ्या केवळ दोन वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा वाढदिवस आम्ही साजरा केला होता. आता पुढे काय होणार, या विचाराने माझे मनोबलही त्यामुळे पूर्णपणे खचले. अपघाताच्या वेळी एका सायकलवाल्याने माझ्या खिशातले कागद वाचून लगेचच कंपनीशी संपर्क साधला नसता तर मी वाचलोदेखील नसतो. या अपघातातून सावरायला मला वर्ष लागले. बारा ते तेरा वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. येथील राजेबहाद्दूर हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटल व पुढे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये माझ्यावर उपचार चालू होते. त्यातून बरा होऊन मी कंपनीत पुन्हा रुजू झालो. पण स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची खूप इच्छा होती. इतक्या भीषण अपघातातून देवाने वाचवले तर काहीतरी वेगळे करून जगण्याचे सार्थक करण्याची इच्छा होती. अपघातामुळे वर्षभर दवाखान्याच्या फेर्‍या घालत असताना मी खूप काही शिकलो होतो. मरण समोर दिसत होते पण मरणाने
मला हुलकावणी दिली होती. त्यामुळे
पुन्हा नव्याने जगण्याच्या मिळालेल्या संधीचं मी सोनं करायचं ठरवलं त्यातून पत्नीनं साथ दिली.
आमचा ड्रायव्हर सीट बनवण्याचा व्यवसाय होता. या व्यवसायात नवीन प्रयोग करीत मी व्यवसायच वाढवण्याचा प्रयत्न केला व त्यात यशस्वी झालो. 2002 मध्ये मी नोकरी सोडली आणि यशवंत इंजिनिअरिंग वर्क या नावाने स्वत:चा उद्योग सुरू केला. या उद्योगाअंतर्गतच आम्ही वॉकिंग स्टिक कम चेअर बनवली. वजनाला अत्यंत हलकी अशी ही स्टिक अपघातग्रस्तांना तसेच वृद्धांना चालताना आधार द्यायचे काम तर करतेच, शिवाय तिचा खुर्चीसारखा बनवलेला फोल्ड केलेला भाग उघडून तिच्यावर बसतादेखील येते. असे अनेक नवीन नवीन प्रोजेक्ट करीत, फॅब्रिकेशनसारखी कामे करीत मी आज अत्यंत यशस्वी आणि समाधानी आयुष्य जगतो आहे. मी निमाच्या कार्यकारिणीतही होतो. आता ग्रामपंचायत विभागात सरकारची ऑर्डर घेऊन सोलरचे प्रोजेक्ट पोहोचवतोय. आता छत्तीसगडचीदेखील सोलरसाठीच ऑर्डर घेतली आहे. फॅब्रिकेशनची कामे, वॉकिंग स्टिक इथपासून अगदी बंगलोरला जाऊन आर्ट ऑफ लिव्हिंगचे स्ट्रक्चरल वर्कही त्यांच्या ब्रिजसाठी केलं.
आज वयाच्या 51व्या वर्षी अँजिओप्लास्टीही झाली तरी सुंदर आयुष्य जगतोय ते केवळ चांगलं जगण्याच्या दुर्दम्य इच्छाशक्तीमुळे आणि घरच्यांच्या पाठिंब्यामुळे.. सतरा वर्षे नोकरी आणि व्यवसाय असा समृद्ध प्रवास मी करू शकलो. एकेकाळी माझा अपघात झाला होता यावर आता कुणाचा विश्वासही बसत नाही. तो अपघात मला माझे स्वत्व शोधण्यासाठी एक दैवी संधी होती. अपघात झाला म्हणून मी नैराश्यात गेलो होतो. ते नैराश्य जर जिद्दीच्या बळावर मी घालवले नसते तर हा समाधानी दिवस मला पाहायला कधीच मिळाला नसता. निर्मितीची आणि जगण्याची ओढ तुमच्या हातून कितीही कठीण काम प्रतिकूल परिस्थितीतही करवून घेते, याचा मला प्रत्यय आला आहे.

मो. 9890015576