आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअर विषयक बहुतेक समस्यांचे मूळ फसलेल्या नियोजनात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘हेडहंटर’ या पुस्तकातून आपली यापूर्वी भेट झाली. उद्योगक्षेत्रात खास महत्त्वाच्या पदांसाठी योग्य माणूस शोधणे, पारखणे आणि त्याला त्या जागी चपखल बसवण्यासाठी मदत करणे, हे माझं म्हणजे हेडहंटर्सचं काम, त्या लेखमालेतून तुमच्या समोर सविस्तरपणे आलेच आहे. या निमित्ताने स्टील, प्लास्टिक उद्योगक्षेत्रापासून सेवा आणि मनोरंजन क्षेत्रापर्यंत विविध प्रकारची माणसे पारखताना गेल्या १५-१७ वर्षांमध्ये अनेक लोकांशी माझा परिचय झाला. दररोज मी जवळपास ५ ते १० नव्या लोकांशी बोलत असतो. कामामुळे माझा बऱ्याच ठिकाणी प्रवास होतो. रोजच्या धकाधकीच्या जीवनात असा प्रवास एक वेगळाच आनंद देऊन जातो. कारण आपल्यासारखीच जिवंत आणि रसरसती माणसे प्रवासात नित्य भेटत राहतात. आता तर अशी माणसे वाचायची जणू सवयच जडलीय मला. या माणसांचे अनुभव, अडचणी, महत्त्वाकांक्षा जाणतांना कारकिर्दीचे अवलोकन, भविष्यातील झेप यावर विचाराची संधी मिळते.  
 
- करिअर नियोजन संकल्पनेचा विचारच नाही  : सध्या मार्केटमधील मूलभूत विचारधारा कुठल्या क्षेत्राला झुकते माप देत आहे, अशा स्वरूपाचे विचार आणि चिंतन करायला प्रवासाखेरीज उत्तम जागा नाही. वेगवेगळी कामे करणाऱ्या, विविध इंडस्ट्रीतील, विविध विचारधारा, धर्म, श्रद्धा गटांच्या लोकांना मी भेटत असतो. या लोकांमधले श्रेणी, पगार, भाषा, कौशल्य यांचे वैविध्य पाहिल्यावर एक मुद्दा माझ्या ठळकपणे लक्षात आला की आपल्याकडे करिअर नियोजन या संकल्पने चा पुरेसा विचार सहसा होत नाही. १९५०-६० च्या दशकाच्या तुलनेत हल्लीच्या मुलांना करिअरचे भान चांगले असले तरी, समाजात करिअरचा सर्वांगाने परिपूर्ण विचार आणि त्यानुसार त्याचे नियोजन हे अभावानेच आढळते.  
 
करिअर विषयी अशी जाणीव निर्माण करणं, प्रत्यक्ष नियोजनाला मदत करणं आणि तुमची धडपड आणि स्वप्न यांचा मेळ घालून देणं, हेच या लेखमालेचे उद्दिष्ट्य. विद्यार्थी, करिअरकडे भाबड्या स्वप्नाळू वृत्तीने बघणारे तरुण, आपल्या काळातील आदर्श आयुष्याच्या कल्पनांच्या साच्यात मुलांना बसवू पाहणारे पालक अशा सगळ्यांना या लेखमालेतील अनुभव मोलाचे ठरतील. त्याचबरोबर चालू नोकरीत असमाधानी असलेले, वेगळे काही करण्याची धडपड करू पाहणारे व्यावसायिक, उच्चपदावर काम करण्याची आकांक्षा आणि कुवत असूनही तिथपर्यंत पोहोचू न शकलेले व्यावसायिक अशा सर्वांनाी लेखमालेतून दिशा देण्याचा प्रयत्न आहे.  
-व्यक्तिमत्त्वाचे पैलू   : उत्तम करिअरसाठी हवे प्रभावी व्यक्तिमत्त्व. त्यासाठी अनुरूप पेहराव, इंग्रजीवरील प्रभुत्व, प्रभावी देहबोली आवश्यक आहेच. यामुळे आत्मविश्वास निश्चितच वाढेल, परंतु “रिअल पर्सनॅलिटी’चे काय? स्वामी विवेकानंदांनी परिपूर्ण व्यक्तिमत्त्वाची आदर्श व्याख्या केली आहे. “शारीरिक, मानसिक, बौद्धिक, नैतिक आणि अाध्यात्मिक असे पाच पैलू मानवाशी निगडित असतात. शरीराने सशक्त, मनाने संतुलित, नीतिवान, बुद्धीने तीक्ष्ण आणि अाध्यात्मिकदृष्ट्या उन्नत असे व्यक्तिमत्त्व म्हणजेच आदर्श व्यक्तिमत्त्व’. आपण या कोशंट्स विचार आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टिकोनातून करायला हवा. आपल्याजवळ कोणता कोशंट कमी आहे हे समजून घेणे, त्यावर मात करण्यासाठी योजना आखणे, मर्यादांचा मनमोकळेपणे स्वीकार करणे आणि प्रत्येक कोशंटचा नियोजनबद्ध विचार करणे ही करिअरमधील यशाची गुरुकिल्ली आहे. करिअ विषयक समस्यांचे मूळ नसलेल्या वा फसलेल्या नियोजनात आहे.  (क्रमश:) -लेखक हेडहंटर पुस्तकाचे लेखक आहेत
girish@resumeindia.com
बातम्या आणखी आहेत...