आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आई! मला जन्म घेऊ दे’ आणि ‘सेवाव्रती’ लवकरच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धरणगाव महाविद्यालयातील अध्यापक तथा साहित्यिक वा.ना.आंधळे हे गेल्या तीन दशकांपासून समाजासाठी पूरक वाङ्मयनिर्मिती करीत आहेत. दीड वर्षांपूर्वी त्यांनी ‘आई! मला जन्म घेऊ दे’ ही काळजाला भिडणारी कविता लिहिली आहे. संवेदना बोथट झालेल्या समाजाला स्त्री भ्रूणहत्या रोखण्याचा संदेश या 18 ओळींच्या कवितेतून त्यांनी दिला आहे. त्यांच्या या कवितेचे तब्बल 28 भाषांमध्ये भाषांतर झाले आहे. एवढेच नव्हे तर महाराष्‍ट्राच्या कानाकोप-यातील असंख्य तीर्थक्षेत्र, सार्वजनिक ठिकाणी पोस्टर्स रूपाने ती चिकटवलेली पाहावयास मिळते. देशभरातील अक्षर तपस्वींनी या कवितेचे केलेले भाषांतर व मूळ कविता लवकरच पुस्तक रूपाने वाचकांच्या भेटीला येणार आहे.


स्त्री भ्रूणहत्या जनजागृतीचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी साहित्याच्या प्रांतात रममाण झालेल्या प्रा.आंधळे यांनी अलीकडेच ‘लेक वाचवा’ अभियान हाती घेतले आहे. डोळ्यांवर पट्टी बांधलेला समाज आता सजग व्हावा म्हणून त्यांच्या लेखणीतून ‘तू जसे पाहिले, जग मलादेखील पाहू दे, नको मारू आई मला जन्म हा घेऊ दे’ या सकस कवितेचा जन्म झाला आहे. उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ, शाळा, महाविद्यालयांच्या वार्षिक अहवालात या कवितेला ‘मानाचे पान’ मिळाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून विविध सामाजिक संस्था व व्यक्तींच्या माध्यमातून दीड वर्षांत या कवितेचे 1 लाख 65 हजार पोस्टर्स प्रकाशित झाले आहेत. वारकरी संप्रदायातील धरणगावचे एस.डब्ल्यू.पाटील यांच्यासह अनेक कीर्तनकारांनी ही कविता कीर्तनसेवेतून सादर केली आहे. एकंदरीत या कवितेचा जन्म आणि तिला भाषांतरित करून प्रचार, प्रसार कार्यात आलेले अनुभव, वाचकांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आणि लिंगअनुपाताचे प्रमाण सम होण्यासाठी समाजाने आता मानसिकतेत बदल केला पाहिजे, असा संदेश देण्यासाठी प्रा.आंधळे यांचे ‘आई! मला जन्म घेऊ दे’ हे डोळस पुस्तक वाचकांच्या भेटीला येणार आहे. एकच कविता तब्बल 28 भाषेत या पुस्तकात मांडण्यात आली आहे. देशभरातील सर्व जाती-धर्मीयांना त्यातून ‘कन्या जन्माचे स्वागत’ करण्याची प्रेरणा मिळणार आहे. कवी प्रा.वा.ना. आंधळेंचा धरणगाव येथील शिष्य हेमंत भागचंद चौधरी हा गुरुप्रेमापोटी हे पुस्तक प्रकाशित करून सामाजिक बांधीलकी जपणार आहे, हे विशेष!


‘आई मला जन्म घेऊ दे’ या पुस्तकात सर्वप्रथम प्रा.वा.ना.आंधळे यांची मूळ कविता असणार आहे. त्यानंतर भाषांतरित कविता मांडण्यात येणार आहेत. मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, सिंधी, पंजाबी, राजस्थानी, ओडिया, गुजराथी, बंगाली, कानडी, मल्याळी, तेलगू यांसह सर्व बोलीभाषांमध्ये ही कविता वाचकांना एकाच पुस्तकात उपलब्ध होणार आहे. प्रा.वा.ना.आंधळे यांची इयत्ता तिसरीच्या बालभारती पाठ्यपुस्तकात कृषी संस्कार करणारी कविता सन 2007 पासून प्रकाशित होत आहे. मराठी, हिंदी अशा तीन मालिकांसाठीही त्यांनी शीर्षक गीत लेखन केले आहे. लेखक कवींच्या 32 पुस्तकांना त्यांनी प्रस्तावना दिली आहे.


फर्मान, गुलमोहर, स्पंदन, अबोली, वानाविलास हे त्यांचे पाचही काव्यसंग्रह आशयघन असल्याने गाजलेले आहेत. अनुभवाचे देणे सकस असेल, तरच द्यावे हा वसा त्यांनी आयुष्यभर सांभाळला आहे. आपण लेखक आहोत, याबद्दल वाच्यताही न करता शब्दांचा पुजारी बनून शब्दरत्नांचा गोफ विणण्यात ते गर्क झाले आहेत. प्रसिद्धीच्या वलयात राहण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्याही त्यांनी कधीच लढवल्या नाहीत. म्हणूनच तर लेखक, कवी म्हणून अस्सल अनुभवाची दाहकता वाचकांपर्यंत पोहोचवणारा वेगळा पंथाचा लेखक म्हणून त्यांची खान्देशात ओळख आहे. त्यामुळेच त्यांच्या ‘आई! मला जन्म घेऊ दे’ या नव्या पुस्तकाची वाचक आतुरतेने वाट पाहत आहेत.
केवळ मुलगी वाचवा, कन्या जन्माचे स्वागत करा, अशी शपथ घेऊन मुलींचा जन्मदर वाढणार नाही. त्यासाठी समाजाच्या मनोभूमीची मशागत करणे नितांत गरजेचे आहे. पदरमोड करून पायाला भिंगरी लावून जनजागृतीचा वसा घेतलेल्या सेवाव्रतींना पाठबळ मिळावे म्हणून अशा लोकांची माहिती गोळा करून या पडद्याआडच्या माणसांना समाजासमोर आणण्यासाठी ‘सेवाव्रती’ हे वैचारिक पुस्तक लिहिण्याचीही त्यांनी तयारी सुरू केली आहे. ‘लई झाल्या लेकी नको म्हणू बापा, उडुनिया जाईल चिमण्यांचा ताफा’ या लोकगीताच्या ओळी डोळ्यासमोर ठेवून स्त्री भ्रूणहत्या विषयाची चिकित्सा करून दर्जेदार लेखन करण्यावरच आपण आता लक्ष केंद्रित केले असल्याचेही ते आवर्जून सांगतात.
शब्दांकन : आनंदा पाटील, भुसावळ