आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातृका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुरातन मंदिरांचा आशीर्वाद लाभलेले शहर म्हणजे नाशिक. या पवित्र, मंगल शहरात गंगाघाटावर काळाराम, नारोशंकर, नीलकंठेश्वर अशी अनेक पुरातन मंदिरे बघायला मिळतात. प्रत्येक मंदिराला एक स्वतंत्र इतिहास आहे.


या मंदिरांचे नुसते वरवरचे दर्शनच डोळ्यांत एक वेगळेच प्राचीनत्व साठवते. मात्र या मंदिरांचा अभ्यास करताना स्त्रीच्या दृष्टीने एक महत्त्वाची प्राचीन परंपरा आणि त्या परंपरेचे प्रतीक असलेली शिल्पाकृती अनेक मंदिरांमध्ये आढळते ती म्हणजे ‘मातृका’. मंदिरांसह शेतीच्या बांधावर, गावाच्या वेशीवर आढळणारी मातृका प्राचीन काळी पवित्र म्हणून पूजनीय होती. नाशिकमधील गंगाघाटावरील अनेक महत्त्वाच्या मंदिरांमध्ये या मातृका आढळतात. भारतभरात आढळणा-या या मातृकांच्या पूजनाचे स्वरूप बदलले असले तरी, कुठल्याही शुभकार्याला पूजन केल्या जाणा-या या मातृका हा प्राचीन इतिहासाचा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. या मातृकांविषयी :
पुरातन मंदिरांच्या प्रांगणात आढळणा-या सप्तमातृका सप्त देवतांच्या शक्ती मानल्या जातात. यांच्या उत्पत्तीविषयी अनेक कथा पुराणामध्ये सापडतात. सुप्रभेदागम ग्रंथात नैऋताचा वध करण्यासाठी ब्रह्मदेवाने यांना निर्माण केले असे सांगितले आहे, तर मार्कंडेय पुराणात ब्रह्मा, विष्णू, शिव, स्कंद व इंद्र यांच्या अंशापासून रक्तबीजांच्या नाशाच्या वेळी चंडमुंड्यांच्या वधाच्या वेळी त्या उत्पन्न झाल्या असे म्हटले आहे. त्याउलट अंधकासुर कथेत त्याच्या वधाच्या वेळी मातृका उत्पन्न झाल्या असे सांगितले आहे.


साधारणत: मातृकांची संख्या सात मानली जात असली तरी काही ठिकाणी ती आठ वा नऊ मानली जाते. वराह पुराणानुसार मानवी शरीरातील आठ प्रमुख दुर्गुणांचे प्रतिनिधित्व या मातृका करतात. जसे काम - योगेश्वरी, क्रोध - माहेश्वरी, लोभ - वैष्णवी, मद - ब्राह्मणी, मोह - कौमारी, मत्सर - इंद्राणी, पशुत्व - चामुंडा, असूया - वाराही.
दिवंगत तज्ज्ञ ग.ह. खरे यांच्या मते शैव पंथात समाविष्ट असणा-या या मातृकांपैकी वाराही, वैष्णवी, इंद्राणी, वामनी, नारसिंही या वैदिक अंश दाखवणा-या तर गणेश, वीरभद्र, भैरव आणि माहेश्वरी, कौमारी, चामुंडा या अनार्य अंश सुचवतात.


असे असले तरी त्या फार पूर्वीपासून समाजात प्रिय झाल्या होत्या. बदामीचे चालुक्य स्वत:ला सात मातांकडून रक्षिलेले असे म्हणवितात आणि नारसिंही देवगिरी यादवांची कुलदेवता होती. सर्वात सुंदर सप्तमातृकांच्या मूर्ती बेसनगर येथे आहेत, त्यांच्यावर गुप्तकालीन मूर्तिशैलीचा प्रभाव दिसतो. अंगप्रत्यंगात सौष्ठव आणि आकर्षक केशरचना यांनी त्या मूर्ती देखण्या वाटतात. कुंभकोणम, ऐहोळ येथील शिल्पांमध्ये आठ मातृका आहेत. नर्मदेच्या तीरावर मांधाता पर्वतरांगांमध्ये, तामिळनाडूतील चक्रपल्ली या गावी, गुजरातमधील तिलकवाडा या गावी सप्तमातृकांची मंदिरे आहेत. तसेच मध्य प्रदेशातील लेण्यांमध्ये, पुण्याजवळच्या यवतेश्वर मंदिरांच्या भोव-यात आणि बुलढाणा जिल्ह्यातील तारापूर गावच्या देवी मंदिराच्या परिसरात मातृकांच्या मूर्ती असल्याची नोंद संस्कृतिकोशात आहे. हेमाडपंती मंदिरांमध्ये या मूर्ती हमखास आढळतात. मंगलकार्याच्या वेळी पुण्याहवाचनानंतर मातृकापूजन करतात. त्यासाठी एका पाटावर तांदळाचे पुंजके घालून त्यावर मातृकांचे आवाहन करतात. या मातृकांची संख्या तेवीस असते. या वेळी गणपती, दुर्गा, क्षेत्रपाल व वास्तोस्पती या चार देवताही त्यांच्याबरोबर पुजल्या जातात. सात मातृका, एक वीरभद्र, एक गणपती अशा नऊ मूर्ती एका पटावर असतात. सामान्य माणसांना त्या ओळखता न आल्यामुळे त्याला नवग्रह वा आणखी काही भलतेच नाव मिळालेले दिसते. प्राचीन काळात मातृकांच्या स्वतंत्र मूर्ती असाव्यात, परंतु नंतर वीरभद्र आणि गणपती यांच्यासह त्या एकाच पटावर दिसतात.


बहुधा प्रत्येक खेड्यात पाणवठ्याजवळ किंवा डोंगरकपारीत त्यांची स्थाने दिसून येतात. प्रत्येक मातृकेचा एखादा प्रिय वृक्ष असतो ती त्या ठिकाणी निवास करते, अशीही एक समजूत आहे. साधारणत: देवालयांच्या ओव-यांमध्ये त्यांच्या मूर्ती कोरलेल्या आढळतात.


त्यांच्या स्वरूपाविषयी :
1. ब्राह्मी : ब्रह्मदेवाची शक्ती असणा-या हिचे वाहन हंस असते. रक्तकमलासनात, मृगाजिनावर झालेल्या ब्राह्मीचे वस्त्र पितांबर असून ती सुवर्णवर्णी आहे. चतुर्मुखी असणा-या ब्राह्मीच्या मस्तकावर करंडक मुकुट, चार हातांपैकी एक हात अभय, दुसरा वरद मुद्रेत आणि मागील दोन हातात अक्षमाला व शूल असते. पलाश वृक्षाखाली हिचे निवासस्थान असते.
2. माहेश्वरी : महेश्वराची शक्ती असणा-या हिचे वाहन वृषभ आहे. शुभ्रवर्णी असणा-या माहेश्वरीच्या किरीटमुकुटावर चंद्रकोर असते, ती पंचमुखी आणि त्रिनेत्री असते. चार हातात कवटी, त्रिशूल, खड्ग आणि वरदमुद्रा असते. बिल्व वृक्षाखाली हिचे निवासस्थान असते.
3. कौमारी : कुमार स्कंदाची शक्ती असणा-या हिचे वाहन मोर असून त्यावर ध्वजाचे चिन्ह असते. या रक्तवर्णी मातृकेला सहा मुखे आणि बारा हात असतात. त्यात वरदमुद्रा, शक्ती, पताका, दंड, पात्र, बाण, धनुष्य, घंटा, कमल, कुक्कुट, परशू आणि अभयमुद्रा आहे. औदुंबराखाली हिचे निवासस्थान असते.
4. वैष्णवी : विष्णूची शक्ती असणा-या हिचे वाहन गरुड आहे. श्यामवर्णाच्या, वनमाला धारण केलेल्या वैष्णवीला सहा हात आहेत. दोन अभय व वरदमुद्रेत आणि इतर चार हातात शंख, चक्र, गदा, पद्म असते. हिचे मुख सुंदर आणि नेत्र रेखीव असतात. हिचे निवासस्थान राजवृक्षाखाली असते.
5. वाराही : वराहाची शक्ती असणा-या वाराहीचे वाहन रेडा असून मुख वराहाप्रमाणे असते. नील मेघाप्रमाणे वर्ण असणा-या हिचे पोट मोठे असते. चार हातांपैकी पुढचे दोन हात अभय व वरदमुद्रेत, मागील दोन हातात हल आणि शक्ती ही आयुधे असतात. प्रवाळयुक्त करंडकमुकुट तिच्या मस्तकावर असतो. कल्पवृक्षाखाली तिचे निवासस्थान असते.
6. इंद्राणी : इंद्राची शक्ती असणा-या हिचे वाहन गज आहे. किरीटमुकुट आणि अनेक अलंकार तिने धारण केलेले आहेत. हिला एक मुख आणि हजार डोळे आहेत, तरीही ती सौम्य दिसते हे विशेष. शरीराची कांती सोनेरी आहे. पुढील दोन हात अभय व वरदमुद्रेत आणि दोन हातात वज्र आणि शक्ती आहे. कल्पवृक्षाखाली तिचे निवासस्थान असते.
7. चामुंडा : यमाची शक्ती असणारी चामुंडा प्रेतासनावर बसली आहे. श्यामवर्णी चामुंडेला तीन नेत्र आहेत. दाताचे सुळे बाहेर आलेली, उग्ररूपी, कृश शरीराची, ऊर्ध्वकेशी, गळ्यात मुंडमाला यज्ञोपवितासारखी घातलेल्या चामुंडेला दहा हात आहेत. त्यात मुसळ, कवटी, बाण, अंकुश, खड्ग, खेटक, पाश, धनुष्य, दंड आणि परशू आहे.


नाशिकमधील विविध प्राचीन मंदिरांच्या परिसरामध्ये या मातृका आढळतात. या मातृकांबरोबरच मधुबनी व त्या राजांच्या काळातील नक्षीकाम बघायला मिळते. परंपरा, इतिहास मंदिरांमधून व्यक्त होत असतात हे या मातृकांच्या उदाहरणांवरून जाणवते. मातृकांच्या निर्मितीमागील कथा, पुराणकथा याहीपेक्षा त्यांची विलोभनीय रूपे जाणून घेणे प्राचीन इतिहासातील स्त्री-देवतांच्या रेखाटनामागचे मर्म कळण्यासाठी महत्त्वाचे ठरते.