आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्याग्रह नव्हे दुराग्रह!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखादा नायक चित्रपटांची ओळख असतो, तर कधी काही चित्रपट दिग्दर्शकाच्या शैलीमुळे ओळखले जातात. मात्र दिग्दर्शकामुळे ओळख लाभलेल्या चित्रपटांना जर साचेबद्धता आणि चौकट मोडता आली नाही, तर कसदार अभिनय असणार्‍या कलाकारांचा भरणा असूनही ते चित्रपट कुठल्याच पातळीवर फारसे यशस्वी ठरत नाहीत, याचे उत्तम उदाहरण म्हणजे अलीकडेच आलेला दिग्दर्शक प्रकाश झा यांचा ‘सत्याग्रह’.

प्रकाश झा यांचा राजकारणावरील फसलेला हा पहिलाच चित्रपट नाही. सलग तीन वर्षांत आलेले त्यांचे राजनीती, आरक्षण आणि आताचा सत्याग्रह हे चित्रपट राजकारणाच्या विविध बाजू दाखवताना कसे फोल ठरले व कुठल्या गोष्टी चित्रपटाला मारक वा तारक ठरल्या, हे या तीन चित्रपटांवर नजर टाकल्यास सहज लक्षात येते.

‘राजनीती’ बॉक्स आॅफिसवर यशस्वी ठरला. 2010मध्ये आलेला हा राजकीय थरारपट, महाभारताची पार्श्वभूमी घेऊन आला होता. त्यात कर्णाला नदीत सोडणार्‍या कुंतीपासून पुढे कर्ण व अर्जुनाच्या द्वंद्वापर्यंत सगळा राजकीय खेळ रंगविण्यात आला. मनोज वाजपेयी, अर्जुन रामपाल, रणबीर कपूर, अजय देवगण, कतरिना कैफ, नाना पाटेकर आदी तगडी स्टारकास्ट यात योजण्यात आली होती. एकूणच राजकारणामध्ये पडद्याआड काय चालते, याचा ड्रामेबाज पण तितकाच मनोरंजक खेळ दाखविण्यात झा यशस्वी झाले होते. वास्तवाचा निव्वळ आभास दाखवितानाही तो बेमालूमपणे खरा वाटावा, इतपत त्यांनी तो निर्माण केला होता. ‘राजनीती’च्या यशानंतर ‘आरक्षण’ चित्रपट झा यांनी पडद्यावर आणला, मात्र तो सपशेल आपटला. आरक्षणाबाबत नेमकी आपली भूमिका काय आहे, याचाच दिग्दर्शकाला विसर पडल्याचे हा चित्रपट पाहिल्यानंतर जाणवले. या चित्रपटातही काही कलाकार वगळता ‘राजनीती’च्याच स्टारकास्टची पुनरावृत्ती झाली. मात्र तरीही चित्रपट आपटला, तो दुबळ्या पटकथेमुळे व राजकीय विचारप्रवाहांचे नीट आकलन न करता चित्रपट साकारल्यामुळे. जातसापेक्ष राजकारण दाखविण्याचा जरी चित्रपटाचा मूळ हेतू असला तरी एकीकडे केवळ कागदोपत्री आदर्शवत वाटणारी मूल्ये, पण ती निष्ठेने पाळणारी एखादी तत्त्वनिष्ठ व्यक्ती आणि दुसरीकडे या मूल्यांना झुगारून कुठलाही मार्ग पत्करून केवळ भौतिक प्रगती करू इच्छिणारा तरुण असा संघर्ष चित्रपटाला दाखवता आला नाही. त्यात परिवर्तन, कलाटणी दाखविण्याच्या नादामध्ये मूळ आरक्षणाचा मुद्दा कुठल्या कुठे हरवून गेला. त्यामुळे इथेही चांगला अभिनय करणारे कलाकार असूनही केवळ भावना व मूल्यांचे एकव्यक्तिकेंद्रित उदात्तीकरण व ढिसाळ कथानक यामुळे चित्रपटाला अपयश आले.
यानंतर आला आहे तो राजकारणाचा सर्वसामान्य माणसाच्या जिल्हाधिकारी कार्यालयातल्या अडकलेल्या फाइल्सशी संबंध जोडणारा ‘सत्याग्रह’ चित्रपट. आपल्याकडे व्यक्तीच्या विचारांपेक्षा व्यक्तीला देवत्व देण्याची परंपरा दुर्दैवाने आहे. त्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला की तिच्या विचारांचा अंमल रूढार्थाने व पूर्णत्वाने तिच्या अनुयायांवर, भक्तांवर राहतो. गांधीजींची हत्या झाली, यापेक्षा त्यांच्या विचारांचा गैरअर्थ घेत आपण त्यांच्या विचारांची पायमल्ली केली, याची कैक उदाहरणे नंतर देशात घडली. त्यातही कुणी ‘दुसरे गांधीजी’ बनण्याचा प्रयत्न केला; पण शेवटी ज्याला स्वत:ची ओळखच नीट मांडता येत नाही, त्याला गांधीजींच्या विचारांचे धनुष्य पेलवणे जडच गेले. तरीही सर्वसामान्य जनतेवर या व्यक्तीचे (‘गांधी बनू पाहणार्‍या अण्णांचे’) गारूड अजूनही कायम आहे, या समजापोटी या तथाकथित लोकनेत्याची व त्याच्या जन-आंदोलनाची पार्श्वभूमी चित्रपटात वापरताना, झा यांना अपयश आले ते नक्कल करण्यामुळे. एका शब्दहिंसेला गांधीजींनी कधीच शाब्दिक हिंसेने उत्तर दिले नाही. ते शांतपणे कृतीतून चुकीच्या गोष्टींना विरोध करत राहिले, बदलापेक्षा परिवर्तनाची भाषा करत राहिले, यालाच नेमका छेद, गांधीजी बनू पाहणार्‍या आजच्या काळातील लोकनेत्याने दिला, आणि पुन्हा एकदा व्यक्ती गेली की तिचे विचार भ्रमिष्टांच्या हाती लागले की काय होते, याची प्रचिती दिली. चित्रपटात हा धागा जसाच्या तसा उचलताना दाखविलेला नाटकीपणा पचनी न पडणारा ठरला. अंतर्गत दुफळ्यांमुळे माजलेला कलह आणि नंतर तो शमविण्याचा केलेला उतावळा प्रयत्न यामुळे शेवटी शेवटी हा चित्रपट राजकारणाविषयी अनेक भ्रम निर्माण करणारा ठरला. तसेही वास्तव आयुष्यात अशा जनआंदोलनाची फिल्मी झलक तमाम भारतीय अनुभवून चुकले होते. त्यामुळे चित्रपटातही त्याची पुनरावृत्ती पाहणे, मनोरंजनाच्या दृष्टीने कंटाळवाणेच ठरले.

एरवी, राजकारणावर ठोस भाष्य करण्यात झा यांचे तिन्ही चित्रपट अयशस्वी ठरतात, ते मनोरंजन आणि वास्तव यांच्या फसलेल्या मिश्रणामुळे. तिन्ही चित्रपटांपैकी ‘आरक्षण’ आणि ‘सत्याग्रह’मध्ये गांधीजींचा, त्यांच्या विचारांचा वापर प्रत्यक्ष व प्रतीकात्मक पद्धतीने केलेला दिसतो. मात्र त्याची सखोलता तपासल्यास हाती फक्त फोलपणा येतो. गांधीजींभोवतीच्या वलयालाच तेवढे उथळपणे उचलले गेले, हे स्पष्ट होते. मनोज वाजपेयीचा या तिन्ही चित्रपटातील सरस अभिनय आणि अमिताभ यांचा परिपूर्ण अभिनय वगळता चित्रपटांना एक आशय म्हणून विशेष अर्थ उरत नाही, तो राजकीय घटनांचीच पुनरावृत्ती आणि तीही नीट न मांडल्यामुळे. ‘राजनीती’ला बॉक्स आॅफिसवर जरी यश आले असले तरी राजकारणातील खेळ, डावपेच यांचे निव्वळ सादरीकरण या चित्रपटाने केले; त्यातील सखोलता चित्रपटाला टिपता आली नाही किंवा व्यामिश्रता उलगडता आली नाही. केवळ स्टारडमच्या आधारावर चित्रपटांचे डाव मांडता येत नाहीत, हे झा यांना कळायला हवे होते. सकारात्मक दृष्टिकोनातून राजकारण करू पाहणार्‍या विचारसरणीचा आता देशभरातील तरुणांमध्ये अंकुर रुजत असताना भूतकाळातील राजकीय उदासीनतेला वा राजकारणाला नावे ठेवण्याच्या वृत्तीवरच व दोन टोकाच्या भूमिकांवर चित्रपट काढणे, म्हणजे एकूणच वर्तमानाशी फारकत घेण्यासारखे आहे, हे या चित्रपटांनी दाखवून दिले. अर्थात, या चित्रपटांचा आशयाच्या गहनतेशी झगडा आहे, अभिनयापेक्षाही इथे आशयातून काढलेले अनुमान व आशयाची गंभीरता महत्त्वाची आहे.

म्हणून तिन्ही चित्रपटांनी हे गमावल्याने आशयदृष्ट्या अपयश आले, असे म्हणावे लागेल. एक प्रकारे राजकारणावर चित्रपट काढण्याचा प्रकाश झा याचा हा दुराग्रहच म्हणावा लागेल.
priyanka.dahale@dainikbhaskargroup.com