आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मृदुला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरं म्हणजे मृदुलाच्या मनात मावशीकडे जायचं नव्हतंच. पण आई पुन्हा-पुन्हा मागे लागली. म्हणाली, रोज तोच रस्ता, तीच घरं बघायची, त्यामुळे तेच तेच विचार मनात येत राहणार. बरं, तू काय घरात बसून राहणार आहेस का? तुला तुझं शिक्षण पुरं करायलाच हवं. आणि त्यासाठी घराबाहेर तर पडावंच लागेल. म्हणून म्हणते, इथल्या गोष्टी नकोत नि आठवणीही नकोत. मावशीकडे गेलीस की सगळं वातावरणच बदलेल. शिवाय तिची अदिती जवळजवळ तुझ्याच वयाची - तुझी मैत्रीणच आहे. तिकडे तुझं मन रमेल. तू एक वर्ष तिकडे राहा. तरीही जर मन रमलं नाही तर ये इकडे.


पण मृदुलाला ठाऊक होतं, की तिच्या मनाला झालेली जखम अशी वातावरण बदलल्याने भरून येणारी नव्हती. पण केवळ आईला दुखवायला नको, म्हणून ती मावशीकडे आली आणि तिने अदितीच्याच कॉलेजात बीकॉमच्या दुस-या वर्गाला प्रवेश घेतला.


आणि खरंच, हळूहळू ती या नव्या वातावरणात रुळू लागली. मावशीलाही बरं वाटलं. चार-पाच महिन्यांत ती, अदिती आणि पहिल्या दुस-या वर्गाच्या चार-पाच मैत्रिणी यांचा छान ग्रुप जमला. ती थोडीफार हसू-बोलू लागली.
पण या ग्रुपमध्ये आजकाल अदितीचा एक मित्र नितीन, त्याचा मित्र कुणाल आणि असेच एक-दोन जण सामील झाले. मग मात्र मृदुला या ग्रुपपासून दूर राहण्याचा प्रयत्न करू लागली. तेव्हा अदिती तिला म्हणाली, ‘मृदुला, इतके दिवस तू आमच्या ग्रुपमध्ये रमायला लागली होतीस. पण आता काय झालं? ग्रुपला का टाळतेस तू?’
मृदुला म्हणाली, ‘तुला ठाऊक आहे नं, मला मुलांशी मैत्री आवडत नाही. आमच्या गावाकडे मुली मुलांमध्ये इतक्या मिसळत नाहीत. इथे तर मुलं-मुली एकमेकांची चेष्टा-मस्करीही करतात. मला मुलं मुळीच आवडत नाहीत.’
‘अगं, चार मुलं वाईट वागली म्हणून तू सर्वच मुलं वाईट असतात, असं कसं ठरवतेस? घरी तुझा भाऊ हर्ष आणि इकडे नवीन हे मुलगेच आहेत नं? मग तेही वाईट आहेत का? उलट मुलं आपल्याला नोट्स वगैरे देतात, मदत करतात.’
‘ते मला काही ठाऊक नाही. पण या विषयावर आपण नको बोलूया.’


तो विषय तिथेच राहिला. मृदुलाने आपला अभ्यास, आपली लेक्चर्स बरी आणि आपण बरे, असा प्रयत्न करून बघितला. कारण कुठेही गेलं तरी मुलींबरोबर मुलं असायचीच. पण सगळ्यांपासून दूर राहणं तिला जमेना. आधीच तिचा स्वभाव बोलका, त्यात एकटी असली की तिच्यावर आलेला तो भयानक प्रसंग तिला आठवत राही. त्यामुळे ती हळूहळू सगळ्यांच्यात मिसळू लागली.


बघता बघता वर्ष संपले. दरम्यान ती दोन-तीन वेळा कोर्टाच्या कामासाठी गावी जाऊन आली, की चार दिवस ती बेचैन असे. पण मावशी, काका, अदिती, नवीन सगळे तिला सांभाळून घेत.
दुस-या वर्षाची परीक्षा झाली आणि सुट्टीत ती घरी गेली. तेव्हा बाबा म्हणाले, ‘काय मृदुल, तुझं मन मावशीकडे रमलेलं दिसतंय. तब्येतही जरा बरी वाटतेय. गेल्या वर्षी फारच बिघडली होती. पण तू कोर्टात सगळं सांगितलंस म्हणून बरं झालं. त्या मवाल्यांना चांगली शिक्षा झाली. यंदा पण तू मावशीकडेच राहा.’


‘ए ताई, नाही गं. मला एकट्याला तुझ्याशिवाय करमत नाही. तू नको जाऊस.’ हर्ष म्हणाला.
‘यंदा एक वर्ष मी तिकडे राहते. मग पोस्ट ग्रॅज्युएशन करायला इथेच येईन. मला पण तुझी आठवण येते. पण यंदा जाऊ दे.’


‘तू तिकडेच राहा. कॉलेजही बदलायला नको.’ आई म्हणाली.
मग ती पुन्हा मावशीकडे आली. यंदा तिचं कॉलेजचं तिसरं वर्ष आणि अदितीचं दुसरं वर्ष. पहिली टर्म संपत आली. तिच्या मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपमध्ये ती आता चांगली रमली होती. पण आजकाल अदितीचं वागणं तिला जरा वेगळं वाटायला लागलं होतं. त्यांच्या ग्र्रुपमधल्या निमाच्या घरी ती वारंवार जाऊ लागली होती. निमा पण दुस-या वर्षाला होती आणि अभ्यासू होती. निमाकडे गेली की अदिती रमायची. कधी-कधी तिला घरी यायला चांगले साडेसात-आठ वाजायचे. मावशी एकदा म्हणाली, ‘अगं मृदुला, अदितीला इतका का वेळ होतो आजकाल? असते कुठे ही?’ तेव्हा मृदुला म्हणाली, ‘ती निमाच्या घरी जाते अभ्यासाला. गेल्या वर्षी कमी मार्क मिळाले, तेव्हा यंदा जोरात अभ्यास करायचा प्रयत्न आहे तिचा.’ मग तिने अदितीला विचारलंच, ‘बाई गं, मी तुझी बाजू सांभाळून घेतली, पण मला खरं काय ते सांग. तू आजकाल निमाकडे इतकी का जातेस?’


त्यावर ती म्हणाली, ‘माझी बाजू सांभाळल्याबद्दल मनापासून थँक्स. मी तुझ्याशी याबद्दल बोलणारच होते. निमाचा मोठा भाऊ राजू गेल्या वर्षी एमबीए झाला. तो बीई होताच. त्याला एका चांगल्या कंपनीत नोकरी लागलेय. त्याचं आणि माझं - माझं -’
‘समजलं. तुमचं एकमेकांवर प्रेम आहे?’
‘हो. आणि तू या बाबतीत आईकडे मध्यस्थी कर. हवं तर तू एकदा राजूला भेटून बघ तो कसा आहे ते.’
‘तुला मदत करायला मला नक्की आवडलं असतं. पण माझा या प्रेमाबिमावरून विश्वासच उडालाय. पुरुषांना प्रेमबिम काही नसतं, फक्त सेक्सच ठाऊक असतं. तेव्हा तू मला मध्यस्थी करायला सांगू नकोस.’


त्यावर अदिती म्हणाली, ‘असं काय करतेस मृदुला? तुला एक घाणेरडा अनुभव आला म्हणून सगळेच पुरुष थोडेच वाईट असतात? तुझे नि माझे बाबाच बघ. त्यांचं मावशीवर आणि आईवर किती प्रेम आहे. आता डोक्यातून तो वाईट विचार पूर्णपणे काढून टाक बरं. अजूनही तुझा पुरुषांच्या चांगुलपणावर विश्वास का नाही?’
‘तसं नाही गं. पण माझा अनुभवच इतका वाईट होता, की माझं सगळं भावविश्वच त्याने नासून गेलंय. अदिती, वै-यावरही येऊ नये असा प्रसंग माझ्यावर आला. नाही सावरू शकत मी त्यातून स्वत:ला. बाहेरून मी चांगली वागते, पण आतून मन जळतच असतं.’


‘अगदी बरोबर आहे तुझं. पण सतत असा विचार केलास तर तुझं पुढचं आयुष्य कसं जाणार? शेवटी तुला लग्न, संसार करायचा आहेच नं?’
‘छे! छे! लग्नाबिग्नाच्या वाटेला मी जाणं शक्य नाही. पण तू म्हणतेस तर तुझ्याबद्दल मावशीशी बोलेन.’
‘थँक्स मृदुला. तू राजूला भेटायला कधी येशील?’
‘मी त्याला भेटून काय करू? मला काही पुरुषांची पारख करता येणार नाही. मी त्याला भेटणार नाही, पण मावशीशी नक्की बोलेन.’
आणि त्याप्रमाणे ती मावशीशी बोलली. ‘मावशी, मी काही त्या राजूला बघितलेलं नाही. पण अदितीच्या बोलण्यावरून तो चांगला वाटतो. तू प्रत्यक्ष त्याला भेटून काय ते ठरव.’ (पूर्वार्ध)