आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूलपण जपूया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काॅलनीत तीनचार छोटुकली आहेत सध्या, दोनअडीच वर्षांची. सगळी प्लेस्कूलमध्ये जातात. त्यांच्या शाळांमध्ये कार्यक्रम आहेत चालू. येताजाता आया भेटल्या की, सांगत असतात अमुक नाच आहे, तमुक कपडे घालायचेत वगैरे. मागच्या आठवड्यात एकाचा अॅन्युअल डे झाला, तो नाचात होता. नाच करायचा होता रंगबिरंगी चमचमत्या टिकल्या लावलेले कपडे चढवून. या महाराजांना तर टीशर्ट आणि चड्डी वगळता काहीही आवडत नाही घालायला. किती आई व आजीने चुचकारलं, आंजारलं, गोंजारलं तरी ते भाड्याचे कपडे घालायला याने सपशेल नकार दिला. शेवटी तो त्याच्या नेहमीच्या शर्ट-चड्डीत स्टेजवर जाऊन नाचून आला. काल दुसऱ्या पिल्लूचे होते कार्यक्रम. तिलाही टिकल्या लावलेला खूप घेराचा फ्राॅक, मॅचिंग हेअरबँड, बूट, मोजे असा जामानिमा करायचा होता. तिनेही तोच धोशा लावला आईकडे. हा फ्राॅक नको, टोचतो. हेअरबँड घट्ट आहे, नको मला. बूट नाही आवडत मला, वगैरे.

वाटलं, इतक्या लहान मुलांना का असं करायला लावतो आपण? बऱ्याचदा त्यांचे नाचही असतात माेठ्या माणसांच्या गाण्यांवरचे. त्यांना एरवीही अनेकदा मोठ्या माणसांसारखे कपडे आणले जातात. दुकानांमध्ये थ्रीपीस सूट, अनारकली, बॅकलेस चोली, तंग मिनी असे कपडे घातलेल्या दीडफुटी पोरांचे फोटो जाहिराती म्हणून लावलेले असतात. त्यांच्या किमती तर मोठ्या माणसांच्या कपड्यांपेक्षा अधिक असतात. दोन-तीन महिन्यांत हे कपडे मुलांना होतही नाहीत. तरीही हौसेखातर, आईवडिलांच्या हौसेखातर, ते विकत घेतले जातात आणि मुलांना रडवून त्यांच्या अंगावर चढवले जातात. शाळेच्या टायसह असलेल्या गणवेशाबाबत बोलणंच नको.
मुलांना मुलांसारखं राहू द्या की, असं सांगावंसं वाटतं अशा नटल्याथटल्या पोरांना पाहून. टीशर्ट आणि चड्डी हा तर मुलगे व मुलींसाठीही किती सुलभ पोशाख आहे. वावरायला सोपा आहे, चड्डीला खिसे असल्याने त्यात खाऊ ठेवता येतो, धुवायला/वाळायला सोपा. आणि मुलांच्या नाजूक त्वचेलाही मऊ लागणारा, न बोचणारा. मुलं निषेध व्यक्त करू शकत नाहीत, म्हणून त्याचा किती गैरफायदा घ्यावा आपण? मुलांचं मूलपण जपायला हवं ना?
मृण्मयी रानडे, मुंबई
mrinmayee.r@dbcorp.in