आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचार करा पक्का

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

निवडणूक, मग ती पतसंस्थेची असो, ग्रामपंचायतीची, बीसीसीआयसारख्या धनवंत संघटनेची वा थेट लोकसभेची, आपल्या देशात ती सर्व प्रसिद्धिमाध्यमांमधून गाजतेच. अनेक राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवार या प्रत्येक निवडणुकीत आपलं मत आणि पत आजमावून बघत असतात. या प्रयत्नात कोणी आपली अनामत रक्कम गमावून बसतात तर कोणी मतदारांचा योग्य कौल मिळाल्याने सत्तेवर येतात. सरतं वर्ष संपलं तेच दिल्लीतील सत्तांतराने. आणि नुकत्याच सुरू झालेल्या वर्षात आपण सामोरे जाणार आहोत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना. त्याच निमित्ताने हा निवडणूक विशेषांक.
अंकासाठी साहित्य पाठवा, या आवाहनाला वाचकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला, त्याबद्दल खूप आभार. आलेली पत्रं आणि ई-मेलवरून लक्षात आलं की भारतीयांना राजकारण हा अत्यंत आवडीचा विषय वाटतो आणि त्यावर मत मांडायला ते सदोदित तयार असतात. खरे तर हा प्रतिसाद निवडणूक/प्रशासन/समाजकारण व महिला अशा स्वरूपाचा अपेक्षित होता, परंतु अनेकांनी निवडणुका, मतदान या विषयांवर पत्रं पाठवली आहेत. त्यातील सर्वच या अंकात समाविष्ट करू शकलो नाहीत, परंतु लवकरच ती प्रसिद्ध करू.
नागरिकशास्त्रात ग्रामपंचायत ते संसद अशा पाय-यांचा आपण अभ्यास केलेला असतो, परंतु त्याची निवडणुकांच्या संदर्भात नव्याने आठवण करून देणारा लेख अंकात आहे, तसेच महिला मतदान करताना काय विचार करतात, याविषयी काही महिलांचे विचार मांडणाराही लेख आहे. एका एककाचे अध्यक्षपद भूषवणा-या महिलांचे अनुभव यात आहेत तसेच आरक्षण आणि ‘आप’ या विषयांशी निगडित काही प्रसंगदेखील. निवडणुकांना सामोरे जाताना, मग ते मतदार म्हणून असो की लोकप्रतिनिधी म्हणून, काय तयारी केली पाहिजे, काय विचार केला पाहिजे, आपल्या निर्णयाचा काय परिणाम
होऊ शकतो याचा अंदाज आमच्या वाचकांना यावा व त्यांनी या देशाच्या लोकशाही प्रक्रियेत विचारपूर्वक सहभागी व्हावे, हा या अंकामागचा उद्देश आहे. तो किती यशस्वी झाला, हे आम्हाला नेहमीप्रमाणे सांगालच. आपल्या प्रतिक्रियांची वाट पाहतोय.


mrinmayee.r@dainikbhaskargroup.com