सलाम
जगभरातल्या कामगारांना
काळ्याशार, कोरडवाहू, नापीक, तांबड्या मातीत राबणाऱ्या
घट्टे पडलेल्या हातांना, निबर झालेल्या तळव्यांना
ओझी वाहणाऱ्या, गुरं राखणाऱ्या
उंच इमारतींवर सिमेंट लिंपणाऱ्या
पार पाताळात असणाऱ्या खाणीतून कोळसा काढणाऱ्या
रिक्षा, टेम्पो, वडाप, ट्रॅक्टर, यष्टी, टॅक्सी चालवणाऱ्या
कातडं कमावणाऱ्या, बेवारस मढी जाळणाऱ्या
छोट्याशा गावातल्या इवल्याशा शाळेतल्या पोराटोरांना शिकवणाऱ्या
बातमीसाठी उन्हापावसात वणवण करणाऱ्या
छापखान्यात राबणाऱ्या, पहाटे पेपरची लाइन टाकणाऱ्या
गावभर फिरत भाजी, चणे, अगरबत्ती, साबण विकणाऱ्या
नित्योपयोगी वस्तूंचं फिरतं भांडार असणाऱ्या हरेक मालवाल्याला
पहाटेपासून चहा-भजी-पोह्यांचा स्टाॅल चालवणाऱ्या
हाॅटेलांमध्ये इडली-सांबार, दोसा, पुरी-भाजी करणाऱ्या
प्रचंड उकाड्यात भल्यामोठ्या तंदूरसमोर
तासन् तास उभं राहून गरमागरम रोट्या शेकणाऱ्या
गायी-म्हशीचं दूध काढून केंद्रावर जाऊन िवकणाऱ्या
कोंबड्या, शेळ्यामेंढ्याबकऱ्या पाळणाऱ्या
सातच्या भोंग्याला कापड गिरण्यांमध्ये जाऊन मान खाली घालून
काम करून काड्यापेटीएवढ्या घरात परतावं लागणाऱ्या
तीन बाय तीनच्या छोट्याशा गाळ्यात उभं राहून
दिवसभर पब्लिकचे मोबाइल दुरुस्त करणाऱ्या
चहाचे ग्लास पोचवणाऱ्या
रेल्वेत उभं राहून कानातले, पिना, सामोसे, भाजी, नेलपाॅलिश विकणाऱ्या
वर्षातले बारा महिने, दिवसाचे बारा बारा तास बंदोबस्ताची ड्यूटी करणाऱ्या
वाहक, चालक, लिफ्टमन, वाॅचमन, मोटरमन, गार्डचं काम करणाऱ्या
िदवसभर उभं राहून इतरांच्या उंची कपड्यांना इस्त्री करणाऱ्यांना.
सलाम
मुलाबाळांनी शिकावं म्हणून कोंड्याचा मांडा करून
संसाराचा गाडा हाकणाऱ्या आयाबायांना
चुलीपुढे भाकरी थापणाऱ्या
मैलोन् मैल दूरवरून पाणी आणणाऱ्या
दुसऱ्याच्या शेतात काड्याकाटक्या गोळा करणाऱ्या
दिवसभर लाेकाकडची धुणी-भांडी, केर-लादी करणाऱ्या
घरोघरी जाऊन पोळी-भाजी, वरणभात करणाऱ्या
तान्ह्या मुलाला नि बाळंतिणीला मन लावून मालिश करणाऱ्या
गारमेंट फॅक्ट्रीत जीन्सला बटणं शिवणाऱ्या
बचतगटांतनं कर्ज काढून शिवणटिपण करणाऱ्या
कमरेवर तान्ह्या मुलाला बांधून
सिमेंटची जड घमेली वाहून नेणाऱ्या
तेंदूपत्त्याच्या विड्या वळण्यात आयुष्य घालवणाऱ्या
पोटाच्या खळगीसाठी शरीरविक्रय करणाऱ्या
हाउसकीपिंगच्या गोंडस नावाखाली प्रसाधनगृहं स्वच्छ ठेवणाऱ्या
दहा बाय दहाच्या घरात ब्यूटी पार्लर चालवून उत्पन्नाला आधार देणाऱ्या
तमाम राबणाऱ्या हातांना जागतिक कामगार दिनाच्या निमित्ताने कृतज्ञ सलाम.
mrinmayee.r@dbcorp.in