आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोण कोणाला निवडतं?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दत्तक घेण्याच्या प्रक्रियेत बदल झाल्याची बातमी कानावर आली, संगणकावर फोटो पाहून मूल निवडता येणार (की निवडावं लागणार?) हे कळल्यावर काही अनाथाश्रमांना दिलेल्या भेटीच्या आठवणी जाग्या झाल्या. अनेक मित्रमैत्रिणी आठवल्या ज्यांनी बाळ दत्तक घेतलं होतं. अनेक मित्रमैत्रिणी, नातलग आठवले जे बाळ दत्तक घ्यायचा निर्णय टाळत राहिले. आणि डोळ्यांसमोरून तरळले अनाथाश्रमांमधले निरागस हसरे इवलेसे चेहरे, आजूबाजूच्या परिस्थितीचं यत्किंचितही भान नसलेले.

सोलापुरातल्या एका संस्थेच्या प्रमुख सांगत होत्या, जोडपी येतात, मुलं पाहतात. त्यांना त्यातलं एखादं आवडतं. मग ते त्याच्या जवळ जातात, बोलतात, त्याला जवळ घेतात. परंतु कधीकधी ते मूल त्या जोडप्याकडे पाहतही नाही, त्यांच्याजवळ जाण्याची गोष्टच सोडा. कितीही प्रयत्न केले तरी त्या मुलाशी ते जोडपं जवळीक साधू शकत नाही. अशा वेळी ते मूल त्या जोडप्याला कितीही आवडलं असलं तरी दत्तक दिलं जात नाही. तर कधी या जोडप्याला आवडलेलं मूल त्यांच्याशी इतकं समरस होऊन जातं, त्याला त्यांचा इतका लळा लागतो की जणू त्यांचं नातंच असावं पूर्वीचं. हा अनुभव आपल्याला एरवीही येतोच की. एखादं शेजारचं मूलही आपल्याकडे खूप रमतं, खूप आनंदात राहतं. आपल्याकडे जेवतं, झोपतंही. पण सगळीच मुलं आपल्याशी इतकी विश्वासाने, प्रेमाने नाही वागत. मग जिथे आयुष्यभराच्या, आईवडील व मूल या नात्याचा प्रश्न असतो, तिथे असं नातं फुलणं, विकसित होत जाणं महत्त्वाचंच ना. ते असं फोटो पाहून आणि काही तासांच्या भेटीतून फुलेल का, असा प्रश्न नक्कीच पडतो.

अर्थात या एकूणच प्रक्रियेतील गोंधळ निस्तरायला काही कडक नियमावली आवश्यक होती, हे मान्यच. फक्त, एका बाजूला अनाथ वा सोडून दिलेल्या मुलांची संख्या वाढतेय नि दुसऱ्या बाजूला औषधोपचारांविना किंवा ते घेऊनही, मूल न होण्याचं प्रमाणही वाढतंय. या ऑनलाइन स्वच्छ व पारदर्शक प्रक्रियेने या दोन घटकांमधलं अंतर वाढू नये, हीच इच्छा. कारण या मुलांना एक घर हवं असतं, मायेची माणसं हवी असतात, तशीच घरांनाही मुलं हवी असतात. ती सहजपणे एकमेकांना भेटावीत, एवढंच.

(mrinmayee.r@dbcorp.in)