आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीनएजर मुलांसाठी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलं अठरा वर्षांची झाली की अधिकृतरीत्या मुलं राहात नाहीत, प्रौढ होतात.
पण कुटुंबात ती मुलंच असतात. सहसा ती शिकत असतात या वयात. आईवडील मध्यमवयीन असतात, स्थिरस्थावर झालेलं असतं आयुष्य. एकुलतं एक मूल असेल तर लाडावलेलं, किंबहुना सुरक्षित आयुष्य जगत असतं. पण या वयातल्या मुलामुलींना काय काय करता यायला हवं, याची अमेरिकेतल्या एका प्राध्यापकाने केलेली यादी वाचली तेव्हा वाटलं, आपल्याकडची किती मुलं असं आईवडिलांच्या मार्गदर्शनाशिवाय, किंवा लुडबुडीशिवाय म्हणा, जगू शकत असतील बरं?
अपरिचित व्यक्तींशी बोलणं. अपरिचित म्हणजे गाडीचा मेकॅनिक, बँकेतला कर्मचारी, दारावर आलेला सेल्समन, कार्यालयातून आलेला एखादा फोन... या वयातली मुलं अशा व्यक्तींशी नीट संभाषण करू शकली पाहिजेत. त्यांच्यावर ‘बाबाला विचारतो’ किंवा ‘आई, हे बघ कोणाचा तरी फोन आलाय,’ असं म्हणण्याची वेळ येता कामा नये. यासाठी आपण आईवडिलांनी त्यांना वाईट किंवा धोकादायक व्यक्ती कशी ओळखायची, ते लहानपणापासून शिकवायला पाहिजे.

स्वत:च्या किंवा परक्या गावात मार्ग शोधणं. सगळीकडे तुम्ही त्यांना आणायला/सोडायला जात असाल तर त्यांना स्वत:च्या गावातलेही रस्ते ठाऊक नसतील कदाचित. रस्ता चुकला तरी आपण कुठे आहोत, आता पुढे कसं जायचं, हे त्यांचं त्यांना शोधता आलं पाहिजे. ‘आई, आता मी काय करू,’ असा टाहो फोडण्याचं वय निघून गेलेलं आहे.

स्वत:चा अभ्यास, प्रोजेक्ट, असाइनमेंट्स पूर्ण करणं. यात वेळेवर उठणं, वेळेवर सबमिशन, लिखापढी हे सगळंच आलं.

व्यक्तींमधील समस्या सोडवणं व आयुष्यातल्या चढउतारांना सामोरं जाणं. मित्रमैत्रिणींमधली भांडणं, गैरसमज, वाद त्यांचे ते सोडवतायत की, आईवडिलांची मध्यस्थी लागते त्यांना? थोडं दुखलंखुपलं, काही अपयश आलं, काही चुकलं तर त्यातून ती स्वतंत्रपणे सावरली पाहिजेत. दर वेळी इतर कोणी प्रौढ व्यक्तीची मदत त्यांना घ्यावी न लागली तर उत्तम. अर्थात, आईवडील कायम आपल्या पाठीशी आहेत, त्यांची सोबत आहे, ही जाणीव या सगळ्यासाठी फार महत्त्वाची. तुमची मुलं आहेत ना अशी आत्मनिर्भर?
(mrinmayee.r@dbcorp.in)